Wednesday, 26 August 2020

२१ - “जाति न पूछो साधु की”


 
जीवनमार्ग बुलेटिन : २१

मंगळवार, २१ एप्रिल २०२०

“जाति न पूछो साधु की”

“भाजपमध्ये जे जे विकृत त्याचे प्रतिक म्हणजे संबित पात्रा”, असे एका पत्रकाराने केलेल वर्णन पुनःपुन्हा खरे करण्यासाठीच हे वाचाळ गृहस्थ आपले तोंड उघडत असतात. १६ एप्रिलला पालघर जिल्ह्यातील एका अतिशय दुर्गम भागात रात्रीच्या अंधारात झालेल्या समुदायाच्या दुर्दैवी हल्ल्यात तीन जणांची हत्या झाली. त्यात दोन भगव्या वस्त्रधारी व्यक्तींचा समावेश असल्याने लगेच याचे राजकारण करता येईल हे कावळ्याच्या नजरेने ओळखून भाजपच्या या प्रवक्त्याने त्याला धार्मिक रंग देण्याचा गलिच्छ प्रयत्न केला. केवळ अफवा पसरल्यामुळे भयभीत झालेल्या लोकांनी गैरसमजातून या भागातून प्रवास करणाऱ्या या तिऱ्हाईत व्यक्तींची केलेली हत्या अतिशय दुर्दैवी आहे. या घृणास्पद हत्येचा 'जीवनमार्ग' तीव्र निषेध करत आहे. मॉब लिंचिंगसारखे घातक कृत्य महाराष्ट्राच्या एका कानाकोपऱ्यात आणि अतिशय मागास भागात असलेल्या गावापर्यंत पोहोचले आहे, ही अतिशय चिंताजनक बाब असून या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, याची सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी गुन्हेगारांना कडक शासन होणे महत्वाचे आहे.
मॉब लिंचिंगची शिकार झालेल्यात दोन भटक्या समाजातील साधू आणि त्यांचा ड्रायव्हर यांचा समावेश आहे. ते साधू होते हा केवळ योगायोग होता. या गुन्ह्याचा तपास गुप्तचर खात्याला दिलेला असल्याने त्यामागील सत्य बाहेर येईलच. परंतु, भाजपच्या मंडळींनी आयतेच उद्धव ठाकरे सरकारला खिंडीत पकडायची संधी का सोडावी? म्हणून घाईघाईने त्यांना साधूंचा धर्म दिसला. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी हल्ला करणारे काही भाजपवाले निर्देश करत असलेल्या समाजाचे नव्हते हे लगेच लक्षात आणून दिले आहे. पण तोपर्यंत संबित पात्रासारख्या अर्ध्याकच्च्यांनी साधायचा तो कावा साधून घेतला. भारतभर हिंदू धर्माच्या नावाने विनाकारण आवई उठवून दिली. सवयीनुसार त्यांनी मढ्याच्या टाळूवरील लोणी चाखले.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी याविषयी तातडीने स्वागतार्ह असे निवेदन केले. त्यांनी ही घटना धर्मांध मॉब लिंचिंगची नव्हती, हे निःसंदिग्धरित्या स्पष्ट केले हे बरे झाले. या परिसरात राहणाऱ्या काही डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित लोकांनी त्या परिसरात गेले काही दिवस अफवा पसरत असल्याचे निदर्शनाला आणून दिले आहे. त्या परिसरात लॉकडाऊनचा फायदा घेऊन दरवडेखोर फिरत असल्याच्या अफवांसोबतच मुस्लिम लोक वेशांतर करून मुले पळवून त्यांच्या किडन्या काढत आहेत, विहिरींत थुंकून ते कोरोना पसरवत आहेत, अशाही अफवा पसरवल्या जात होत्या, असे काही नामवंत पत्रकारांनी नजरेला आणून दिले आहे. तसे काही अघटित होऊ नये, म्हणून स्थानिक लोक गस्त घालत होते, असेही सांगितले जाते. या संशयाच्या वातावरणात बिथरलेल्या जनतेला विवेकाने वागायची सवय आवश्यक असते. त्याचा अर्थातच आपल्या समाजात मोठा अभाव आहे. हे समजून न घेणारेही अविवेकाची पेरणी करायचे कामच करत असतात. म्हणून या घटनेला धार्मिक रंग देणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेले कडक धोरण शिथिल होता कामा नये.
हे बळी पडलेले लोक कुणा परिचिताच्या अंत्यदर्शनासाठी कांदिवलीहून गुजरातला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी संबंधित शासकीय खात्याकडून तशी परवानगी घेतली होती का, याचा छडा लागला पाहिजे. मधल्या एका नाक्यावर ती गाडी पोलिसांनी अडवल्यावर त्यांना परवाना सादर करता आला नसावा. म्हणूनच आडमार्गाने ड्रायव्हरने गाडी काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नवखे लोक सामान्य वातावरणात देखील अपरिचित दुर्गम प्रदेशातून प्रवास करण्याचे टाळत असतात. कोरोनाचा असामान्य काळ, रात्रीची वेळ आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला समाज अशा वातावरणात ते प्रवासी दुर्दैवाने सापडले. अर्थात, अशा अघोरी वेळी कुणी प्रवासी अडचणीत असेल तर त्याला मदत करायलाही लोक पुढे येत असतात. ते येथे झालेले दिसत नाही.
