Wednesday, 26 August 2020

२२ - कॉ. लेनिन १५०वी जयंती - एका उत्तुंग क्रांतिकारकाचे स्मरण

 


जीवनमार्ग बुलेटिन : २२

बुधवार, २२ एप्रिल २०२०

कॉ. लेनिन १५०वी जयंती
एका उत्तुंग क्रांतिकारकाचे स्मरण

२०व्या शतकात जगाचा इतिहासच बदलणाऱ्या कॉ. व्लादिमीर लेनिन यांचा आज २२ एप्रिल २०२० रोजी १५०वा जयंती दिन. २२ एप्रिल १८७० रोजी त्यांचा जन्म झाला आणि २१ जानेवारी १९२४ रोजी त्यांचे निधन झाले.
असामान्य मार्क्सवादी विचारवंत, कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनात्मक तत्त्वांचे जनक, रशियातील महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीचे अत्यंत धाडसी प्रणेते, जगातील पहिल्या यशस्वी कामगार-शेतकरी वर्गाच्या राज्याचे स्थापनाकार, जगाच्या इतिहासात प्रथमच गोरगरीब श्रमिकांच्या शोषणावर प्राणांतिक घाव घालणारे आणि त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे हक्क म्हणून देणारे राज्यकर्ते, साम्राज्यवादाचे सखोल विश्लेषक आणि कडवे दुश्मन, भारतासारख्या सर्व विकसनशील देशांचे कैवारी, आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट एकजुटीचे खंदे पुरस्कर्ते - हे होते कॉ. लेनिन यांच्या अवघ्या ५४ वर्षांचे जीवनकार्य !
या सर्व पैलूंबद्दल लिहायचे तर मोठा खंडच होईल. फक्त काही मोजके पैलूच आपण पाहू.
मार्क्स आणि एंगेल्स यांच्यासोबत लेनिन यांचे नाव जगभरातील सर्व श्रमिक-दलित-वंचित-पीडितांच्या मनांत आणि हृदयांत नेहमीच सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. लेनिन यांनी आपल्या लिखाणातून आणि प्रत्यक्ष कृतीतून मार्क्सवादात अमूल्य भर घातली. त्यांच्या लिखाणाचे तब्बल ४५ जाडजूड खंड आहेत! त्यांच्या या अप्रतिम योगदानामुळेच आज शास्त्रीय समाजवादाच्या विचारसरणीला मार्क्सवाद-लेनिनवाद हे नाव जगभर रूढ झाले आहे.
पण लेनिन केवळ मार्क्सवादी विचारवंत कधीच नव्हते. मार्क्सवादी विचार प्रत्यक्ष कृतीत आणणारे ते अत्यंत प्रभावशाली क्रांतिकारक होते. रशियातील झारशाहीच्या दडपशाहीला टक्कर देणारे होते. त्यांचा मोठा भाऊ अलेक्झांडर याने झारची हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला फासावर चढवण्यात आले. पण लेनिन यांनी व्यक्तिगत दहशतवादाचा मार्ग नाकारला आणि ते मार्क्सवादाकडे वळले.
विद्यार्थी आणि कामगारांना संघटित करण्याचे काम त्यांनी सुरू केले. विद्यापीठातून त्यांना काढून टाकण्यात आले. अनेक वर्षे जेलमध्ये आणि पूर्व रशियातील निर्जन सायबेरिया भागात त्यांना शिक्षा म्हणून काढावी लागली. तरीही त्यांनी कम्युनिस्ट पक्ष बांधण्याचे काम सुरूच ठेवले. १८९८ साली स्थापन झालेली रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी (आरएसडीएलपी) हे तेव्हा त्यांच्या पक्षाचे नाव होते. शेवटी जेव्हा झारशाहीने त्यांना जीवे मारण्याचा आदेश काढला तेव्हा त्यांना नाईलाजाने रशिया सोडून अनेक वर्षे युरोपच्या देशांत निर्वासित म्हणून काढावी लागली. पण तेथूनही ते रशियातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते आणि आपल्या पक्षाचे समर्थ नेतृत्व करत होते.
लेनिन यांनी फार पूर्वीपासून कामगारवर्गातील आणि शेतकरीवर्गातील 'अर्थवादा'विरुद्ध मोठा संघर्ष सुरू ठेवला होता. म्हणजे आजच्या आपल्या संदर्भात बोलायचे तर पगारवाढ, बोनस, रास्त भाव, कर्जमुक्ती, मजुरीवाढ यासाठी लढतानाच कामगार-शेतकरी-शेतमजुरांच्या क्रांतिकारी राजकीय जाणिवा सातत्याने उंचावण्याचा ठोस प्रयत्न कम्युनिस्ट पक्षाने केला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे.
