जीवनमार्ग बुलेटिन: २६
रविवार, २६ एप्रिल २०२०
काही घटना आणि त्या मागचे ‘भामटे’
तुकाराम महाराजांच्या एका अभंगात थोडासा बदल केल्यास तो भाजपच्या आशिष शेलारांना तंतोतंत लागू पडावा:
सत्तेच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसू खूळ जैसा ।।
अंठोनी वेंठोनी बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधी।।
असे नसते तर आशिष शेलारांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीआयटीयू या कामगार संघटनेवर दुगाण्या झाडायची नस्ती उठाठेव केलीच नसती. २५ एप्रिलच्या ‘लोकमत’मध्ये लिहिलेल्या ‘काही घटना आणि त्यामागचे बावटे’ या लेखात शेलारांना बांद्रा स्टेशनवर जमलेल्या हजारो कामगारांच्या मागे ‘बावटे’ असल्याचे दिसले. मराठीत राजकारणातला बावटा फक्त एकाच रंगाचा असतो. आणि हा बावटा दिसला रे दिसला की संघवाले भांग पाजलेल्या म्हैश्यासारखे बिथरून त्याच्या मागे धावून जातात. संघवाल्यांना देशांतर्गत कुणी ना कुणी शत्रू उभा केल्याशिवाय आपण जिवंत आहोत, याची खात्रीच पटत नाही. त्यासाठी गोळवलकरांनी त्यांना मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे शत्रू असल्याचा वेदमंत्र दिला आहे. त्यानुसार ते या तिघांना नष्ट करू पाहतात. दिल्ली दंगलीत यवनांचे पारिपत्य करायचे 'सत्कृत्य' पार पाडल्यानंतर आता कम्युनिस्टांचे पारिपत्य करायच्या वेडाने ते भ्रमिष्ट झालेले दिसतात.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
बांद्र्याचा भामटा
बांद्रा पश्चिम मतदारसंघात १४ एप्रिलला हजारो कामगार अचानक एकत्र जमले. ते कसे जमले याचा महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत. आशिष शेलारांनी आपल्या लेखातून या जमावाला लाल बावट्याने फूस लावल्याचा जावईशोध लावून पोलसांची जाणूनबुजून दिशाभूल करायचा प्रयत्न केला आहे. ती गर्दी अचानक जमवण्यामागील हेतूचा शोध घेत पोलिसांनी काही लोकांना अटकाही केल्या आहेत. तरीपण अजून त्यामागील सर्व सत्य समोर आलेले नाही. भारतात अफवा पसरवण्यात संघवाले किती निष्णात आहेत, हे आता सर्वश्रुत झालेले आहे. त्या साथीची लागण सोशल मीडियामुळे दूरदूरवर झाली आहे. बांद्र्यातील गर्दी जमण्यामागे सोशल मीडीयातून काय काय संदेश फिरवले गेले, त्यासाठी कुणाच्या पलटणी कामाला लागल्या होत्या, याचीही खातरजमा होईल. पण त्यासाठी लाल बावट्याला जबाबदार धरणारे मर्कटतर्कट अजब आहे.
