जीवनमार्ग बुलेटिन: २४
शुक्रवार, २४ एप्रिल २०२०
कोरोना समाजवादाचा पराभव करील किंवा समाजवाद कोरोनाचा
आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुख अर्थतज्ञ श्रीमती गीता गोपीनाथन यांनी जगाच्या आगामी आर्थिक स्थितीविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर उणे तीन झाल्याने आत्ताच परिस्थिती कठीण झाली आहे. आणि त्यांच्या मते, येत्या काही महिन्यात ती सुधारण्याची सुतराम शक्यता नाही. भारतीय असून आणि नावात देवादिकांचे अस्तित्व असूनही त्यांनी ती सुधारण्यासाठी मंत्रतंत्र वा यज्ञयाग करायचा सल्ला दिलेला नाही. ही परिस्थिती अशीच राहिल्यास वर्षाच्या अखेरीस जगाचे सुमारे साडेसहा लाख अब्ज रुपयांचे नुकसान होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या क्रिस्तालिना जॉर्जिएव्हा यांना हे चित्रही जरा जास्तच आशादायक रंगात चितारलेले आहे, असे वाटते.
आताच जगात २० लाखांहून अधिक लोकांना कोव्हिड-१९ ची लागण झालेली असून १ लाख ६५ हजार जण मरण पावले आहेत. न्यू यॉर्क टाईम्सच्या एका बातमीनुसार ११ विकसित देशांनी जाहीर केल्याहून मृतांची संख्या ३६,००० नी अधिक आहे. त्यामुळे सर्वच विकसित देशांची, विशेषतः अमेरिकेची किंकर्तव्यमूढ अशी अवस्था बनली आहे. ते देश या रौद्र वादळात कुठे तरी कधी तरी किनाऱ्याला लागू या आशेने हातपाय मारत आहेत. पाणी वाढत असताना अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे बोट सोडून दिले आहे. पण त्याने तो देश कसा तरून जाणार हेही एक कोडेच आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
व्हिएतनामचा जागतिक भ्रातृभाव
या भीषण काळोखात काही दिवे प्रकाशताना दिसत आहेत. या आधीच्या बुलेटिनमध्ये आपण क्यूबाच्या या बाबतीतल्या कामगिरीचा काहीसा मागोवा घेतला. पण जगात तेवणारा तो एकमेव दीप नाही. आपल्या पूर्वेची दिशाही उजळताना दिसत आहे. हा प्रकाश दाखवणारा देश आहे व्हिएतनाम. जगाचा पश्चिमार्ध असो वा पूर्वार्ध, आशा दाखवणाऱ्या व्यवस्था समाजवादी आहेत, हा योगायोग नाही. माणसाला सुरक्षित जीवनाची हमी देणारी तीच सामाजिक अवस्था आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. फक्त आपण खोट्या विचारसरणीच्या बहकाव्यात येऊन भांडवलशाहीच्या मगरमिठीतून सुटायचे धाडस करत नाही, इतकेच.
जानेवारी महिन्यात वुहानहून ‘ती’ बातमी आली तेव्हा बहुतेक सारे जग अज्ञानाच्या सुखात रममाण होते. पण व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी त्याच वेळी तातडीने ही साथ रोखण्यासाठी एक पथक निर्माण केले. ‘आपल्याला एका शत्रूशी लढायचे आहे,’ अशी स्पष्ट कल्पना त्यांनी देशवासियांना दिली होती. तपासणी, संपर्कशोध, विलगीकरण हे उपाय लगेच हातात घेतलेच, पण त्याचबरोबर संपूर्ण आरोग्य व्यवस्था जय्यत ठेवली. आणिबाणीला तोंड देण्यासाठी अस्तित्वातील आरोग्य कार्यकर्त्यांच्या जोडीला निवृत्त झालेल्या डॉक्टर आणि नर्सेसनाही पाचारण केले. मिलिटरी मेडिकल अकादमी आणि व्हिएत ए कॉर्पोरेशन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एक स्वस्तातले तपासणी किटही तयार केले. या विषाणूविषयी जनतेत जागृतीची व्यापक मोहीम राबवायला सुरूवात केली. त्याची लागण झालेल्या रुग्णांशी आपलेपणाने, माणुसकीच्या नात्याने वागण्यावर विशेष भर दिला. त्यासाठी तयार केलेल्या गाण्याची चित्रफीत खूपच लोकप्रिय झाली. या प्रयत्नांमुळेच व्हिएतनाममध्ये कोव्हिड-१९ चे फक्त २६८ रुग्ण असून त्यापैकी २२४ बरेही झाले आहेत. मुख्य म्हणजे एकही मृत्यू नाही.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जणू अघटितच घडले. व्हिएतनामने साडेचार लाख संरक्षक सूट अमेरिकेला पाठवले. त्याच बरोबर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन आदी देशांना साडेसात लाख मास्कही पुरवले. जर्मनीत लस शोधण्यासाठी चाललेल्या संशोधनास मदत म्हणून सहा हजार टेस्ट ट्यूब्ज पाठवून दिल्या. याशिवाय, लाओस, कंबोडिया, चीन आदी देशांना केलेली मदत वेगळीच. इतकेच नव्हे, तर या भारताच्या मागून स्वतंत्र झालेल्या देशाने २१ एप्रिल रोजी १ लाख मास्क आपल्या जनतेला भेट दिले.
