जीवनमार्ग बुलेटिन: २३
गुरूवार, २३ एप्रिल २०२०
छोट्या मूर्तीची मोठी सावली
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती,
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढती.
(कुसुमाग्रज)
जणू काही मानवतेची सारी जोखीम आपलीच समजून ती उचलणारे समाज वा देश असू शकतात, ही कल्पनाच भयभीत झालेल्या माणसाला उभारी देणारी आहे. पण ही कल्पना नसून लख्ख वास्तव आहे. सातासमुद्रावरच नव्हे साताविश्वावर संचार करू मागणाऱ्या मानवाला अगतिक करायची किमया भांडवलशाहीने करून दाखवली आहे. इराक-अफगाणिस्तानमधील लोक क्षितिजापलिकडून येणारे मानवविरहित क्षेपणास्त्र अचानक डोक्यावर आदळून अचंबित होण्याअगोदरच अल्लाला प्यारे कसे होत गेले, हे चित्रवाण्या जगाला थेटपणे दाखवत होत्या, आणि साम्राज्य आपल्या सामर्थ्याच्या मिजासीने लोकांना तृणवत मानत होते.
आता त्या साम्राज्याचीच सीदन्ति मम गात्राणि अशी बेजार अवस्था झाली आहे. तरीही त्याचा पीळ काही जळता जळत नाही आणि याला धमकी दे, त्याच्यावर डोळे वटार ही खोड काही जात नाही. पण या साम्राज्याच्या जनतेची कोव्हिड विषाणुपुढे कुसुमाग्रजांनी वर्णिलेल्या गवताच्या पात्यांगत अवस्था झाली आहे. याही दारूण अवस्थेत जागतिक आरोग्य संघटनेची रसद तोडायचा माणुसकीशून्य निर्णय ट्रंप महाशयांनी घेतला आहे. अर्थात, व्हिएटनामपासून इराक-सीरियापर्यंतच्या आणि लिबियापासून व्हेनेझुएलापर्यंतच्या जनतेला अमेरिकेचा हाच भेसूर चेहरा सतत भेडसावत आला आहे. मरणासन्न भांडवलशाहीची रक्ताची चटक ती यमसदनाला गेल्याशिवाय जायची नाही.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —— — —
काळकोठडीला उजळणारी प्रकाशाची तिरीप
अमेरिकेला चिरडू म्हणता न चिरडता आलेला क्यूबा हा इवलासा देश मात्र मानवतेचे एक अत्यंत सुसंस्कृत आणि विलोभनीय दर्शन देत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी इटलीच्या मदतीला तो देश धावून गेला, हे सर्वश्रुत झाले आहे. पण क्यूबा तेवढ्यावरच थांबलेला नाही. १०९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि १ कोटी १२ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने तब्बल ५९ कोरोनाग्रस्त देशांना मदतीसाठी आपली वैद्यकीय पथके पाठवली आहेत. सैन्याची पथके पाठवणारा अमेरिका आणि वैद्यकीय पथके पाठवणारा क्यूबा हे दोन समाजव्यवस्थांमधील मूलभूत भेद दाखवणारे दोन ध्रुव आहेत. भर माध्यान्ही मोठ्यांची सावली पायाखाली यावी आणि संध्यासमयी छोट्यांच्याही सावल्या मोठ्या व्हाव्यात, असाच अनुभव एका बाजूला अमेरिका-ब्रिटन आणि दुसऱ्या बाजूला केरळ आणि क्यूबाच्या रूपात आपल्याला येऊ लागला आहे.