शेलारांनी लिहिलेल्या लेखानुसार म्हणे त्यांनी बांद्र्याच्या त्या प्रकारानंतर जमलेल्या काहीजणांशी संवाद साधला. त्यावेळी भामट्याला सीआयटीयू शी संलग्न असलेल्या ‘मुंबई बांधकाम आणि नाका कामगार युनियन’चे कार्यकर्ते भेटले. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी या भागात निदर्शने केली होती पण महाराष्ट्र सरकारने दखल घेतली नाही, म्हणून ते पुन्हा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले, असा आरोप शेलारभामट्याने केला आहे. त्या संघटनेने अशी कुठलीच निदर्शने करण्याची हाक दिली नव्हती. त्यामुळे ती निदर्शने होण्याचा प्रश्नच नाही. आहे ते नाही, आणि नाही ते आहे या वैदिक तत्त्वज्ञानावर श्रद्धा असल्याने या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात संघवाले वाकबगार आहेत. म्हणून शेलारांना बांद्र्याच्या जमावात नसलेला लाल बावटा दिसला. “डॉ. मोंटेरो महाराष्ट्र सचिव असलेल्या सीआयटीयूशी संलग्न कामगार युनियनने नियोजनबद्ध त्यांना रस्त्यावर उतरवले”, असा फक्त रास्व संघवाल्यांना शोभणाराच खोटारडा, घाणेरडा आणि भिकारडा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबईच्या कित्येक भागात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात निराधार झालेल्या कामगारांना शिधा आणि जेवण पुरवण्याचे काम केले जात आहे. त्याचा भाग म्हणून सीआयटीयू ही संघटनाही त्या कामात सहभागी झालेली आहे. या कामी या संघटनेचे नेते कॉ. नारायण यांना पोलीस नाहक त्रास देऊ लागले आहेत. त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने एका हॉटेलात विलग करायच्या नावाखाली अडकवूनही टाकले आहे. बांद्रा परिसरात अनेक कामगार मोठ्या संख्येने राहतात. या कामगारांना ही अति तातडीची मदत मिळावी, या हेतूने सीआयटीयूचे डॉ. विवेक मॉन्टेरो यांनी बांद्रा पूर्वचे आमदार श्री. झीशान सिद्दिकी आणि बांद्रा पश्चिमचे आमदार श्री. आशिष शेलार या दोघांशीही संपर्क साधला. शेलारांनी डॉ. मॉन्टेरो यांच्याशी ‘संवाद’ही साधला. त्याविषयीचे डॉ. मॉन्टेरोंचे पत्र या बुलेटिनसोबत देत आहोत. त्या संपर्काचा झीशान सिद्दिकी यांनी राजकारणासाठी काही वापर केल्याचे समोर आलेले नाही. पण शेलारांनी मात्र संघीय चलाखीने त्या संवादाचा उपयोग सामाजिक विसंवाद निर्माण करण्यासाठी कसा केला, हे त्यांच्या भामटेगिरीवरून स्पष्ट होते.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
विवेक आणि अविवेकाची काजळी
डॉ. विवेक मॉन्टेरो हे केवळ कामगार नेते नाहीत; ते एक विज्ञान चळवळीतील शिक्षकही आहेत. मुंबईच्या सेन्ट झेवियर्स कॉलेजचे विद्यार्थी असलेल्या मॉन्टेरो यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून न्यू यॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीची पीएचडी ही संपादन केली आहे. पुढे २०१८ मध्ये पदार्थविज्ञानाचे नोबेल पारितोषक मिळालेले प्रा. किप थॉर्न यांचे ते कॅलिफोर्नियात विद्यार्थी होते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या नामांकित संस्थेने त्यांना ‘होमी भाभा पुरस्काराने’ही गौरवलेले आहे. इतकी शैक्षणिक अर्हता असूनही डॉ. विवेक रास्व संघाच्या लाडक्या चिन्मयसारखे अमेरिकेत जाऊन संघसेवा न करता मुंबईच्या झोपडपट्ट्यात राहणाऱ्या कामगारांच्या हक्कासाठी आपले आयुष्य खर्ची घालत जनसेवा करत आले आहेत.
देशाचे टुकडे टुकडे करायच्या उद्देशाने अमित शहांनी लोकसभेत केलेल्या भाषणानंतर देशभर संघवाले क्रोनॉलॉजी, क्रोनॉलॉजी अशी कावकाव करत गदारोळ करू लागले आहेत. बांद्र्याच्या भामट्यालासुद्धा जेएनयू ते बांद्रा आणि पालघर अशी एक क्रोनॉलॉजी सुचली. