Wednesday, 26 August 2020

३० - कम्युनिस्ट चळवळीचे दोन ऐतिहासिक जागतिक विजय

 

जीवनमार्ग बुलेटिन: ३०

गुरुवार, ३० एप्रिल २०२०

कम्युनिस्ट चळवळीचे दोन ऐतिहासिक जागतिक विजय

आज ३० एप्रिल, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या. ह्या दिवशी कम्युनिस्ट चळवळीने अपार त्यागातून आणि अपूर्व बलिदानातून दोन ऐतिहासिक विजय खेचून आणले. समाजवाद हाच मानवजातीसमोर एकमेव पर्याय होऊ शकतो हे या विजयांनी दाखवून दिले.
आजच्या कोरोना संकट समयी सुद्धा भांडवलदारी देश आणि समाजवादी देश त्याचा कसा सामना करत आहेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे तपासले तरी समाजवादाची श्रेष्ठता पुन्हा एकदा सिद्ध होते.
विजय क्रमांक १: ७५ वर्षांपूर्वी, ३० एप्रिल १९४५ रोजी, दुसऱ्या महायुद्धात जर्मन सेनेचा फडशा पाडत आणि अनेक अभूतपूर्व विजय मिळवत कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनची लाल सेना जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये घुसली आणि या पराभवामुळे फॅसिस्ट क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलरला स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या करावी लागली!
विजय क्रमांक २: ४५ वर्षांपूर्वी, ३० एप्रिल १९७५ रोजी, आधी १० वर्षे फ्रेंच साम्राज्यवादाशी लढून, आणि पुढील २० वर्षे बलाढ्य अमेरिकन साम्राज्यवादाशी लढून, छोट्याशा कम्युनिस्ट व्हिएतनामने नेत्रदीपक विजय मिळवला, अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासात तिचा पहिलाच व आजवरचा एकमेव लष्करी पराभव झाला, आणि उत्तर व दक्षिण व्हिएतनामचे पुन्हा एकत्रीकरण झाले!
या दोन्ही युद्धांत धारातीर्थी पडलेल्या कोट्यावधी शहीदांना क्रांतिकारी लाल सलाम!
अतिसंहारक दुसरे महायुद्ध
१९३९ ते १९४५ अशी ६ वर्षे चाललेले दुसरे महायुद्ध मानवी इतिहासातील आजवरचा सर्वात अतिसंहारक संघर्ष होता. त्यात जगातील ६१ देशांचे एकूण सुमारे ७ ते ८.५ कोटी लोक मारले गेले! यात प्रत्यक्ष युद्धात तसेच युद्धामुळे झालेले दुष्काळ व रोगराईत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. युद्धात जबर जखमी झालेले कोट्यवधी लोक वेगळेच! कोट्यवधी महिला व लहान मुलांवर झालेले भयानक अत्याचार वेगळेच!
ज्या देशांचे सर्वात जास्त बळी गेले ते पुढीलप्रमाणे: सोव्हिएत युनियनचे सर्वाधिक २.५ कोटी लोक नाझी जर्मनीशी झालेल्या घनघोर युद्धात मारले गेले. त्याखालोखाल चीनचे १.७५ कोटी लोक जपानशी झालेल्या भयानक युद्धात मृत्यमुखी पडले.
हे युद्ध लादणाऱ्या जर्मनीचे ७२ लाख लोक मारले गेले. इतर काही प्रमुख देशांतील या युद्धातील मृतांचे आकडे पुढीलप्रमाणे: पोलंड - ६० लाख, इंडोनेशिया - ३५ लाख, जपान - २८ लाख (त्यात अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे २ लाख), भारत - २६ लाख (१ लाख ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून युद्धात आणि उर्वरित २५ लाख १९४३च्या बंगालच्या महादुष्काळात), फ्रेंच इंडोचायना (आजचे व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस) - १५ लाख, योगोस्लाव्हिया - १४ लाख, इथिओपिया - १० लाख, ग्रीस - ७.५ लाख, फ्रान्स - ६ लाख, फिलिपाईन्स - ५.५ लाख, इटली - ५ लाख, कोरिया - ५ लाख, रोमानिया - ५ लाख, हंगेरी - ४.६ लाख, इंग्लंड - ४.५ लाख, अमेरिका - ४.२ लाख.
