Wednesday, 26 August 2020

१९ - फुकाची आणि कोती ‘दूरदृष्टी’

 जीवनमार्ग बुलेटिन: १९

रविवार, १९ एप्रिल २०२०

फुकाची आणि कोती ‘दूरदृष्टी’

धर्माचे स्वघोषित ठेकेदार त्या धर्माच्या निष्पाप अनुयायांना मूर्ख बनवून कायमचे अडचणीत आणत असतात. तबलिगी जमात हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्या जमातीच्या संघटकांच्या एका मूर्ख आणि आढ्यताखोर निर्णयाची किंमत संपूर्ण समाजाला भोगावी लागत आहे. रास्व संघाने मुस्लिमांना भारताचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू ठरवले असताना आणि ती बहुसंख्य गोरगरीब, मागास जनता त्याचे भोग सतत भोगत असताना त्या आगीत तेल ओतायचे काम तबलिगीच्या तथाकथित नेत्यांनी केले आहे. तेवढे शहाणपण असते, तर त्यांनी आपल्या अनुयायांना आधुनिक विज्ञानाची कास धरायची शिकवण दिली असती. त्या ऐवजी तेथे गेलेल्या तीन हजार अनुयायांना त्यांनी आपल्याला ७०,००० देवदूत संरक्षण करायला सिद्ध असल्याची महामूर्खपणाची ग्वाही दिली. पण खुद्द मौलाना सादलाच जेव्हा कोव्हिड-१९ च्या विषाणूने गाठले तेव्हा हे सारे देवदूत कुठल्या विश्वातल्या विषाणूशी सामना करायला गेले होते, कुणास ठाऊक ! त्या मौलानाच्या मस्तीची शिक्षा विनाकारण मुस्लिम समाज भोगू लागला आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
रास्व संघाची गढूळ पाण्यातील मासेमारी
एका धर्मातील धर्मांध हे दुसऱ्या धर्मातील धर्मांधांचे गुप्तहेर असल्यासारखेच वागत असतात, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. कोरोनासारख्या महाभयानक रोगराईतही या प्रकारची द्वेषभक्ती कमी होत नाही, हे चिंताजनक आहे. जणू काही निजामुद्दिनला जमा झालेले लोक हे मानवी बॉंब बनायलाच गेले होते आणि ते ठरवून देश उध्वस्त करायला सर्वत्र विखुरले असल्याचा हास्यास्पद पण विषारी प्रचार व्हॉट्सॅप विद्यापीठाचे स्नातक मोठ्या हिरीरीने करत आहेत. अर्थात, हे शहाणपण काही त्यांच्या उजाड मेंदूत उगवलेले नाही. रास्व संघाचा 'ऑर्गनायझर' या विषाची पेरणी सढळ हस्ते करत असतो. कोव्हिडच्या प्रसारास एका बाजूला चीनला जबाबदार धरत त्याने हळूच भारतातील मुसलमानांवर तीर मारण्यासाठी तबलिगला लक्ष्य केले आहे. त्याच्या मते भारतात कोरोना पसरायला निझामुद्दिनचा तो कार्यक्रमच जबाबदार आहे. यापूर्वी दहशतवादाला मुस्लिम पेहराव चढवला होता. आता मुस्लिमांना नव्या दहशतवादी बुरख्यात पुढे करायची चाल 'ऑर्गनाझर'ने खेळली आहे. त्यासाठी त्याने ‘बायोमास टेररिझम’ नावाचा शब्दप्रयोग शोधून काढला आहे. म्हणे मुस्लिम शरीरांचा वापर भारतात या प्रकारचा दहशतवाद पसरवण्यासाठी करण्याचा कट निजामुद्दिनच्या मरकजमध्ये रचण्यात आला. हे करत असताना कोरोनाविरुद्धची लढाई निसर्गातील विषाणूशी नसून एका धर्मालाच विषाणूच्या वेशात सादर करायची हिकमत 'ऑर्गनायझर' करत आहे. जसे तबलिगच्या मूर्खपणाला त्याचे अनुयायी बळी पडले, तद्वतच 'ऑर्गनायझर'च्या विचारधारेचे महामूर्ख अनुयायी मुस्लिमांचे बुजगावणे उभारत आहेत.