केरळमध्ये सामाजिक अंतर राखत नाहीत, तर शारीरिक अंतर राखत सामाजिक अंतर कमी करतात. ही समाजवादी संस्कृती केरळप्रमाणेच क्यूबानेही १९५० च्या दशकात अंगिकारून मानवाच्या मूळ सहकार्य-सौहार्दाच्या प्रकृतीची पताका फडकवत ठेवली. लहान माश्यांना गिळणाऱ्या मोठ्या माश्यांचा स्पर्धेचा वारसा अंगिकारणाऱ्या बलाढ्य अमेरिकेने या छोट्याश्या देशाला चिरडून टाकण्यासाठी जंग जंग पछाडले. अजूनही त्याच्यावर विविध प्रकारची आंतरराष्ट्रीय बंधने घातलेली आहेत. समाजवादी असला तरी या बंधनांमुळे समृद्धीच्या राशी तो देश जमा करू शकलेला नाही. पण खरोखरच मनाची श्रीमंती तो टिकवून आहे. अमेरिकेतल्या लुटारू विमा कंपन्यांनी नाकारलेल्या, त्यांच्या विम्याचे सर्व हप्ते भरलेल्या कॅन्सरचे रुग्ण असलेल्या अमेरिकन नागरिकांवरसुद्धा मोफत उपचार करणारा क्यूबा हा देश आहे. अमेरिका धनाढ्य आहे म्हणजे कोण धनाढ्य आहे आणि कोरोनामुळे हजारो अमेरिकन नागरिकांचे प्राण का जात आहेत याचे उत्तर वरील वास्तवात आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —— — —
अडचणीतील देशांना मदत
वर म्हटल्याप्रमाणे क्यूबाने ५९ देशांना कोरोनाच्या मुकाबल्यासाठी वैद्यकीय पथके पाठवली आहेत. इटलीचा लोम्बार्डी प्रदेश म्हणजे या महामारीचे आगरच बनलेला. तेथे गेल्यावर जिवंत परत येऊच, याची खात्री नसतानाही साथरोगावरील ५३ ज्येष्ठ विशेषज्ञ इटलीच्या आरोग्ययंत्रणेच्या मदतीसाठी धावून गेले. जगी ज्यास कोणी नाही, त्यास क्यूबा आहे असे म्हणत फ्रान्स आणि स्पेनच्या मध्ये असलेल्या ७७ हजार लोकसंख्येच्या अॅन्दोरा या छोट्याश्या देशातील डॉक्टरांना महामारीची लागण झाल्याने क्यूबाने आपले ३९ डॉक्टर त्या इवलाश्या देशाच्या मदतीसाठी कसल्याही अटी न घालता पाठवून दिले. हे आजचेच नाही. इबोलाची लागण झाली तेव्हा आफ्रिकेतल्या कित्येक गरीब देशांना क्यूबाने अशीच मदत केली होती.
इटलीच्या मदतीला धावून जाण्याआधी ही डॉक्टर आणि आरोग्य सेवकांची प्रशिक्षित पथके कोठे होती? आपापल्या गावातील सुखासीन आयुष्य सोडून ती क्यूबा शेजारच्या व्हेनेझुएला, निकारागुआ, सुरीनाम, बेलिझ, जमैका आणि ग्रेनडा या देशांतील जनतेला वैद्यकीय सेवा पुरवत होती! आणि भारतातील सरकारच्या (म्हणजे गरिबांकडून वसूल केलेल्या) पैश्यावर डॉक्टर बनलेले अतिदेशभक्त चिन्मय आणि केतकी सुखात लोळण्यासाठी अमेरिकेत जाऊन बसले होते. आता त्याहून सुरक्षित जागेच्या शोधात ते बिचारे कदाचित चीनलाही स्थलांतर करू पाहतील. पण क्यूबातील हे सर्व निष्णात कर्मचारी मात्र “हेन्री रीव्ह ब्रिगेड” चे सैनिक म्हणून मानवतेच्या सेवेत तल्लीन झाले आहेत.
या हेन्री रीव्ह ब्रिगेडचा जन्मही अमेरिकेच्या कृपेनेच झाला. २००५ मध्ये अमेरिकेला झोडपलेल्या कत्रिना वादळाच्या वेळी मदत करण्यासाठी क्यूबाने १५८६ डॉक्टर तयार ठेवले. पण अमेरिकेने तो प्रस्ताव झिडकारला. त्यानंतर लगेच एक महिन्याच्या आत अध्यक्ष कॉ. फिडेल कॅस्ट्रो यांनी क्यूबाच्या १९व्या शतकातील हेन्री रीव्ह या स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मरणार्थ ही वैद्यकीय ब्रिगेड स्थापन केली. ज्या देशात काही नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेथे धावून जाणे हे तिचे काम. ती साथरोगात रुग्णांची शुश्रूषा करण्यात निष्णात आहे. क्यूबाने जमैकाला कोव्हिड-१९ चा मुकाबला करण्यासाठी १४४ आरोग्य कर्मचारी पाठवले. त्यांना निरोप देताना क्यूबाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या जीवनदृष्टीची साक्ष देतात: “क्यूबा आणि क्यूबाची जनता क्रांतीनंतर ६० वर्षे एकजुटीच्या तत्त्वाचे संरक्षण करत आली आहे. जमैकात ते आणि आम्ही मिळून कोव्हिडचा सामना करणार आहोत.”