हिटलरच्या फॅसिझमचा उदय
१९१४ ते १९१८ ही चार वर्षे पहिले महायुद्ध चालले. त्यात सुमारे २ कोटी लोक मारले गेले. ही दोन्ही महायुद्धे मुळात सुरू झाली ती साम्राज्यवादी देशांच्या भांडवली स्वार्थामुळे जगाची आपापसात फेरवाटणी करण्यासाठी. भांडवलशाही जशी अरिष्टे आणि बेरोजगारीशिवाय जगू शकत नाही तशीच ती युद्धाशिवायही जगू शकत नाही हे मार्क्स आणि लेनिनने सिद्ध करून दाखवले आहे.
पण पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या रशियात १९१७ साली कॉ. लेनिन आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी क्रांती झाली आणि जगाचे स्वरूप बदलले. दुसऱ्या महायुद्धानंतरही चीन, व्हिएतनाम व कोरियामध्ये अशाच समाजवादी क्रांत्या झाल्या. क्युबाची क्रांती आणखी १५ वर्षांनी झाली.
पहिल्या महायुद्धात सुद्धा जर्मनी हरली होती. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आदी देश जिंकले होते आणि त्यांनी पराभूत जर्मनीवर अनेक जाचक अटी लादल्या. या अटींविरुद्ध जर्मनीच्या जनतेत प्रचंड प्रक्षोभ खदखदत होता. १९२९ साली भांडवलशाहीचे अविभाज्य लक्षण असलेली जागतिक महामंदी सुरू झाली आणि त्याचा फटका प्रचंड बेरोजगारीच्या रूपाने जर्मनीलाही बसला. या दोन्ही घटकांचा फायदा ऍडॉल्फ हिटलरच्या नाझी (म्हणजे नॅशनल सोशलिस्ट!) नावाच्या पक्षाने उठवला. त्याला ज्यू धर्मीयांबद्दल कट्टर द्वेषाची फॅसिस्ट फोडणी देऊन बहुसंख्य जर्मन लोक 'आर्यन' असल्याचे सांगून त्यांना ज्यूंविरुद्ध संघटित करण्याची मोहीम चालवली. हुकूमशाहीचे हिटलरने अनेकदा उघड समर्थन केले होते. केवळ जर्मनीतील कम्युनिस्टांनाच नव्हे, तर जगभरच्या कम्युनिस्टांना आणि विशेषतः सोव्हिएत युनियनला संपविण्याचा इशारा त्याने 'माईन कॅम्फ' या त्याच्या आत्मचरित्रात दिलेला होता. त्या दिशेने त्याने जर्मनीतील सर्व बड्या भांडवलदारांशी चांगलेच मेतकूट जमविले होते.
वरील सर्व कारणांमुळे निवडणुकांमध्ये हिटलरच्या नाझी पक्षाची ताकद संसदेत वाढत गेली. दुसरीकडे कम्युनिस्टांची ताकदही संसदेत वाढत होती. पण कम्युनिस्टांनी अनेकदा सांगूनही मध्यममार्गी आणि तथाकथित 'समाजवादी' पक्षांनी हिटलरचा धोका ओळखला नाही. त्याला रोखण्यासाठी वेळीच संयुक्त आघाडी केली नाही. परिणामी ३० जानेवारी १९३३ रोजी हिटलर जर्मनीत सत्तेवर आला आणि त्याने लवकरच आपली हुकूमशाही राजवट प्रस्थापित केली.
त्याच्या ११ वर्षांपूर्वी १९२२ साली त्याच फॅसिस्ट विचारांचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी इटलीत सत्तेवर आला होता आणि त्यानेही नेमकी तशीच धोरणे अमलात आणली होती.
पहिला वार कम्युनिस्टांवर, ६५ लाख ज्यूंचे शिरकाण!