२०व्या शतकाच्या सुरुवातीला आरएसडीएलपी मध्ये एक प्रखर पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला. पक्षाची संघटना कशी असावी हा त्यातील कळीचा मुद्दा होता. १९०३ साली पक्षाचे अधिवेशन झाले. पक्षाच्या एखाद्या संघटनेत जो/जी नियमित आणि शिस्तीने काम करेल तोच/तीच पक्षाचा/ची सदस्य बनू शकतो/ते हे लेनिन यांनी ठामपणे मांडले. बहुसंख्य प्रतिनिधींनी ते मान्य केले. पण अल्पमतातील काही नेत्यांनी मांडले की या अटीची काहीही गरज नाही. या मुद्द्यावरून पक्षात फूट पडली आणि बॉल्शेव्हिक (बहुमतवाले) आणि मेनशेव्हिक (अल्पमतवाले) असे दोन गट पक्षात पडले. हे दोन गट आणि त्यांच्यातील संघर्ष रशियन क्रांतीपर्यंत कायम राहिला. लेनिन यांच्या नेतृत्वाखालील बॉलशेव्हिक पक्षाने क्रांती यशस्वी केली. विरोधी मेनशेव्हिक गटाने क्रांतिविरोधी भूमिका घेऊन तो रसातळाला गेला.
१९०५ साली रशियात झारशाहीविरुद्ध जनतेचा पहिला मोठा उठाव झाला होता, पण तो निर्घृणपणे चिरडण्यात आला. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि पहिल्या तीन वर्षांत झारखालील रशिया पराभवाच्या उंबरठ्यावर आला. जर्मनीचे आक्रमण सुरूच होते. झारशाहीविरुद्ध रशियन सैनिक, कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये उद्रेक वाढला. फेब्रुवारी १९१७ मध्ये पहिली रशियन क्रांती यशस्वी झाली आणि झारशाहीचे पतन झाले. या क्रांतीत मोठा सहभाग कामगार आणि बहुसंख्य शेतकरी कुटुंबांतून आलेल्या सैनिकांचा होता. पण सत्ता भांडवलदार-जमीनदार धार्जिण्या पक्षांकडे गेली. मात्र झारशाही गेल्यामुळे दडपशाही कमी झाली.
१६ एप्रिल १९१७ रोजी अनेक वर्षांनंतर लेनिन पुन्हा रशियात आले. त्यांचे जंगी स्वागत झाले. नव्या परिस्थितीत काय करायचे याविषयी पक्षात प्रचंड गोंधळ असताना त्यांनी लगेच 'एप्रिल थिसीस' या नावाने प्रसिद्ध असलेला कार्यक्रम पक्षापुढे मांडला. त्यात ताबडतोब समाजवादी क्रांतीची तयारी करण्याची हाक देण्यात आली. खऱ्या द्रष्ट्या नेत्याचे ते प्रतीक होते.
त्या काळात कामगार, शेतकरी आणि सैनिक यांची मंडळे निवडली जायची. त्यांना 'सोव्हिएट्स' म्हणत असत. लेनिन यांच्या आदेशाप्रमाणे या सोव्हिएट्स मध्ये बहुमत मिळविण्याची जबरदस्त राजकीय मोहीम बॉल्शेव्हिक पक्षाने सुरू केली. मेनशेव्हिक, सोशल रेव्होल्युशनरी व इतर सत्ताधारी पक्षांच्या हातातून ही सोव्हिएट्स काही महिन्यांतच जिंकून घेण्यात आली. देशातील बहुमत आपल्यासोबत आहे याची निश्चिती केल्यावर लेनिन यांनी क्रांतीची हाक दिली. तो ऐतिहासिक दिवस होता ७ नोव्हेंबर १९१७. जुन्या रशियन कॅलेंडरनुसार ती तारीख होती २५ ऑक्टोबर, म्हणून तिला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.
रशियन क्रांतीचा पहिला टप्पा यशस्वी झाला तो तेव्हा देशाची राजधानी असलेल्या सेंट पीटर्सबर्ग (पेट्रोग्रॅड) या शहरात. नंतर लगेच मॉस्को या मोठ्या शहरात असाच प्रचंड उठाव झाला. दोन्ही ठिकाणी मुख्य वाटा होता कामगारांचा आणि सैनिकांचा. नंतर क्रांती रशियाच्या अवाढव्य ग्रामीण भागात पसरली. येथे वर्गसंघर्ष झाला शेतकरी विरुद्ध जमीनदार. कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. या सर्व क्रांतिकारी संघर्षांत रशियातील महिलांचा फार मोठा वाटा राहिला.