या प्रसंगाला राजकीय रंग द्यायची उठाठेव भाजपचे सुनिल देवधर यांनी जाणीवपूर्वक केली. त्यांचीच री पुढे संबित पात्रांनी ओढली आहे. सुनिल देवधर यांनी या मतदारसंघात माकपचे कॉ. विनोद निकोले हे आमदार असल्याचा केलेला उल्लेख खोडसाळपणाचा आहे. खरे तर सुनिल देवधर हे या भागाला नवखे नाहीत. त्यांना ही घटना घडलेल्या गडचिंचले गावाच्या ग्रामपंचायतीत गेली दहा वर्षे भाजपची सत्ता असून तेथे चित्रा चौधरी या भाजपच्या सरपंच असल्याचे का आठवले नाही? त्यांनी वडाची साल पिंपळाला लावायचा प्रकार केला आहे.
रास्व संघाने सुनिल देवधर यांना गेली साठसत्तर वर्षे कॉ. शामराव आणि गोदूताई परूळेकर यांच्या नेतृत्वाखालील वाढत असलेली वारल्यांच्या लाल बावट्याची चळवळ संपवायची सुपारी दिली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अवैध मार्गांचा वापर करून, पैश्याचा अमाप गैरवापर करून पक्षात दुही पेरून भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. २०१९च्या निवडणुकीपूर्वी माकपने मोठ्या कष्टाने पुन्हा आपली ताकद बांधली, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि कष्टकरी संघटना यांनी माकपला पाठिंबा दिला आणि त्या आदिवासी, कष्टकरी, सर्व जातीधर्माच्या जनतेने कॉ. विनोद निकोलेंना निवडून आणले. त्याचा राग मनात धरून या देवधरने गडचिंचलेच्या एका दगडात अनेक पक्षी मारायचा प्रयत्न केला आहे. अर्थात, तो दगड त्यांच्या तोंडावरच आपटणार आहे. कारण अटक केलेल्यात त्या गावातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. उद्या त्यांनी भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश केल्याची फेक न्यूजही पसरवायला हे संस्कारी नेते मागेपुढे पाहणार नाहीत.
असे वातावरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमात भाजपच्या आयटी सेलने पसरवले आहे. कोरोना काळात मुस्लिम लोक साधूंच्या वेशात कोरोनाचा प्रसार करत फिरतील, असे संदेश गेले किती दिवस फिरत आहेत, हे पात्रा-देवधरांना शोधून काढणे अशक्य नाही. त्या संदेशांनी भीतीचे वातावरण तयार केले. साधू दिसले. गावकऱ्यांनी त्यांना जबर, अमानुष मारहाण केली, त्यात तिघांचा मृत्यू झाला. मात्र, कुणीही सूत पकडून स्वर्ग गाठणे योग्य नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. साधूची जात विचारू नका, अशी कबिराने केलेली विनवणी विसरूया नको.
या घटनेच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेने वाहत्या पाण्यात हात धुवून घेत डाव्यांचे षडयंत्र, पालघर में वामपंथियों की बढती गतिविधिया अशी लगेच कावकाव सुरू केली आहे. सत्य समोर येताच ती कावकाव शांतही होऊ लागली आहे. चार दिवस थोडा आवाज करून ते नव्या पिंडीच्या शोधात निघतील. भीमा-कोरेगाव प्रकरणी खोटी केस रचून निरपराधांना छळण्याचे काम फडणविसांनी केले होते. सत्ताभ्रष्ट झालेल्या या समंधाने आता त्यांच्यामागे एनआयचे पिशाच्च लावले आहे. इतकी मर्दुमकी पाठीशी असताना या क्षणी मी मुख्यमंत्री का नाही, म्हणून ते मनातल्या मनात जळत असणार.
या निमित्ताने पोलीस यंत्रणेच्या कमजोऱ्याही पुढे आल्या आहेत. दरवडेखोरीच्या, कोरोनाबाबतच्या अफवा पसरल्यानंतर त्यांचा बंदोबस्त पोलीस खात्याने करायला हवा होता. पण लोकच गस्ती रखवालीचे काम करत आहेत, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले असणे शक्य आहे. आपली कर्तव्यातील ढिलाई झाकण्याचा खाक्या पोलीस येथेही वापरताना आढळत आहेत. गडचिंचलेपासून अनेक किलोमीटर दूर असलेल्या गावकऱ्यांनाही पोलीस ताब्यात घेत आहेत. सुक्याबरोबर ओलेही जळणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे.
दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे यात शंकाच नाही. पण त्या दुर्दैवी साधूंना गुन्हेगार समजण्याची चूक समाजाने केली. तीच चूक पोलिसांनी समाजाबाबत करू नये.
___________________________________________________________________________________________________________
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग

No comments:

Post a Comment