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्मृतीपटलावरील धूळ झटकणे आवश्यक आहे. वरील सर्व युरोपियन देशांच्या मदतीने अमेरिकेने व्हिएतनामवर १९६०च्या दशकात एक नव्हे, दोन नव्हे तर पाच लाख टन वजनांचा बॉंबवर्षाव करून अख्खा देशच्या देश बेचिराख करून टाकला होता. त्यांनी टाकलेल्या रासायनिक बॉंब्जनी तेथील शेती कित्येक पिढ्यांसाठी नापीक करून टाकली होती. त्याच राख करणाऱ्या हातांना आज व्हिएतनाम माणुसकीच्या नात्याने मदत करत आहे. विज्ञानाची कास घट्ट धरून व्हिएतनामने त्या राखेतून उसळी घेतली असून अवैज्ञानिक जाणिवांनी ग्रासलेल्या अमेरिकेला तो आज आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा आधार देऊ लागला आहे. हा इतिहासाने दिलेला काव्यगत न्याय नाही, तर काय आहे? “आजादी का दूसरा नाम: व्हिएतनाम, व्हिएतनाम” ही घोषणा जगात उगाचच दुमदुमली नाही.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
१९१८-१९ च्या फ्लूची जागतिक साथ
कोरोना, निपाह सारख्या मानवतेला नष्ट करू पाहणाऱ्या साथींवर रामबाण उपाय करायलाच समाजवाद जन्माला आला की काय कोण जाणे ! कोव्हिड-१९ च्या उत्पाताने आपल्याला शंभर वर्षापूर्वी साऱ्या जगात हाहाःकार माजवलेल्या फ्लूच्या विषाणूचे स्मरण करून दिले आहे. त्याने पाच कोटी लोकांचा बळी घेतला होता. बॉम्बे फ्लू म्हणून भारतात ओळखल्या गेलेल्या त्या फ्लूने आपल्या देशातही जवळजवळ पावणेदोन कोटी बळी घेतले होते. गांधीजीही त्या काळात आजारी पडले होते, परंतु सुदैवाने लोकांना आशंका होती त्याप्रमाणे तो फ्लू निघाला नाही. मात्र, बापूजींचा मुलगा हरीलालची पत्नी गुलाब आणि त्यांचा मुलगा शांती हे मात्र त्या साथीतून वाचले नाहीत, अशी आठवण या साथीच्या निमित्ताने गोपाळकृष्ण गांधींनी एका लेखात दिली आहे. पहिल्या महायुद्धातील सैनिकांनी तो विषाणू जगभर पसरवला होता. स्पॅनिश फ्लू म्हणून नोंद झालेल्या या फ्लूचा उगम होता अमेरिकेतील कन्सासमधील. यासारख्याच आणखी एका विषाणूने १८८९-९० साली मोठी साथ पसरवली होती. त्याच्या प्रादुर्भावासही नव्याने सुरू झालेला नाविक प्रवासच कारणीभूत होता. त्या साथीत विशेषतः लहान मुले आणि वृद्ध प्रामुख्याने बळी पडले होते. कोव्हिड-१९ चेही विमान आणि इतर प्रवासाशी घनिष्ट नाते आहे.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सने एक साथरोग आयोगच स्थापन केला. युद्धाच्या सोबतीने टायफॉईड, अतिसार, देवी, कॉलरा आणि फ्लू अशा वेगवेगळ्या साथी जगभर मोठ्या प्रमाणावर पसरल्या होत्या. या आयोगाने त्या काळात बरेच काम केले. या आयोगाचेच पुढे जागतिक आरोग्य संघटनेत रूपांतर झाले.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
समाजवादी आरोग्य व्यवस्था
१९१७ साली रशियात बोल्शेव्हिक क्रांती झाली होती. स्पॅनिश ‘आजारा’ने नव्या समाजवादी समाजालाही सोडायचे कारण नव्हते. मोदींवर आहे तसा समाजवादावर काही कुठला दैवी वरदहस्त नव्हता. १९१८ मध्ये दर आठवड्याला तेथे १५० जणांना लागण होऊ लागली. पण त्याचवेळी सोव्हिएत समाजाला टायफस नावाच्या आणखी एका रोगराईने जबर झपाटले होते. कृमींनी लागण होणाऱ्या या रोगास लोक विशेषतः युद्धकाळात मोठ्या प्रमाणावर बळी पडत. टायफस हे सोव्हिएत युनियनसमोरील सरंजामी आणि भांडवली विषाणूंसोबत आणखी एक आव्हान होऊन बसले होते. तेव्हा लेनिनने उद्गार काढले होते, “एक तर समाजवाद या कृमींचा पराभव करील, नाही तर या कृमी तरी समाजवादाचा पराभव करतील !”