क्रांतीला देशभर बळ मिळावे यासाठी ७ नोव्हेंबरला क्रांती यशस्वी होताच लेनिन यांनी त्याच दिवशी सायंकाळी रशियातील सोव्हिएट्सच्या सुरू असलेल्या देशव्यापी अधिवेशनास संबोधित केले आणि तीन कळीचे ठराव मांडले. ते तीन सुप्रसिद्ध ठराव प्रतिबिंबित होतात तीन शब्दांनी - शांतता, जमीन, भाकरी. हे तीन मुद्दे घेऊन क्रांती देशभर पसरली.
पण पराभूत झालेले रशियातील भांडवलदार-जमीनदार वर्ग स्वस्थ थोडेच बसणार होते? त्यांनी पाश्चिमात्य साम्राज्यवादी देशांना गळ घातली. या देशांतील सत्ताधाऱ्यांनीही रशियातील समाजवादी क्रांतीचा जबरदस्त धसका घेतला होता. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान अशा १४ साम्राज्यवादी देशांनी रशियन क्रांतीचा गळा पाळण्यातच घोटून टाकण्यासाठी आपली सैन्ये रशियात पाठवली. १९१८ पासून अटीतटीचे यादवी युद्ध सुरू झाले आणि ते १९२१ पर्यंत तीन वर्षे चालले. पण अखेर रशियातील कामगार-शेतकऱ्यांनी लाल सेना आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली या साऱ्यांची खांडोळी केली आणि आपल्या क्रांतीचे रक्षण केले. त्याच्या पुढच्या वर्षी १९२२ साली देशातील १५ राज्ये स्वखुशीने एकत्र येऊन 'युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकस्' (यूएसएसआर), म्हणजेच सोव्हिएत युनियनची निर्मिती झाली. या सर्व घटनांचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान या नात्याने लेनिन यांनी केले.
देशाच्या अर्थव्यवस्थेची बांधणी अत्यंत नव्या समाजवादी पद्धतीने आणि श्रमिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली. वर लिहिल्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे सर्व जनतेला हक्काने मिळेल याची सोय करण्यात आली. झपाट्याच्या समाजवादी औद्योगिकरणाला, शेतीतील आमूलाग्र सुधारणांना आणि देशाच्या संभाव्य शत्रूंपासून संरक्षणयंत्रणा उभारण्याला सुरुवात झाली. शोषणाचा अंत केल्यामुळे आणि लाल बावट्याचे सरकारच मुळी श्रमिकांचे असल्यामुळे निरक्षरता, उपासमार, बेरोजगारी, रोगराई आणि दारिद्र्य यांवर काही वर्षांतच मात करण्यात आली. महिलांना त्यांच्या गुलामीतून मुक्त करण्यात आले, त्यांना सर्व क्षेत्रांत समानतेचे हक्क मिळाले आणि सरकारच्या वतीने त्यांना विशेष सोयीसुविधा पुरविण्यात आल्या. मानवी इतिहासात हे सर्व आजवर कधीच घडले नव्हते. ती रोमहर्षक आणि गुंतागुंतीची कहाणी स्थलाभावी येथे देणे शक्य नाही.
एकाच वाक्यात सांगायचे तर, अमेरिकेला भांडवलशाहीत ज्या विकसित अवस्थेस पोहोचण्यास २५० वर्षे लागली, जवळपास तीच अवस्था समाजवादाखाली गाठायला रशियाला फक्त २५ वर्षे लागली, आणि तीही अमेरिकेतील भयानक विषमता टाळून! त्याची खरी कसोटी लागली दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या रानटी फॅसिझम विरुद्ध १९४१-४५ मध्ये सोव्हिएत युनियनने लढलेल्या जगातील आजवरच्या सर्वात घनघोर संघर्षात. त्या महायुद्धात जगभरातील अनेक देशांचे जे एकूण ५ कोटी लोक मारले गेले त्यातील तब्बल २ कोटी लोक एकट्या रशियाचे मारले गेले. पण अखेर विजय झाला सोव्हिएत युनियनचा, त्याच्या लढाऊ जनतेचा, लाल सेनेचा, कम्युनिस्ट पक्षाचा आणि अर्थातच समाजवादी व्यवस्थेचा! या अटीतटीच्या संघर्षाचे आणि तेजस्वी विजयाचे सरसेनापती होते कॉ. लेनिन यांचे उत्तराधिकारी कॉ. जोसेफ स्टालिन. रशियन लाल सेना जेव्हा जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये घुसली, तेव्हा ३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरला आत्महत्या करावी लागली!
