Tuesday, 25 August 2020

१६ - शेतकऱ्याची भयावह कोंडी


 जीवनमार्ग बुलेटिन: १६

गुरूवार, १६ एप्रिल २०२०

शेतकऱ्याची भयावह कोंडी

कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावाने जगभरात शेती आणि अन्नसुरक्षेविषयी चिंता निर्माण केली आहे. गोरगरिबांना उपासमार आणि कुपोषणातून वाचवले नाही, तर देशादेशांना घनघोर अन्नटंचाईला सामोरे जावे लागेल, असा जागतिक अन्न व शेती संघटनेने (Food and Agriculture Organization - FAO) इशारा दिला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना आपल्या शेतावर कामच करणे अवघड होत असल्याने, त्यांना किफायतशीर भाव मिळत नसल्याने आणि बाजारपेठेत प्रवेश मिळत नसल्याने त्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. कोव्हिड-१९चा शेतीवर काय परिणम झाला आहे, याचा विचार करायचा झाल्यास आपल्याला तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील: १. जगातील सर्व जनतेचे पोट भरेल इतके अन्नधान्य जगात उपलब्ध आहे का? २. ते परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे का? आणि ३. शेतकरी लॉकडाऊनशी कसा सामना करत आहेत?
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
अन्नधान्य साठे आणि किंमती
गहू, भात, ज्वारीसारख्या तृणधान्याचा एप्रिल २०२० रोजी जगात एकूण साठा होता सुमारे ८६.१० कोटी टन. ही परिस्थिती “समाधानकारक” आहे, असे FAO चे मत आहे. गहू, तांदूळ आणि इतर भरड धान्यांची परिस्थिती तर जास्तच चांगली आहे. जगातील साठा समाधानकारक असेल तर सर्व देशांतील साठे समाधानकारक असतीलच असे नव्हे. गव्हाच्या जागतिक साठ्यापैकी ५२% साठा चीनकडे आहे आणि तांदळाच्या जागतिक साठ्याचा २०% साठा भारताजवळ आहे. देशात अन्नधान्याची परिस्थिती चिंताजनक होऊ लागल्यास देश निर्यात थांबवू शकतील. भारताने केलेला लॉकडाऊन लांबल्यास भारतातून तांदळाच्या आयातीवर विसंबून असलेल्या देशांची परिस्थिती कठीण होऊ शकेल.
गव्हाचा मोठा निर्यातदार असलेल्या कझाकस्तानने निर्यात बंदी केली आहे. तांदळाचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या व्हिएतनामने त्याची निर्यात थांबवली आहे. त्यामुळे तांदळाच्या जागतिक निर्यातीत १५% घट होईल. भारत आणि थायलंड यांनीही तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यास जगातील तांदळाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटेल. युरोपियन युनियन आणि फिलिपीन्स तांदळाची मोठी आयात करतात. मार्च २०२० मध्ये त्यांच्याकडे तीन महिने पुरेल इतका तांदळाचा साठा होता. इतर देशांजवळ मात्र केवळ एक महिना पुरेल इतकाच तांदळाचा साठा होता. जगातील लॉकडाऊन आणखी लांबल्यास अनेक देशांना अन्नटंचाई भेडसावू लागेल.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
२०१९-२० मध्ये भारताचे धान्य उत्पादन सुमारे २९.२० कोटी टन होण्याचा अंदाज आहे. अन्न महामंडळाजवळ गहू आणि तांदळाचा एकूण ७.७५ कोटी टन साठा पडून आहे. त्यातील २.१४ कोटी टन शिल्लक ठेवावा लागतो. भारतात डाळींचा मार्च २०२० मध्ये साठा होता २२.५० लाख टन. आता रबीचा हंगाम असल्याने एप्रिल अखेरीस या परिस्थितीत आणखी सुधारणा होणे साहजिक आहे.
मागणी आणि पुरवठा दोन्ही एकाच वेळी घटल्यास किंमती काय राहतील हे अनिश्चित असते. उत्पादन, साठे, आवक आणि पुरवठ्यातील अडथळे यांच्यापोटी वेगवेगळ्या बाजारपेठांतील किंमती वेगवेगळ्या असतात. FAO च्या म्हणण्यानुसार अन्नधान्याची मागणी कमी झाल्याने फेब्रुवारी-मार्च २०२० च्या दरम्यान तृणधान्यांचा किंमत निर्देशांक ४.३ टक्क्यांनी उतरला आणि जैविक इंधनाची मागणी कमी झाल्याने मक्याची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली. परंतु, पाश्चात्य अर्थव्यवस्थांत मार्च २०२० मध्ये तांदूळ आणि गव्हाच्या किरकोळ किंमती चढ्याच राहिल्या. लोकांनी भीतीने वाढवलेली खरेदी, निर्यातीवरील बंधने आणि पुरवठा साखळीतील विघ्ने ही या किंमती चढ्या राहण्यास कारणे होती. बीफ आणि अंड्याच्या किंमतीही वाढतच राहिल्या.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भारतातील मार्च २०२० चे घाऊक आणि ग्राहक किंमत निर्देशांक अजून प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. २०१९च्या मध्यापासून हे दोन्ही निर्देशांक वाढत आले होते. त्याचे प्रतिबिंब भाजीपाला आणि विशेषतः कांदा यांच्या दरात पडलेले दिसते. २०२०च्या जानेवारी-फेब्रुवारीत दर काहीसे उतरले, तरी भाजीपाल्याचे दर मात्र चढेच राहिले. लॉकडाऊनमुळे आधीच वाढलेल्या किंमती जास्तच वाढण्याची शक्यता असते.