पण समाजवादाने कृमीचा पराभव केला. सोव्हिएत युनियनला झारशाहीच्या हातून मिळालेली आरोग्यव्यवस्था अगदीच दिव्य असल्याने या नव्या समाजाला सुरवातीपासून काम करावे लागले. त्यासाठी २१ जुलै १९१८ रोजी सार्वजनिक आरोग्य खाते निर्माण करण्यात आले. ही सरकारनिर्मित पहिली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. अमेरिकेने हे खाते सुरू केले १९५३ मध्ये. लोकांचे आरोग्य हा विशेषाधिकार नसून तो मूलभूत हक्क असल्याचे ओळखून काम करण्याचा आदेश या खात्याला देण्यात आला. त्यामुळे तेव्हापासूनच सर्व आजारांवर सोव्हिएत युनियनमध्ये मोफत उपचार सुरू झाले. आरोग्य हा हक्क बनल्याने तो पुरवणे ही सरकारची जबाबदारी बनली. आरोग्य क्षेत्रातून नफ्याचे उच्चाटन करण्यात आले. विषाणूचा प्रसार रोखण्यात समाजवादी आरोग्य व्यवस्थेची मोठी कामगिरी आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
लोक सहभाग
आरोग्य राखणे ही काही डॉक्टर आणि नर्सेस यांचीच फक्त जबाबदारी नाही, असे ठरवून जनतेला त्या व्यवस्थेत सहभागी करून घेण्यात आले. साथ आटोक्यात आणण्यासाठी कामगारांच्या समित्याच स्थापन करण्यात आल्या. समाजाला रोगांविषयी वैज्ञानिक माहिती पुरवणे, सार्वजनिक स्वच्छता राखण्यास मदत करणे आणि रुग्णास योग्य ती वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी दक्ष राहणे आदी जबाबदाऱ्या त्या समित्यांवर सोपवण्यात आल्या. या समित्यांच्या कामाविषयी “आपण टायफस आणि कॉलरा रोखू शकलो तो या समित्यांच्या मदतीनेच” असे गौरवोद्गगार त्या खात्याच्या प्रमुखाने काढल्याची नोंद आहे. लोकांचा कृतिशील सहभाग हा सोव्हिएट आरोग्य व्यवस्थेचा अंगभूत भाग बनला.
या लोकसहभागामुळेच रोग प्रतिबंधक उपायांवर मोठा भर देता आला. या प्रतिबंधक उपायांत कामगार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, याचाही समावेश जाणीवपूर्वक करण्यात आला. त्यामुळे कुठल्याही रोगराईत स्थलांतरितांना वाऱ्यावर सोडून द्यायची आफत त्या समाजावर आली नाही. एका नॉर्वेच्या वार्ताहराने १९२० मध्ये केलेली नोंद आपल्या डोळ्यात अंजन घालणारी ठरावी, “सर्व राहत्या ठिकाणांचे राष्ट्रियीकरण केलेले असल्याने आरोग्याला घातक वातावरणात कुणालाच राहावे लागत नाही. सर्व धान्यव्यापार सरकारच्या ताब्यात असल्याने आजारी लोकांना प्रथम अन्न देण्याची तरतूद करण्यात आली आहे.” त्यामुळे सोव्हिएत समाजात रोगनियंत्रण करणे तुलनेने सोपे जाई. भारताच्या महानगरात उत्तुंग इमारतींमधील महालासारखे हजारो फ्लॅट रिकामे पडले आहेत, गोदामात साडेसात कोटी टन धान्य सडत आहे आणि स्थलांतरित कामगार बेघर होऊन अन्नान्न दशेत फिरत आहेत.
साहजिकच “आम्ही स्पॅनिश फ्लूवर पाश्चात्य जगापेक्षा जास्त चांगल्या रीतीने मात करू शकलो” असे तो समाज अभिमानाने दावा करू शकला तो त्या समाजवादी आरोग्यव्यवस्थेच्या जोरावरच. हीच परंपरा चीन, क्यूबा आणि व्हिएतनामच नव्हे तर आपला केरळही पुढे चालवत आहे. केरळमधील यश उभे आहे ते १९१७ नंतर सोव्हिएट युनियन, १९४९ नंतर चीन, १९५९ नंतर क्यूबा आणि १९७५ नंतर व्हिएतनाम या देशांनी स्वीकारलेल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमागील खासगी नफा नव्हे तर माणूस हा केंद्रबिंदू असल्याच्या विचारसरणीवर. त्या देशांतील लोक लेनिनच्या सुरात सूर मिसळून म्हणत असतील, “समाजवाद या कोरोनाचा पराभव करील, नाही तर कोरोना समाजवादाचा पराभव करील.”
ता. क. - समाजवादाची कास सोडलेल्या रशियात या घडीला कोरोनाचे ६८,००० हून अधिक रुग्ण असून मृतांची संख्या आहे ६१५.
___________________________________________________________________________________________________________
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग

No comments:
Post a Comment