अर्थात, हे अनवधानाने होत नाही. त्यामागेही एक दूरदृष्टी कार्यरत आहे. कोव्हिडविरुद्धच्या युद्धातली पहिली लढाई चीनने व पाठोपाठ दक्षिण कोरिया, सिंगापूर आदींनी जिंकल्यात जमा आहे. ती जिंकता येते, असा आत्मविश्वास भारताच्याच केरळने दिला आहे. अशा परिस्थितीत आज ना उद्या संपूर्ण भारत देश त्यावर मात करील. मुद्दा केवळ मात करण्याचा नाही. त्यासाठी किती किंमत मोजावी लागेल, याचा जमाखर्च त्यानंतर जमवावा लागणार आहे. कोव्हिडच्या विषाणूने आजमितीला ५०० हून अधिक भारतीयांचा बळी घेतला आहे. त्याचबरोबर घाईघाईने राबवलेल्या लॉकडाऊनने बेघर झालेल्या किमान २२ गरिबांना परलोकीच्या यात्रेला पाठवले आहे. हा लॉकडाऊन आणि यापुढील स्थानिक स्तरावर करायच्या टाळेबंदीच्या योजनांमुळे गाळात जाणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यातून बाहेर काढण्याची दृष्टी भाजप सरकारकडे अजिबात नाही. या विषाणूचा मागमूसही नसताना आधीच देश रसातळाला गेलेलाच होता. त्यातून बाहेर येण्याचा कुठलाच मार्ग हे सरकार दाखवत नव्हते. कसे दाखवणार? त्याने दाखवलेल्या वाटेने गेल्यानेच तर देशाची ही अवस्था झाली होती ना ! जेव्हाकेव्हा आपण कोरोनाच्या तावडीतून मुक्त होऊ तेव्हा सरकारला आपले अपयश झाकण्यासाठी काही ना काही कारण लागणार आहे. त्याची ही तयारी आहे. म्हणूनच सत्तेच्या माश्यासाठी पाणी ढवळून गढूळ केले जात आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
मुस्लिम - नवे दलित
कोरोनाच्या आणि तदनुषंगिक संभाव्य आर्थिक दिवाळखोरीच्या शोकात्मिकेतील खलनायक चितारण्याची ही तयारी आहे. संघाचे स्नातक हे पसरवत राहतील यात नवे काहीच नाही. अहमदाबादेतील एका इस्पितळात हिंदू आणि मुस्लिमांना अलग ठेवण्यात येत असल्याचे वृत्त येऊन गेले. त्याचा भारत सरकारने इन्कार केला आहे. ते सत्य नसेल तर तशी अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे. पण आग लागल्याशिवाय धूर निघत नसतो, हाही आपला अनुभव आहे. आणि पलिकडे प्रत्यक्ष आग लागलेली दिसत असताना तो हिमवर्षाव आहे, असे काही आपण म्हणू शकत नाही. योग्याचा बुरखा पांघरलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय मोहन बिश्त यांचे मुस्लिमप्रेम किती उतू जात आहे, ते आपण पाहिलेले आहेच. त्यांच्या राज्यात मीरत येथील एका कॅन्सर हॉस्पिटलने वर्तमानपत्रात मुस्लिमद्वेषाला खतपाणी घालणारी जाहिरातच दिली आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या मुस्लिम रुग्णांनी कोरोना निगेटिव्ह असल्याचा दाखला घेऊन यावा, असा संतापजनक फतवाच त्या इस्पितळाने काढला आहे. मुस्लिमांमागील कागदी वाघाचा ससेमिरा काही सुटता सुटत नाही, असे दिसते. त्याच जाहिरातीत हिंदू आणि जैन समुदायातील व्यक्तींनी कंजूषपणा न दाखवता कोरोनाशी लढायला सढळ हाताने आर्थिक मदत करावी, अशी विनवणी त्या जाहिरातीत केल्याने त्या दोन्ही अहिंसक, सहिष्णु समुदायांच्या भावना दुखावल्याने त्यांचे पित्त खवळले आणि त्या इस्पितळाच्या संचालकांना जाहीर माफी मागायला लावली. योग्याचे हिंदुराज्य असल्याने लगेच माफी मागण्यात आली, पण मुस्लिम हे सैतानाचे पुत्र असल्याने त्यांना भावना वगैरे असणे शक्य नाही. त्यामुळे त्याविषयी खेद व्यक्त करण्याचा प्रश्नही उपस्थित होत नाही.