हिटलरने पहिला वार केला तो कम्युनिस्टांवर. सत्तेवर येण्याच्या एक महिन्याच्या आत त्याच्या आदेशावरून, २७ फेब्रुवारी १९३३ रोजी राजधानी बर्लिनमधील जर्मनीच्या संसदेच्या इमारतीला नाझी गुंडांनी आग लावली आणि त्याचे खापर कम्युनिस्टांवर फोडले. हजारों कम्युनिस्टांना तुरुंगात टाकण्यात आले. पुढे जगप्रसिद्ध होणाऱ्या कॉ. जॉर्जी दिमित्रोव्ह नावाच्या बल्गेरियन कम्युनिस्ट नेत्यालाही या खटल्यात अटक झाली, पण त्याने खुल्या कोर्टात हिटलर राजवटीचे वाभाडे काढले. न्यायालये अजून हिटलरला पूर्णतः विकली गेली नव्हती, म्हणून ते निर्दोष सुटले.
पण पुढे जर्मनीतील हजारों कम्युनिस्टांचे शिरकाण झाले. मग असंख्य कामगार नेत्यांचा, समाजवाद्यांचा, विचारवंतांचा, लोकशाही मानणाऱ्यांचा एकामागून एक नंबर लागला आणि त्या सर्वांना संपविण्यात आले. हे सर्व करताना त्याने ज्यू धर्माच्या लोकांकडे आपला मोर्चा वळवला. १२ वर्षांच्या त्याच्या सत्तेमध्ये हिटलरने तब्बल ६५ लाख ज्यू लोकांना कॉनसंट्रेशन कॅम्पसमध्ये डांबून ठार मारले! 'द डायरी ऑफ ऍन फ्रॅंक' नावाच्या एका लहान ज्यू मुलीची हृदयद्रावक कहाणी जगप्रसिद्ध झाली आहे.
आरएसएस चे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर यांनी १९३९ साली लिहिलेल्या 'वी ऑर अवर नेशनहूड डिफाइण्ड' या पुस्तकात ज्यूंच्या शिरकाणाच्या या कृत्याबद्दल हिटलरवर स्तुतिसुमने उधळली आहेत आणि भारताने यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे अशी पुस्ती जोडली आहे! आरएसएस चे आणखी एक संस्थापक डॉ. बी. एस. मुंजे १९३१ सालीच खास इटलीला जाऊन मुसोलिनीला भेटले आणि त्यांनीही भारतात येऊन मुसोलिनीचा गौरव केला.
जग जिंकण्याचे स्वप्न
हिटलरचे स्वप्न जग जिंकण्याचे बनले. त्यातूनच दुसरे महायुद्ध सुरू झाले. जर्मनी, इटली आणि जपान एका बाजूला तर सोविएत युनियन, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि चीन दुसऱ्या बाजूला असे मुख्य प्रतिस्पर्धी होते. स्थलाभावी त्याचा सर्व तपशील येथे देणे शक्य नाही. त्यापैकी फ्रान्स एका महिन्यातच पराभूत झाला. चीनमध्ये तेव्हा प्रतिगाम्यांचे राज्य होते, पण चिनी कम्युनिस्टांनी पुढाकार घेऊन संयुक्त आघाडी तयार केली आणि तेथील जनतेने जपानविरुद्ध कडवी झुंज दिली.
सोव्हिएत युनियनने फॅसिझमचा धोका फार पूर्वीच ओळखला होता. १९३५ साली कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या मॉस्को येथे भरलेल्या ७व्या अधिवेशनात, हिटलरच्या कचाट्यातून सुटलेल्या आणि आता या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस असलेल्या कॉ. जॉर्जी दिमित्रोव्ह यांनी फॅसिझम विरुद्ध जागतिक संयुक्त आघाडी बांधण्याचे बुलंद आवाहन केले. रशियाने इंग्लंड, फ्रान्स व अमेरिकेलाही हिटलरविरुद्ध एकत्र येण्याचे अनेकदा आवाहन केले, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट इंग्लंड आणि फ्रान्सचे तत्कालीन नेते तेव्हा हिटलरचे तुष्टीकरण करण्यात मग्न होते. त्यांचा डाव हा होता की, जर्मनीने आधी रशियावर आक्रमण करावे, दोन्ही देश त्या संघर्षांत पार कमजोर व्हावेत आणि मग आपण युद्धात हस्तक्षेप करून ते जिंकावे. रशियाने योग्य डावपेच करून हा डाव उधळून लावला.