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच सामाजिक एकजूट तोडण्यासाठी भारतात मास्कचा पहिला वापर केला भाजपच्या अभाविपने जेएनयूमध्ये. विषाणूनेच चढवलेला मास्क अशी त्याची जगभर ख्याती झाली. सत्तेच्या पिंडीवर बसलेल्या या विंचवाला अमित शहाच देशाचे गृहमंत्री असल्यामुळे साहजिकच अभय मिळाले. लष्कराची तिन्ही दले एकत्र करूनसुद्धा अमित शहाला त्यातला एकजण पण अजून गावलेला नाही. त्या आधी गोदी मीडियाने खोटे व्हिडिओ पसरवून कन्हैयाला छळछळ छळले होते. त्यानंतर कोरोनाप्रसारामागे मुसलमान दिसले. नंतर चीन दिसला. आता बांद्र्यातील त्या घटनेमागे लाल बावटा दिसला. जसा पूनमताईला शेतकऱ्यांच्या नाशिक ते मुंबई लॉंग मार्चमागे अर्बन नक्षल दिसला होता. मराठ्यांच्या इतिहासातील संताजीधनाजींनीच जणू लाल बावट्याच्या रूपात पुनर्जन्म घेतलेला दिसतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिवशी बाबासाहेबांचे नातजावई डॉ. आनंद तेलतुंबडे यांना एनआयएचा गैरवापर करून या संघवाल्यांनी कपटाने अटक केली. त्याचा सूड म्हणून बांद्र्याला हजारो कामगार रस्त्यावर उतरल्याच्या भ्रमानं हा भामटा थरथर कापू लागला आहे. ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांना जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर मुंबईच्या गिरणी कामगाराने देशातला पहिला आणि ऐतिहासिक राजकीय संप केला होता, आणि लाल बावट्याला कामगारांच्या त्या लढाऊ परंपरेचा जरूर अभिमान आहे. त्या परंपरेला जागून बांद्र्याचे कामगार प्रा. तेलतुंबडे आणि नवलाखांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले असते, तर सीआयटीयू निश्चितच त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती. पण हा कामगार अजून जागृत झालेला नाही. त्याला एकवेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत आहे. त्यामुळे पोट खपाटीला गेलेला, घरापासून तुटलेला कामगार त्या दिवशी बांद्रा स्टेशनवर आला. त्याला कुणी आणले, याची पाळेमुळे खणून काढलीच पाहिजेत. परंतु, मी नाही त्यातली म्हणत शेलारांनी हा भलताच कांगावा सुरू केलेला दिसतो. संघवाल्यांच्या लाडक्या मयूरपंतांच्या शब्दात थोडा बदल करून “बालिश बहु भक्तात फार बडबडला” इतकेच त्यांच्याविषयी म्हणता येईल.
त्याच दमात करता येतील तितके आरोप करायच्या नादात शेलारांनी पालघर जिल्ह्यातील साधूंच्या हत्येत अटक केलेले कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे आहेत, असा संभावितासारखा प्रश्न विचारला आहे. याला म्हणतात, सौ चूहे खाके बिल्ली चली हाज को. महाराष्ट्र सरकारने पालघरच्या गुन्ह्यात अटक केलेल्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. त्यातील कित्येक कार्यकर्ते आहेत भाजपचे सभासद वा समर्थक. त्यांची नावे भिडे, एकबोटे नसल्याने बहुधा शेलार इदं न मम म्हणत त्यांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून रिकामे झाले आहेत. आपल्या राजकारणासाठी बहुजनांना वापरायचे आणि भिडे-एकबोटे या ब्रह्मवृंदांचे रक्षण करायचे हे आणि हेच भाजपचे राजकारण आहे. “अविवेकाची काजळी, फेडुनि विवेकदीप उजळी” या ज्ञानेश्वरांच्या उक्तीतील विवेक आणि तो दीप विझवू पाहणारी काजळी यातील हा भेद आहे.
भामट्यांचे कारस्थान
रास्व संघाचे ‘ऑर्गनायझर’ हे पत्र म्हणजे तर या भामट्यांचा ऋग्वेदच. २० एप्रिलच्या 'ऑर्गनायझर'ने अकलेचे तारेच तारे तोडले आहेत. त्याने तर अटक केलेले सर्वच्या सर्व ११० माकपचे कार्यकर्ते असून अटक न केलेलेसुद्धा माकपचेच कार्यकर्ते असल्याचे ठोकून दिले आहे. इतकेच नव्हे, तर पालघरच्या शोकांतिकेमागे माकपचे आमदार विनोद निकोले यांचे कारस्थान असल्याची अश्लाघ्य आणि कावेबाज थाप ठोकून दिली आहे. गडचिंचलेच्या अपघाताने झालेल्या सामुदायिक हत्येला गोरक्षकांनी केलेल्या झुंडहत्येसारखा रंग देऊन संघवाल्यांच्या झुंडीच्या हत्या समर्थनीय असल्याचा देखावा उभा केला जात आहे. पण गडचिंचलेच्या त्या गुन्ह्यामागील सत्य समोर आले आहे. त्यामुळे बांद्रा असो वा पालघर, या घटनांसाठी माकपला जबाबदार धरणाऱ्यांची अवस्था तुकारामांनी म्हटल्यानुसार ‘चिरगुटे घालून पोट वाढवणाऱ्या’ वांझेसारखी झाल्यास नवल नाही. मात्र, आपली अब्रू झाकण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा अवमान करत केंद्र सरकार याही बाबतीत एनआयएचा वापर करणार नाहीच, असे नाही.
