Tuesday, 18 August 2020

८ - पोलादी पुरूष की भुसा भरलेलं बुजगावणं?


जीवनमार्ग बुलेटिन: ८

बुधवार, ८ एप्रिल २०२०

पोलादी पुरूष की भुसा भरलेलं बुजगावणं?

हा छप्पन इंची छातीचा पोलादी पुरूष नसून भुसा भरलेलं बुजगावणं आहे, हे ट्रंपतात्यांनी केव्हा ओळखलं? मॅडिसन स्क्वेअरमध्ये “हाऊ डी, मोडी” म्हणताना, की अहमदाबादेतला साष्टांग दंडवत स्वीकारताना? आम्ही भारतातील डॉक्टर, नर्सेस आणि सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या जीवनावर कोरोनाची कृष्णछाया पडू नये, यासाठी पणत्या पाजळत असताना त्यांची कवचकुंडले मागायचा ट्रंपतात्याचा हट्ट आमचे पंतप्रधान पुरवत होते. ‘वाक म्हणालो तर यानं पायच धरले’, या विचारानं तात्या मनातल्या मनात हसत असणार.
हैड्रोक्सी-क्लोरोक्विन हे मलेरियावरील गुणकारी औषध कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यक आहे. भारतात हे औषध स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात तयार होतं. त्याचा गुण लक्षात येताच २५ मार्च रोजी भारत सरकारनं त्याच्या निर्यातीवर काही बंधनं घातली. पुढे परिस्थिती गंभीर होऊ लागली तशी ३ एप्रिलला ही बंधनं आणखी कडक केली. अमेरिकेला या औषधाची गरज असल्यानं तात्यानं डोळे वटारताच मोदींची गाळण उडाली, आणि त्यांनी अमेरिकेला पूर्ववत त्याचा पुरवठा करण्याची हमी देऊन टाकली.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भारताकडे त्या औषधाचा पुरेसा साठा आहे, अशी फसवाफसवी आता सरकार सुरू करील. तो साठा पुरेसा असता तर मुळात भारतानं निर्यातीवर बंदी घातलीच नसती. त्यामुळे मोदी सरकारला आता पलायन करायला फारसा वाव राहिलेला नाही. वरील औषध भारतात मोठ्या प्रमाणावर बनवणाऱ्या शंभरहून जास्त कंपन्या आहेत. पण त्याचा कच्चा माल मात्र भारतात तयार होत नाही. तो चीनहून मागवावा लागतो. खरं तर, विविध प्रकारच्या पक्क्या औषधांना लागणारे कच्चे API ‘सक्रिय औषधी घटक’ जगाला चीनच मोठ्या प्रमाणावर पुरवतो. त्याची ४० टक्के बाजारपेठ चीनच्या ताब्यात आहे.
अमेरिका चीनकडून हे औषध का मागवत नाही? कारण चीन त्यांना किंमत पाडून माल विकणार नाही. शिवाय, अमेरिकेची चीनकडून होणारी आयात ही निर्यातीहून कितीतरी जास्त आहे. या कारणानं अमेरिकेला चीनशी आतबट्ट्याचा व्यवहार करायचा नाही. शिवाय, जगावर दादागिरी करायच्या अमेरिकन प्रयत्नातला मुख्य अडसर आहे, चीनचा. त्यामुळे थेट चीनशी व्यवहार न करता अमेरिका भारताला दलाल बनवून हे औषध मिळवू पाहात आहे. याबाबतीत मोहन भागवतांच्या मताला फारशी किंमत न देता चीननं भारताशी सौहार्दाचे संबंध ठेवलेले आहेत.
— — — — —— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
खरं तर, आज कोरोनाशी लढाई केवळ देशाच्या स्तरावर करणं अवघड आहे. आजवरच्या कुठल्याच महायुद्धात गुंतले नव्हते इतके देश या लढाईत गुंतले आहेत. आधीची युद्धं भौगोलिक सीमांवर लढली गेली. या विषाणूने वित्त भांडवलाकडून सगळ्या भौगोलिक सीमा उधळून लावण्याचा गुण घेतलेला दिसतो. नफ्याशिवाय वित्त भांडवल जगू शकत नाही, तर मानवी गळ्याशिवाय कोव्हिड-१९! दोन्ही माणसाचा गळा आवळणाऱ्या व्याधी आहेत. माणसानं जगण्यासाठी या दोन राक्षसांच्या तावडीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी आता जागतिक स्तरावरही प्रयत्न करायला हवेत.
असा जागतिक पुढाकार घेण्याची युनोची क्षमता अमेरिकेनं शीतयुद्धाचं निमित्त सांगत पार खच्ची करून टाकली आहे. युनोचे ठराव ही कोल्हेकुई ठरवत अफगाणिस्तान, इराक, लिबिया, सीरिया आदी देश बेचिराख केले. जग कसं चालेल, याचे निर्णय जी-२० या सधन देशांच्या हातात घेतले. कोरोनासारख्या रोगराईबाबत त्यांनी पुढाकार घेत जगाचं नेतृत्व करायला हवं होतं. परंतु सहकार्य हा गुण भांडवली देशांच्या डीएनएमध्येच नसल्यानं ते आज परस्परांनाही मदत करताना दिसत नाहीत. अमेरिकेने तर कोरोनावरील लस जर्मनीलासुद्धा न मिळता फक्त अमेरिकेला मिळावी, म्हणून एका जर्मन कंपनीलाच फितवायचा कार्यक्रम करून पाहिला.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
अशा परिस्थितीत क्यूबासारखा इवलासा देश इटलीला संकटकाळात मदतीसाठी धावून गेला. तेच समाजवादी औदार्य दाखवत चीनने भारताला त्याचे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी १,७०,००० वैयक्तिक सुरक्षा साधनांची मदत दिली. हेच परस्पर सहकार्य पुढं नेत चीन आणि भारतानं मलेरियावर उपचार करणाऱ्या वरील औषधाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला हवं. त्याचा आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वच मागास देशांतील रुग्णांना, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ होईल.
हा समाजवादी संदेश मोदींना काही पचायचा नाही, कारण मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या जोडीनं कम्युनिस्ट हा रास्व संघाचा पहिल्या नंबरचा शत्रू असल्याची संथा गोळवलकर गुरूजींनी देऊन ठेवलेली आहे. गोऱ्यांच्या भक्तीचं बाळकडू १९२५ पासूनच चाखलेलं असल्यानं मोदीसाहेब ट्रंपतात्यापुढं दातात तृण धरून उभे राहिले आहेत. ‘नवरा म्हणू नये आपला आणि साप म्हणू नये बापडा’ या मराठी म्हणीचं प्रत्यंतर मोदींनी पुन्हा एकदा भारतीय जनतेला आणून दिलं आहे.
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग
______________________________________________________________________________________________________

No comments:

Post a Comment