पंडित नेहरूंनी इस्पितळासारख्या आधुनिक लोकोपयोगी संस्थांना मंदिरांची, तीर्थक्षेत्रांची उपमा दिली होती. पूर्वास्पृश्यांना आणि एकूणच दलितांना मंदिर प्रवेशास बंदी हा रास्व संघाच्या हिंदू संस्कृतीचा 'वैभवशाली' वारसा आहे. तोच वारसा चालवत दलितांसह मुस्लिमांना कोथरूड, एरंडवणे आणि डोंबिवली येथील गेटेड कम्युनिट्यांमध्ये प्रवेशास अलिखित बंदी आहे. लॉकडाऊनच्या काळात तेथील राष्ट्रभक्तांचा दलितविरोधी, मुस्लिमविरोधी चेहरा जास्त जास्त उग्र दिसण्याचे प्रसंग घडू लागले आहेत. ज्या काश्मिरी मुस्लिमाला देशाचा शत्रू ठरवून या संस्कृतीरक्षकांनी त्याची लांडगेतोड केली तेथील एक मुस्लिम कुटुंब मोदींनी घाईगर्दीने केलेल्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गुत्तीकर या मराठी तरूण चित्रपटकर्त्याला आजही कशी मदत करत आहे, याचे वृत्त आपण वाचले आहे. पण सार्वजनिक ठिकाणाहून, नव्या मंदिरांतून दलितांप्रमाणेच मुस्लिमांना हद्दपार केले जात आहे. काही दलित नेते मासा होऊन मनूच्या पोटात सुरक्षित झाले आहेत. नरेंद्र मोदींनी अमित शहांवर सोयीनुसार काहीजणांच्या चौकश्या करायचे वा त्या थांबवायचे, काहींचा सुरक्षित अंतरावरून बाहेरून पाठिंबा घ्यायचे काम सोपवले आहे. एकजण तर ‘गो करोना’ चे मंत्रपठण करण्यातच धन्यता मानत असल्याने काम जास्तच सोपे झाले आहे. पण ब्राह्मणाला अस्पृश्यता पाळल्याखेरीज पावित्र्य प्राप्त करता येत नाही. तेव्हा मनुच्या साम्राज्यात अस्पृश्य गरजेचेच. रास्व संघाच्या या मनुराज्यात मुस्लिम हे नवे दलित आहेत. त्यांची अवस्था दलितांहून भयानक असल्याचे सच्चर आयोगाने लिहून ठेवलेले आहेच.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
द्वेषभक्तांची कुटील नीती
मुस्लिमांना लक्ष्य करणारे समाजकंटक, आमच्या मुख्य प्रवाहाच्या काठाने पोहणारे काही द्वाड लोक आहेत, असा सोयीचा पवित्रा संघ नेहमीच घेत आला आहे. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावई असलेल्या आनंद तेलतुंबडेंना बाबासाहेबांच्या जयंतीलाच अटक करायचे आणि भीमा-कोरेगावचे षडयंत्र रचणाऱ्या ‘काठावरच्या’ भिडे-एकबोटे या एकारान्तांना ‘जा पळा, आम्ही आहोत’ म्हणायचे, ही यांची शकुनी नीती पुन्हा समोर आली आहे. या द्वेषभक्तीच्या विषाणूने आजवर डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश आणि कित्येक गोरगरीब मुस्लिमांचे बळी घेतले आहेत. सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासकट कित्येकांच्या पाठी द्वेषविषाणू लावून त्यांचे समाजापासून ‘विलगीकरण’ केले आहे.