लेनिन यांनी आयुष्यभर कामगार-शेतकरी एकजुटीचे निर्णायक महत्त्व अधोरेखित केले. महिलांना सर्व क्षेत्रांत समानता देण्यासाठी अद्वितीय कार्य केले. रशियातील मागास आणि उपेक्षित राष्ट्रगटांचा आणि सर्व धर्मियांचा जलद व समान विकास करण्यासाठी प्रभावी धोरण आखले व ते अमलात आणले.
'साम्राज्यवाद - भांडवलशाहीची अत्युच्च अवस्था' या त्यांच्या पुस्तकात त्यांनी या लुटारू व्यवस्थेचे अचूक विश्लेषण केले. साम्राज्यवाद ही जागतिक व्यवस्था असल्याने तिचा सामना जगभरातील कामगार-शेतकरी यांनी एकत्र येऊन केला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्या दिशेनेच १९१९ साली त्यांनी पुढाकार घेऊन तिसरे कम्युनिस्ट इंटरनॅशनल स्थापन केले आणि जगभरच्या कम्युनिस्टांच्या एकजुटीचे रणशिंग फुंकले. भारतातील स्वातंत्र्यलढ्याला तसेच अन्य वसाहती देशांतील मुक्तिलढयांना लेनिन यांनी आपले पूर्ण समर्थन दिले. शहीद भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद, सुब्रमण्यम भारती आणि देशातील इतर अनेक प्रमुख व्यक्तींनी लेनिन आणि समाजवादी रशियाकडून प्रेरणा घेतली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक शक्ती त्यातून प्रभावित झाल्या.
लेनिन यांचे राजकीय-वैचारिक-संघटनात्मक कार्य अफाट होते. त्यांची गाजलेली काही पुस्तके पुढीलप्रमाणे: 'मार्क्सवादाचे तीन स्रोत आणि तीन घटक', 'लोकशाही क्रांतीत समाजवादी लोकशाहीचे दोन डावपेच', 'काय केले पाहिजे?', 'एक पाऊल पुढे, दोन पावले मागे', 'शासनसंस्था आणि क्रांती', 'सोविएत सरकारची तातडीची कार्ये', 'डावा कम्युनिझम - एक बालरोग', 'साम्राज्यवाद - भांडवलशाहीची अत्युच्च अवस्था' आणि त्यांची अनेक भाषणे व लेख ही खरोखरच एक वैचारिक मेजवानी आहे. पण त्याचबरोबर त्यांनी दोन इशारेही देऊन ठेवले आहेत. एक, "मार्क्सवाद म्हणजे पोथी नव्हे, ते कृतीसाठी मार्गदर्शन आहे." आणि दोन, "ठोस परिस्थितीचे ठोस विश्लेषण हे द्वंद्वात्मकतेचे सार आहे."
आजच्या परिस्थितीत जेव्हा साम्राज्यवादी आक्रमकपणा सर्व क्षेत्रांत मोकाट सुटला आहे, जगभरात आर्थिक अरिष्ट प्रचंड वाढले आहे आणि कोरोनामुळे ते जास्त गडद होणार आहे, आपल्या देशात अतिभांडवलशाहीच्या धर्मांध व फॅसिस्ट शक्ती श्रमिक जनतेवर, लोकशाहीवर, धर्मनिरपेक्षतेवर, अर्थव्यवस्थेवर आणि संविधानावर जीवघेणे हल्ले करत आहेत, कोरोनामुळे पाश्चात्य साम्राज्यवादी देश त्यांच्याच अतिखाजगीकरण केलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे सर्वात जास्त मेटाकुटीला आले आहेत, समाजवादी देश आणि आपल्याकडचे डावे राज्य केरळ हेच कोरोनाचा सर्वात यशस्वी सामना करत आहेत - अशा वेळी कॉ. लेनिन यांचे उत्तुंग जीवनकार्य एखाद्या दीपस्तंभासारखे आपणास प्रेरणा देत आहे, आपला निर्धार वाढवत आहे आणि मार्ग कठीण असला तरी विजयावर आपला आत्मविश्वास द्विगुणित करत आहे. कॉ. लेनिन यांना त्यांच्या १५०व्या जयंतीदिनी लाख लाख लाल सलाम!
डॉ. अशोक ढवळे
सदस्य, माकप केंद्रीय कमिटी
अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा

No comments:

Post a Comment