सोव्हिएत युनियनने हिटलरचा डाव उधळला!
हिटलरने आधी पश्चिम युरोप पादाक्रांत केला. फक्त इंग्लिश खाडी मध्ये असल्यामुळे इंग्लंड वाचला. आणि मग २२ जून १९४१ रोजी सोव्हिएत युनियनवर घमासान आक्रमण केले. पहिल्या वर्षात रशियाचा पश्चिमेचा एक तृतीयांश भाग जर्मनीने गिळंकृत केला. राजधानी मॉस्कोच्या उंबरठ्यावर जर्मन सैन्य पोहोचले. पण त्यानंतर सोव्हिएत युनियनच्या लाल सेनेने जबरदस्त प्रतिचढाई सुरू केली आणि जर्मन सैन्याला मागे ढकलले. रशियन क्रांती झाली त्या लेनिनग्रॅड शहराला अडीच वर्षे जर्मन सैन्याने वेढा घातला पण तरीही हे शहर शरण गेले नाही. जगाच्या इतिहासातील सर्वात घनघोर अशी स्टॅलिनग्रॅडची लढाई सहा महिने चालली आणि त्यात मात्र जर्मन सैन्याचे कंबरडे मोडले गेले. जगातील आजवरची रणगाड्यांची सर्वात मोठी लढाई कुरस्क येथे लढली गेली. तीही लाल सेनेने जिंकली.
१९४४ साली आपल्या देशाचे सर्व क्षेत्र पुन्हा मुक्त केल्यानंतर लाल सेनेने पूर्व युरोपचे देश जर्मन कचाट्यातून मुक्त केले आणि पुढील वर्षी ती खुद्द जर्मनीत घुसली. बर्लिनकडे तिने कूच सुरू केले. भरपूर वेळ घालवल्यानंतर, आता रशिया सर्वच जर्मनीवर कब्जा करेल या भीतीने, जून १९४४ मध्ये इंग्लंड आणि अमेरिकेने इंग्लिश खाडीमार्गे जर्मनीच्या कब्जात असलेल्या फ्रान्सवर आक्रमण केले. एप्रिल १९४५ मध्ये लाल सेनेने बर्लिनमध्ये विजयी प्रवेश केला. ३० एप्रिलला आत्महत्या करण्याशिवाय हिटलरला पर्याय उरला नाही. त्याच्या दोनच दिवसांपूर्वी २८ एप्रिल रोजी इटलीतील वॉल्टर ऑडिसीओ नावाच्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने मुसोलिनीला पकडले, त्याला ठार मारले आणि त्याचे शव मिलान नावाच्या शहरातील भर चौकात उलटे टांगले. २ मे रोजी एका सोव्हिएत कम्युनिस्ट सैनिकाने जर्मनीच्या संसदेच्या इमारतीवर विळा हातोड्याचा लाल झेंडा फडकवला! ८ मे रोजी जर्मनीने अखेर शरणागती पत्करली.
जपानविरुद्धचे युद्ध आणखी काही महिने चालले, आणि कारण नसताना अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर पहिले भयानक अणुबॉम्ब टाकले. जगावर दादागिरी प्रस्थापित करण्याचा तो उघड प्रयत्न होता.