संघवाल्यांचा हा बथ्थड म्याडनेस केवळ अपघात आहे, असे मात्र समजू नये. त्या म्याडनेसमागेही एक मद्दड मेथड आहे. ‘इफ नॉट मोदी, देन हू’ असा गळा काढणाऱ्या, शाईचा थेंब गाडीवर पडताच हटातटाने पटा रंगवून जटा धरणाऱ्या कुचाळक्यांचा अर्णब असलेल्या गोस्वामीला भारतीय राजकारणाने एक पर्याय दाखवला आहे. देशाच्या पातळीवर मोदी मॉडेलच्या चिंध्या झालेल्या असताना करोनाच्या लढ्यात केरळ मॉडेल यशस्वी ठरताना दिसत आहे. इतक्या देशांचे उंबरे झिजवलेल्या आणि केवळ कोरोनामुळेच स्वदेशात क्वारंटाईन होऊन बसावे लागलेल्या मोदींचे नाव न घेता देशोदेशीचे लोक केरळच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक करू लागले आहेत. डाव्यांची उजवी कामगिरी संघवाल्यांच्या नाकाला झोंबू लागली आहे. त्यासाठी डाव्या विचारसरणीला, डाव्या पक्षांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करायचे षडयंत्र रास्व संघाने रचले आहे. राज्य बांडगुळदारांसाठी की जनतेसाठी असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आरोग्यव्यवस्थेची, अर्थव्यवस्थेची सामाजिक फलश्रुती काय हा प्रश्न कोरोनाच्या निमित्ताने धसाला लागत आहे. कोराना काळातच त्या प्रश्नाला राज्यकर्त्यांना नसले तरी जनतेला भिडावे लागणार आहे.
भारतीय जनता पक्ष सामाजिक न्यायाच्या मारेकऱ्यांचा पक्ष म्हणून नावारूपाला आला आहेच. त्यात शेलारांसारख्या असंख्य पन्नाप्रमुखांची भर पडल्याने त्याचे नामांतर करून आता भाजपचे नामकरण “भामट्या जल्लादांचा पक्ष” असेच केलेले बरे.
_________________________________________________________________________________________________________
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग
================================================================
डॉ. विवेक मॉन्टरो यांचे श्री. आशिष शेलारांना पत्र
२५ एप्रिल २०२०
प्रति,
श्री. आशिषजी शेलार
सप्रेम नमस्कार.
२५ एप्रिल २०२० च्या दैनिक लोकमतमधील ‘काही घटना आणि त्यामागचे बावटे’ या आपल्या लेखामध्ये माझं नाव पाहून मला फारच आश्चर्य वाटले.
आपण लिहिले आहे, “हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा. चार-पाच मजली अनधिकृत झोपड्या असून, मजूर कामगार वस्तीचा आहे. डॉ. माँटेरो महाराष्ट्र सचिव असलेल्या सीआयटीयूशी संलग्न कामगार युनियनने नियोजनबद्ध त्यांना रस्त्यावर उतरवले.”
आपले विधान खोटे तर आहेच, परंतु आपण जाणीवपूर्वक, सूडबुद्धीने व आकसाने माझे नाव यात लिहिलेले आहे. बांद्रा स्टेशनजवळ १४ एप्रिल २०२० ला स्थलांतरित कामगारांची मोठी गर्दी झाली, त्या घटनेत माझे नाव गोवण्याचा आपला हेतू स्पष्ट आहे. हा जमाव संघटित केल्याचा खोटा आरोप आपण माझ्यावर आणि माझ्या कामगार संघटनेवर केलेला आहे. म्हणून मी हे पत्र लिहीत आहे.
या लेखातील इतर मुद्देही खोटे आणि द्वेषपूर्ण हेतूने लिहिलेले आहेत परंतु या पत्रात मी त्या मुद्द्यांबाबत माझे मत लिहीत नाही. मी फक्त काही घटना व तथ्ये नोंदवीत आहे.