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —— — —
जगातील सर्वोत्तम आरोग्यव्यवस्था
क्यूबावर गेली साठ वर्षे अमेरिकेने अतिशय कडक आर्थिक बंधने घातलेली असतानाही त्या देशाने जगातील सर्वात विकसित अशा अमेरिका आणि इतर सर्व समृद्ध देशांहूनही उत्तम अशी आरोग्य व्यवस्था उभारली आहे. याचे कारण ती व्यवस्था समाजवादी तत्त्वावर उभारलेली आहे. तेथे आरोग्यसुविधा ही विकत घ्यायची वा पैसा कमवायची बाब नाही. जनतेला सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा मोफत मिळते. अति तातडीच्या सेवेची सरकारी अधिकारी आणि सामान्य कामगार महिला यांना एकाच वेळी गरज भासल्यास प्रथम त्या महिलेला ती सेवा उपलब्ध करून दिली जाते, आणि मागाहून सरकारी अधिकाऱ्याला. समता हे मानवी मूल्य म्हणून त्या सरकारने स्वीकारले आहे. १००० नागरिकांमागे ८ डॉक्टर हे प्रमाण जगात इतरत्र कुठेही नाही. आपल्याकडे १० हजारांमागे १ डॉक्टर असल्याचे काही अभ्यासक सांगतात. क्यूबाला आदर्श मानून जागतिक आरोग्य संघटनेने १००० लोकांमागे १ डॉक्टर असले पाहिजेत, अशी शिफारस केली आहे. या संघटनेच्या अशा रचनात्मक भूमिकेमुळेच व्यापारी वृत्तीची अमेरिका संतापत असते.
क्यूबाने क्रांती झाल्या दिवसापासून स्वावलंबनावर भर दिला. विशेषतः जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्याने मोठी कामगिरी केली आहे. कोव्हिड-१९ वर क्यूबाने विकसित केलेले इंटरफेरॉन हे औषध चीन आणि इतर देश वापरू लागले आहेत. त्याचा कोव्हिडच्या प्राथमिक अवस्थेत चांगला लाभ होत असल्याचे आढळून आले आहे. म्हणजे त्या औषधाचा लवकर उपचार केल्यास कोरोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो. चीनमध्ये आजवर १ लाख रुग्णांवर या औषधाने उपचार करण्यात आला आहे. हे औषध विकसित करणाऱ्या सरकारी कंपनीने बनवलेल्या इतर अनेक औषधांनाही जागतिक प्रतिष्ठा मिळाली आहे. चीनपाठोपाठच इंटरफेरॉन दक्षिण कोरिया, जर्मनी आणि इटलीत वापरले जाऊ लागले आहे. भारतात केरळ सरकारने या औषधाची आयात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे.
सर्व प्रकारच्या रोगराईचा मुकाबला करण्यासाठी क्यूबाची आरोग्यव्यवस्था कायम तत्पर असते. वुहानमध्ये जानेवारी महिन्यातच रुग्ण आढळल्याचे समजताच क्यूबाची यंत्रणा कामाला लागली. क्यूबाची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर विसंबून आहे. पण कोव्हिड-१९ मुळे त्या देशाला पर्यटन थांबवण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. एक इटालियन पर्यटक हा क्यूबातील पहिला रुग्ण होता. त्याच्यावर उपचाराला सुरूवात करताच दुसरीकडे नागरी आणि लष्करी इस्पितळांत हजारो खाटा कोव्हिड-१९ च्या रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या. शालेय गणवेश तयार करणाऱ्या कारखान्यांतून मास्क तयार केले जाऊ लागले. मुख्य म्हणजे त्या समाजाला “शारीरिक अंतर” कसे राखायचे, ही समस्या अजिबात भेडसावत नाही. याचे कारण सर्व जनतेला पुरेश्या आकारमानाची घरे आहेत. १० बाय १० च्या खोलीत चार सहा जणांनी राहण्याची कल्पनादेखील तेथे संभवत नाही. शिवाय, देशात सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था अत्यंत मजबूत असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा बिनबोभाट पुरवठा करणे शक्य आहे. क्यूबामध्ये सर्व नागरिकांच्या किमान गरजा भागवणे ही सरकारची जबाबदारी आहे.
मिग्वेल दियाझ-कॅनेल या क्यूबाच्या राष्ट्राध्यक्षांनी अगदी नेमक्या शब्दांत त्यांच्या समाजवादी समाजव्यवस्थेचे वर्णन केले आहे. ते म्हणतात: “आम्ही प्रत्येक नागरिकाला उपलब्ध असणारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारलेली आहे. देशात वैज्ञानिक समुदाय मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित करण्यात आला आहे. आमची नागरी संरक्षण यंत्रणा अतिशय कार्यक्षम आहे, आणि आमचे सरकार क्यूबन नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून काम करत असते.”