पण मुख्य प्रवाहच गढूळ आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. लव अग्रवाल यांचे कालचे निवेदन. सरकारच्या वतीने कोव्हिड-१९ संबंधी दैनंदिन जाहीर निवेदन हे अग्रवाल करत असतात. देशातील १४,३७८ कोरोना रुग्णांपैकी ४,२९१ म्हणजे एक तृतियांश रुग्ण तबलिग जमातीच्या निजामुद्दिन मरकजशी संबंधित आहेत, असे त्यांनी केलेले विधान अतिशय निषेधार्ह आहे. दहशतावादाला धर्म नसतो म्हणत म्हणत हळूच धर्माच्या नावाची पुंगळी सोडून द्यायची, या परंपरेला धरूनच भाजपच्या केंद्र सरकारने त्यांना हे निवेदन करायला लावले आहे. वस्तुतः खुद्द केंद्र सरकारनेच एका आदेशान्वये कोरोनाला धार्मिक रंग देऊ नये, असा सर्वांना सल्ला दिलेला आहे. ८ एप्रिलला काढलेल्या त्या आदेशात ‘कोव्हिड-१९ ला कोणत्या एका समाजाचे वा प्रदेशाचे लेबल चिकटवण्यात येऊ नये,’ असे म्हटले आहे. त्याचेच उल्लंघन या लवाकरवी करण्यात आले आहे.
ही भाषा अपवादात्मक नाही. इस्पितळात येण्यापासून मीरतसारखे मुस्लिमांना रोखले जात आहे. मुस्लिम भाजी विक्रेत्यांना मारहाण करणारे व्हिडिओ योजनाब्द्धरित्या प्रसारित केले जात आहेत. एक तृतियांश रुग्णांच्या धार्मिक ओळखीकडे एक बोट दाखवले जात असता २/३ इतर धर्मीयांकडे चार बोटे निर्देश करतात, त्याचे काय? उरलेले १०,००० हून अधिक रुग्ण कोणत्या धर्माचे आहेत? कोव्हिडची लागण झाल्यानंतर विविध देशांमधून भारतात परतलेल्या १५ लाखांहून अधिक लोकांचा धर्म कोणता?
तबलिगला परदेशातून आलेल्या लोकांना व्हिसा कोणी दिला, त्यांना भारतात प्रवेश कसा देण्यात आला? निजामुद्दिन येथील १,५०० लोकांना बाहेर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात का अपयश आले? सर्वात कळीची बाब म्हणजे तबलिगच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्ली पोलिसांनी का व कशी दिली? दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृह मंत्रालयाखाली येत असल्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची ती जबाबदारी नाही का? महाराष्ट्रात त्याच सुमारास वसई येथे तबलिगच्या अशाच कार्यक्रमाला येथील राज्य सरकारने जशी परवानगी नाकारली, तशी दिल्लीत का नाकारली नाही? या सर्व प्रश्नांचीही उत्तरे दिली पाहिजेत.
कोव्हिडला धर्म, वंश, देश यांच्या चष्म्यातून पाहिल्यास ही लढाई अवघड होईल, असा रास्त इशारा जागतिक आरोग्य संस्थेने जगाला दिला आहे. आपल्याला नेमके कशाशी आणि कुणाशी लढायचे आहे, हे भारताच्या सरकारने निःसंदिग्ध शब्दात सांगितले पाहिजे. पेला किती भरलेला आहे आणि किती रिकामा आहे, याची फिजूल चर्चा करण्यापेक्षा मोदी बादशहांनी कोव्हिडच्या लढाईत पिनरायी विजयन यांच्यासारखे स्वतःला झोकून द्यावे. ‘कोरोनौत्तर’ काळात सत्ता टिकवण्याविषयी फुकाची दूरदृष्टी दाखवत बसले तर पुढच्या खड्डयात पाय जाऊन देशवासियांचा कपाळमोक्ष व्हायचा.
__________________________________________________________________________________________________________
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग

No comments:

Post a Comment