आपणांस माहीत आहेच, की मी स्वतः १७ एप्रिल २०२० रोजी एस.एम.एस. द्वारे आपल्याशी संपर्क केला होता. बांद्रा पश्चिम येथील आमदार या नात्याने आपल्या मतदारसंघात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना रेशनचे धान्य उपलब्ध करून देण्यासाठी आपली मदत मागण्याच्या सद्हेतूने मी आपणांस हा मेसेज पाठवला होता. ‘अशा कामगारांना साहाय्य करण्याच्या कामाचे समन्वयाचे काम मी सी.आय.टी.यू. (सीटू) या माझ्या कामगार युनियनतर्फे करीत आहे’, असे मी तुम्हांला लिहिले होते.
माझ्या मेसेजला उत्तर म्हणून जेव्हा तुम्ही उलटा फोन केलात, तेव्हा मी प्रतिसादाबद्दल तुमचे आभार मानले. ‘या कामगारांशी माझा संपर्क कसा?’ असे तुम्ही विचारलेत. महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या परराज्यीय कामगारांच्या मूळ राज्यांकडून माझ्या युनियनकडे मदतीसाठी असंख्य फोन येत असल्याचे मी तुम्हाला सांगितले. “जेवण व शिधा साहाय्य मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना मदत करीत आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेली जेवणाची सोय अपुरी आणि अनियमित असल्यामुळे असंख्य कामगार उपाशी आहेत, म्हणून त्यांना धान्य दिले पाहिजे”, असेही मी आपणांस सांगितले.
“बहुतांश कामगारांना लॉकडाउनच्या काळात रोजगार नसल्याने त्यांना आपापल्या राज्यात परत जायची इच्छा आहे. पण जोपर्यंत त्यांना परत जाण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्यांना शासनातर्फे शिधा दिला पाहिजे कारण त्यांच्याकडे महाराष्ट्रात ग्राह्य असलेली शिधापत्रिका नाही.” अशी आपली चर्चा झाली. “कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे स्थलांतरित कामगारांसाठी चालू असलेल्या शिधावाटप मदत कार्याच्या संयोजनातही मी सहभागी आहे”, असेही मी आपणांस सांगितले. स्थलांतरित कामगारांच्या मदत कार्यासाठी तुमच्या आमदार निधीतून ५० लाख रूपयांची मदत देऊ करणारे पत्र तुम्ही महाराष्ट्र शासनास लिहिलेले असून शासन प्रतिसाद देत नसल्याचे तुम्ही मला सांगितले.
‘असे किती कामगार आहेत?’ हे आपण मला विचारले. ‘शास्त्रीनगर आणि आसपासच्या भागात कमीतकमी ५००० कामगार नक्कीच असावेत’ असे मी तुम्हाला सांगितले. १८ एप्रिलला मी तुम्हाला पुन्हा एक मेसेज पाठवून तुमचा व्हॉटस्एप नंबर आणि इमेल पत्ता मागितला आणि तुम्ही तो पाठवलाही.
तुमच्या मतदारसंघात अडकलेल्या अशा असंख्य कामगारांना धान्यपुरवठा करण्याच्या कामात तेथील आमदार या नात्याने तुमची मदत घेण्यासाठी तुम्हाला जास्तीची माहिती पाठवण्यासाठी मी या गोष्टी मागितल्या होत्या.
आपली फोनवरील चर्चा सकारात्मक होती. देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या कार्यात सहकार्य करण्याबाबतची होती. त्यामुळेच आपला आजच्या लोकमतमधील लेख वाचून मी आश्चर्यचकित झालो आहे.
आता मात्र हे स्पष्ट दिसत आहे की तुमच्या लेखाचा हेतू खोडसाळ आणि आकसातून आलेला आहे.
म्हणून मी अशी मागणी करतो की, वर उल्लेख केलेले विधान आपण स्पष्टपणे मागे घ्यावे. तसेच, मी आणि माझी कामगार संघटना यांच्यावर खोटा बदनामीकारक आरोप प्रसारमाध्यमातून केल्याबद्दल आपण माफी मागावी.
धन्यवाद.
डॉ. विवेक माँटेरो
सचिव, महाराष्ट्र राज्य सी. आय. टी. यु.
कामगार संघटना संयुक्त कृती समिती

No comments:
Post a Comment