मात्र, पाश्चात्य देशांप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात भारतातील अन्नधान्याच्या किंमती वाढल्या नाहीत. पुरवठा घटला तशीच मागणीही घटली. मुंबईच्या वाशी कृषि उत्पन्न बाजार समितीत लॉकडाऊनच्या आधी दररोज ६०० ते ७०० ट्रक माल येत असे, तो आता २०० ट्रकवर आला आहे. तरीही, धान्ये आणि भाजीपाला यांचे घाऊक दर स्थिरच राहिले आहेत. डाळींच्या दरात मात्र काही वाढ झाली आहे. लोकांच्या खाण्यातील अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे प्रमाण घटल्याचा हा परिणाम आहे. तसेच, दुधाचा वापरही १०-१२ टक्क्यांनी घटला आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
शेतीतील अरिष्ट
भारतात शेतीतील उत्पादन आणि शेतीमालाचे पणन या दोन्ही व्यवस्था अरिष्टात आल्या आहेत. त्याची कारणे: अ. सरकारच्या वतीने होत असलेल्या धान्यखरेदीतील अडथळे; ब. शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात व्यापाऱ्यांना होत असलेले अडथळे; क. रबीच्या हंगामातील मजुरांची टंचाई; ड. उपलब्ध ट्रक ड्रायव्हरची अपुरी संख्या; इ. मालवाहतुकीवरील बंदी; ई. बाजार समित्यांचे रोडावलेले कामकाज; आणि फ. किरकोळ वस्तूंची ठप्प झालेली बाजारपेठ.
दुसरे म्हणजे, पुरवठा साखळीतील या अडथळ्यांमुळे शेताच्या बांधावरच शेतमालाचे दर पडलेले आहेत. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी टोमॅटो २ रु. किलोने विकावे लागले. मध्य प्रदेशात गव्हाचा दर प्रतिक्विंटलला २२०० वरून १६०० रुपयांवर उतरला. पंजाबमध्ये भाजीपाला प्रतिकिलो १५ रुपयांवरून अक्षरशः एका रुपयावर घसरला. दिल्लीमध्ये ब्रॉयलर कोंबडीचा दर जानेवारी महिन्यात ५५ रु. किलो होता तो मार्चमध्ये २४ रुपयांवर आला. तामीळनाडुत अंड्याचा दर ४ रुपयांवरून १.९५ रुपये झाला.
तिसरे, स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर घराकडे परतल्यामुळे रबी हंगामात तयार झालेले पीक शेतात तसेच उभे असून त्याचे मातेरे होऊ लागले आहे. यंत्राने त्याची कापणी वगैरे करता येत असली तरी ती चालवणारे तंत्रज्ञ पुरेश्या संख्येने उपलब्ध नाहीत. भाताच्या बहुतेक गिरण्यात स्थलांतरित कामगारच काम करतात. ते घरी गेल्याने या गिरण्या शेतकऱ्यांकडून भात विकत घेईनाश्या झाल्या आहेत. दुग्धजन्य पदार्थांच्या कारखान्यात, शीतगृहांत आणि गोदामात काम करायलाही कामगार नाहीत.
चवथे, भारतभर पुरवठा साखळी कमालीची खंडित झाली आहे. शेतीमालाचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये केलेला असला, तरी ५ लाख ट्रक्स राज्याराज्याच्या सीमांवर आणि महामार्गांवर अडकून पडले आहेत. दुधाचे भरलेले टॅंकर आपल्या इच्छित ठिकाणी पोचत असले तरी रिकामे टॅंकर अडकून पडतायत. त्यामुळे दूध पुरवठा खंडित होत आहे. ट्रक्सचे चालक घरी गेल्याने ते जागच्या जागी थांबून आहेत. ट्रक्स नसल्याने आयात केलेल्या खाद्यतेलांचे साठे बंदरात पडून आहेत. बाजार समित्या आठवड्यातून एखाद दुसरा दिवसच चालतात. पशुखाद्याचा पुरवठा नाही आणि त्यामुळे पशुपालकांचे कंबरडे मोडले आहे.
भारतात काय आणि जगात काय, भरपूर धान्यसाठा आहे. पण जागतिक व्यापार आक्रसल्याने आणि पुरवठ्यात विघ्न आल्याने प्रदीर्घ काळ चालणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेक देशांची अन्न सुरक्षितता धोक्यात येणार आहे. पाश्चात्य देशांत घबराटीतून विनाकारण मोठी खरेदी आणि घरगुती साठे केल्याने अन्नधान्याच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. भारतात अजून अन्नधान्यांच्या किंमती वाढलेल्या नाहीत, याचे कारण अन्न सेवनात, विशेषतः गरिबांच्या अन्न सेवनात, झालेली मोठी घट. लोकांची उपासमार होत असल्याने मार्च महिन्यात अन्नधान्याच्या किंमती फारश्या वाढणार नाहीत. शेतकऱ्यांना शेतमजुरांची टंचाईही मोठ्या प्रमाणात भेडसावत असून त्यात बांधावरच्या विक्री किंमतीतील घसरण आणि बाजारपेठेच्या बंद झालेल्या वाटा या समस्यांची भर पडली आहे. या परिस्थितीत कुणाचा लाभ होतो हे कळायला मार्ग नसला तरी शेतकरी, कामगार आणि गोरगरीब एका भयानक कोंडीत सापडलेले आहेत, हे मात्र खरे.
__________________________________________________________________________________________________________
प्रा. डॉ. आर. रामकुमार
आर. रामकुमार हे मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेत नाबार्ड अध्यासनाचे प्राध्यापक आणि केरळ राज्य नियोजन आयोगाचे सदस्य आहेत.

No comments:

Post a Comment