हे अटीतटीचे युद्ध जिंकण्यासाठी लाल सेनेचा आणि सोव्हिएत जनतेचा त्याग आणि धैर्य कळीचे होतेच. पण त्यामागे समाजवादाने अल्प काळात उभारलेली जबरदस्त अर्थव्यवस्थाही होती. लाखों कामगार-शेतकऱ्यांचे अपूर्व श्रम होते. असंख्य महिलांचे व लहान मुलामुलींचे प्रचंड योगदान होते. या सर्वातून तयार केलेली अफाट रणसामुग्री होती. जनतेमधील समानता व एकजूट होती. हे सर्व करण्यात कम्युनिस्ट पक्षाचा सिंहाचा वाटा होता. कॉ. जॉर्जी झुकोव्ह व इतर अनेक जनरल्सचे मौल्यवान योगदान होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉ. लेनिन यांच्या १९२४ सालच्या निधनानंतर कॉ. जोसेफ स्टालिन यांचे अत्यंत खंबीर आणि बेडर नेतृत्व होते.
पुन्हा नवीन फॅसिझमचा धोका वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या व इतर काही देशांतही संभवतो. त्याचा पावलोपावली अत्यंत नेटाने आणि एकजुटीने सामना आपण केलाच पाहिजे.
व्हिएतनामची शौर्यगाथा
दुसरी तेजस्वी शौर्यगाथा आहे कम्युनिस्ट व्हिएतनामची. व्हिएतनाम ही अनेक दशके फ्रान्सची वसाहत होती. दुसऱ्या महायुद्धात जपानने आक्रमण केले आणि फ्रान्सची राजवट खिळखिळी झाली. अनेक वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे उत्तुंग नेते कॉ. हो ची मिन्ह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या देशात फ्रेंच साम्राज्यवादाविरुद्ध केलेल्या अथक संघर्षांतून कम्युनिस्ट पक्षाची बांधणी केली. व्हिएतनामचा दुसऱ्या महायुद्धात नाश करणाऱ्या जपानचा पराभव झाला. जपानचा सर्वात कडवा प्रतिकार व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने केला होता.
ऑगस्ट १९४५ मध्ये व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी उठाव झाला. व्हिएतनामचा नामधारी सम्राट बाओ दाई याला पायउतार व्हावे लागले आणि कॉ. हो ची मिन्ह यांनी व्हिएतनामचे लोकशाही गणराज्य स्थापन झाल्याचे जाहीर केले. पण कम्युनिस्ट पक्षाचा जोर उत्तर व्हिएतनाममध्ये होता.
फ्रेंच वसाहतवाद्यांनी क्रांती उलथून टाकण्यासाठी युद्ध सुरू केले. ९ वर्षे ते चालले. १९५४ साली दीन बीन फू येथे या युद्धाची निर्णायक लढाई झाली. त्यात व्हिएतनामच्या सैन्याने १० हजार फ्रेंच सैनिकांचा जबरदस्त पराभव केला आणि फ्रान्सला काढता पाय घ्यावा लागला. जेनेव्हा येथे करार झाला.
पण दक्षिण व्हिएतनाममध्ये कम्युनिस्ट पक्ष कमजोर होता. याचा फायदा घेऊन तेथे फ्रान्सने व्हिएतनामी लोकांचेच भांडवली आणि भ्रष्ट सरकार स्थापन केले. जेनेव्हा करारात ठरले होते की वर्षभरात उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये निवडणूक घेऊन देशाचे एकत्रीकरण केले जाईल. पण आता अमेरिकेने आडकाठी घातली, निवडणुका होऊ दिल्या नाहीत आणि उत्तर व्हिएतनामविरुद्ध दक्षिण व्हिएतनामच्या सरकारला भरीव आर्थिक व लष्करी मदत सुरू केली.
आपल्या देशाचे एकत्रीकरण करणे हे कॉ. हो ची मिन्ह आणि कम्युनिस्ट पक्षाचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी गनिमी काव्याची लढाई सुरू केली. दक्षिण व्हिएतनाम हरत असल्याचे पाहून १९६५ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉनसन यांनी पहिल्यांदा अमेरिकन सैनिक दक्षिण व्हिएतनाममध्ये पाठवले आणि त्यांची संख्या दोनच वर्षांत हजारोंवर गेली. दक्षिण व्हिएतनाम कम्युनिस्ट झाले तर आजूबाजूचे देशही कम्युनिस्ट बनतील असा अमेरिकेचा युक्तिवाद होता. त्याला तेव्हा म्हणायचे डोमिनो सिद्धांत.