आताच्या घडीपर्यंत १ कोटी १० लाख जनतेच्या या देशात कोव्हिड-१९ चे १३० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तिघांना मृत्यू आला आहे. मार्च महिन्यातील एक घटना सर्वश्रुत आहे. एक हजाराहून अधिक प्रवासी आणि कर्मचारी असलेले ब्रिटनचे एक जहाज कोव्हिडच्या तडाख्यात सापडले. ब्रिटनचा जिगरी दोस्त असलेल्या अमेरिकेसहित कित्येक देशांनी त्या जहाजास आपल्या बंदरात यायला परवानगी नाकारली. ब्रिटनने ते जहाज बंदराला लावण्याची क्यूबाकडे परवानगी मागितली. तेथून त्या सर्वांना विमानाने ब्रिटनला नेण्याचे ब्रिटनचे नियोजन होते. क्यूबाने त्याला परवानगी तर दिलीच. शिवाय, त्या जहाजावरील रुग्णांवर आपल्या इस्पितळात उपचारही केले. कोरोनाच्या रुग्णांना अस्पृश्यांसारखा अनुभव इतरत्र येत असताना मानवतेचा उच्च आदर्श क्यूबाने आपल्यासमोर दाखवला आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —— — —
आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक
“आरोग्याची काळजी, सामाजिक एकजूट आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य” या त्रिसूत्रीनुसार क्यूबाची आरोग्यव्यवस्था काम करते आहे. त्याने दाखवलेल्या आंतरराष्ट्रीय भ्रातृभावाचे आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठे कौतुक केले आहे. ब्रिटनचे मावळते विरोधी पक्ष नेते जेरेमी कॉर्बिन यांना क्यूबाचे आंतरराष्ट्रीय कार्य अतिशय ‘स्फूर्तिदायक’ वाटते. “अशा कसोटीच्या प्रसंगीच खरे थोर कोण हे स्पष्ट होत असते; क्यूबा या अतिशय छोट्या देशाच्या जनतेपुढे इतर देशातील लोक फारच खुजे वाटू लागतात”, असे उद्गार ब्राझीलचे भूतपूर्व अध्यक्ष लुला यांनी काढले आहेत. आज ब्राझीलमध्ये कोव्हिडचा इतका प्रादुर्भाव झालेला असतानाही जवळच्याच क्यूबाची मदत घेतली जात नाही, याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
लुला यांना खंत वाटणे साहजिक आहे. लुला अध्यक्ष असताना त्यांनी जनतेच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी १० हजार क्यूबन डॉक्टरांची मदत घेतली होती. आणि ते डॉक्टर राजधानीच्या वा विकसित शहरात मौजमजा करत न बसता जंगलात आणि देशाच्या अतिशय मागास भागात काम करू लागले. लुला यांच्या जागी आलेले उजव्या विचारसरणीचे येर बोल्सोनारो हे त्या निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या डॉक्टरांचा पाणउतारा करू लागल्यानंतर ते माघारी गेले. याच असंस्कृत बोल्सोनारो यांना पंतप्रधान मोदींनी २०२०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावून तिरंग्याची शोभा केली. १९५ देशात हाच एक दिवटा या सन्मानासाठी आपल्या गाजरपारखी नेत्याला दिसला! आता या कोव्हिड-१९ ने ब्राझीलची अवस्था अमेरिकेइतकीच दारूण झाल्याने बोल्सोनारोला क्यूबन डॉक्टर आठवू लागले असून त्यांनी क्यूबाला तशी विनंती केली आहे. आंतरराष्ट्रीय भ्रातृभावाला जागून क्यूबानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
— — — — — — — — — — — — — —— — — — — — — — — — — — — — — — —— — —
खुली करू या नवी क्षितिजे
कोव्हिड-१९ वर मात मिळवल्यानंतर मानवाला ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ म्हणत भांडवलशाहीने पसरवलेल्या नफेखोर आरोग्यव्यवस्थेला मूठमाती द्यावी लागेल. नफेखोर भांडवलशाहीने ओरबाडून काढलेल्या निसर्गाने एक प्रकारे उगवलेला हा सूड आहे. भांडवलशाहीने एकूणच निसर्गाची जी वाताहत केली आहे, त्यावरून कोव्हिड-१९ हा अखेरचा विषाणु निश्चितच नसेल. तो अखेरचा ठरवायचा झाल्यास आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा यांतून नफ्याला हद्दपार करून त्या व्यवस्था जनतेच्या ताब्यात दिल्या पाहिजेत. मानवाच्या अस्तित्वाची ती आणि तीच हमी आहे. तशी हमी देऊ पाहणारा, नवे क्षितीज निर्माण करणारा क्यूबा हा देश आहे. आपण जुन्या क्षितिजासोबत डुबून जायचे की त्या छोट्या दोस्तापासून शिकून नव्या क्षितीज निर्मितीत सहभागी व्हायचे, हे आपण ठरवले पाहिजे. साथीच्या तळपत्या उन्हात छोट्या क्यूबाने आपली सावली मोठी करत अनेक भल्याभल्यांवर मायेची पाखर घातली आहे. भारतासारख्या क्यूबाच्या सव्वाशे पट असलेल्या देशाची सावली त्याच्या पायाशीच घुटमळत आहे. तेव्हा भारत सरकारनेही आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. तो न बदलल्यास हे सरकारच बदलायची तयारी जनतेने केली पाहिजे.
____________________________________________________________________________________
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग

No comments:
Post a Comment