बलाढ्य अमेरिकेशी थेट लढत अंगावर घेण्याचे धैर्य कोणीही सहजासहजी दाखवले नसते. पण बेडर व्हिएतनामने अमेरिकेविरुद्ध सुद्धा गनिमी काव्याने लढाई सुरू केली. १९६८ साली उत्तर व्हिएतनामच्या सैन्याने जोरदार 'टेट आक्रमण' सुरू केले. दक्षिणेत अनेक ठिकाणी उठाव झाले. अर्थात त्यातील अनेक यशस्वी झाले नाहीत. पण त्यांत अमेरिकन सैनिकांचे मृत्यू होण्यास सुरुवात झाली. अमेरिकेने या १० वर्षांत व्हिएतनामवर सुमारे ५ लाख टन वजनाचे बॉम्ब टाकले. संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात इतके बॉम्ब टाकले गेले नव्हते. त्यामुळे व्हिएतनामची शेती आणि उद्योग प्रचंड उद्ध्वस्त झाले. लाखो लोक मारले गेले. पण तरीही व्हिएतनाम मागे हटला नाही!
१९६८ साली काही अमेरिकन सैनिकांनी एका गावात संपूर्णपणे निःशस्त्र असलेल्या ५००हून अधिक लोकांना, महिला आणि लहान मुलांसह, अत्यंत निर्दयपणे गोळ्या घालून ठार मारल्याची बातमी जगभर पसरली. त्याचे 'माय लाय' हत्याकांड हे नाव इतिहासात कुप्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे अमेरिकेविरुद्ध जगभर संताप पसरला. अमेरिकन सैनिक मरत असल्यामुळे खुद्द अमेरिकन जनतेत विरोध वाढू लागला. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी विद्रोहाचा झेंडा उभारला. त्यापैकी केंट स्टेट विद्यापीठातील चार निदर्शक विद्यार्थ्यांना अमेरिकन पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारल्यामुळे आगडोंबच उसळला. अमेरिकेतील जनमत व्हिएतनाम युद्धाविरुद्ध जाऊ लागले. अमेरिकन सैनिकांना परत आणा, ही मागणी जोर धरू लागली. कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला त्यास विरोध करणे अशक्य झाले. १९७३ पासून हळूहळू अमेरिकन सैनिकांना व्हिएतनाम मधून मागे घेण्यास सुरुवात झाली.
उत्तर व्हिएतनामने आपली चढाई चालूच ठेवली. एक खास बाब म्हणजे समाजवादी सोव्हिएत युनियन आणि समाजवादी चीन या दोन्ही बलाढ्य देशांनी छोट्याशा समाजवादी व्हिएतनामला या सर्व काळात शस्त्रास्त्रे व सामुग्रीची भरपूर मदत केली. पण युद्ध अर्थातच व्हिएतनामी जनताच लढली.
युद्ध सुरू असतानाच २ सप्टेंबर १९६९ रोजी कॉ. हो ची मिन्ह यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. पण कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱ्या फळीच्या सक्षम नेतृत्वाने युद्धात कसलाही खंड पडू दिला नाही. अखेर ३० एप्रिल १९७५ रोजी व्हिएतनामी सैन्याने दक्षिण व्हिएतनामची राजधानी असलेल्या सायगॉन या शहरात विजयी प्रवेश केला आणि अमेरिकेचे उर्वरित भयभीत सैनिक आणि व्हिएतनामी भांडवली राज्यकर्ते मिळेल त्या विमानाने वा हेलिकॉप्टरने वा बोटीने पळून गेले.
पुढील वर्षी १९७६ साली उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामचे रीतसर एकत्रीकरण करण्यात आले आणि सायगॉन या शहराला हो ची मिन्ह सिटी हे नवे नाव देण्यात आले!
--------------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ. अशोक ढवळे
केंद्रीय कमिटी सदस्य, माकप
अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा

No comments:

Post a Comment