Monday, 17 August 2020

४ - दिवे लावा, करोना पळवा!


 जीवनमार्ग बुलेटिन: ४

शनिवार, ४ एप्रिल २०२०

दिवे लावा, करोना पळवा!

रामदास आठवलेंनी 'करोना गो' चा मंत्र दिल्यापासून मोदींनी ते काम फारच मनावर घेतलेलं दिसतंय. आपले पंप्र नमो हे मुळात अतिशय आनंदी आणि खेळकर मनोवृत्तीचे गृहस्थ आहेत. मित्रांना बोलावून त्यांना ऊंधयूं अने फाफडो खायला घालणे, त्यांना गरबा करायला लावून आपण स्वत: नगारा बडवणे त्यांना मनापासून आवडते.
केवळ या भावनेतून त्यांनी त्यांचे जगप्रसिद्ध समानशील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (काही लोक हा शब्द डोलांड असा लिहितात, अडाणी टीव्ही बातमीदारांचा प्रभाव असावा) यांना अहमदाबादेत बोलावले; त्यांना दहा लाखांचा जमाव प्रॉमिस केला होता, पण पंधरा लाख गोळा करून दाखवले. पंप्र आकड्यांच्या हेराफेरीबद्दल मशहूर असल्याने या आकड्यांवर फार विश्वास ठेवायचा नसतो. (आणि ट्रंप थोडाच मोजत बसणार आहे ?) पण असा मित्रभेटीचा महोत्सव झाला खरा!
मधेच ट्रंपतात्यांनी विचारले, की मध्यंतरी तुम्ही गुजरातमधे २००२ साली जे हत्याकांड घडवले म्हणून तुमच्यावर आमच्याकडे यायला बंदी होती, ते हत्याकांड कसे असते? त्यावर शेठ म्हणाले, एवढेच ना? आत्ता दाखवतो, असे म्हणून दिल्लीमधे १०० लोक कापून काढले.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
जाताजाता सांगायचे तर शेठने कित्येक महिन्यांपासून राज्यांना GST चा वाटा दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या तिजोऱ्या रिकाम्याच आहेत. विमानतळावर कुणाची तपासणी करायची, कुणाची नाही, हे नीट न ठरल्यामुळे किती करोनाग्रस्त मुक्तपणे उंडारताहेत, कुणाला ठाऊक नाही. जानेवारीपासून कारखानदार आणि व्यापारी मास्क आणि व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी स्पेसिफिकेशन्स मागताहेत, पण गुजरातमधून अशी मागणी आली नसेल, तर शेठ तरी काय सांगणार?
आणखी एक महत्त्वाचे काम बाकी होते. निवडणुका हरल्या तरी तिथे आपले सरकार स्थापन करायचे तंत्र आधुनिक चाणक्य यांनी विकसित केले आहे. ते म्हणजे आमदार विकत घ्यायचे. त्याला ऑपरेशन कमळ असे भारी नाव आहे. ते गोव्यात करून झाले, इशान्येकडे करून झाले, नुकतेच कर्नाटकात देखील झाले. तोच खेळ भोपाळमधे देखील करून दाखवायचा होता, काही दिवस त्यात गेले. आता कुठे शेठला करोना कडे लक्ष द्यायला फुरसद मिळाली. शेठच्या कामाचा झपाटा एवढा की नेहमीप्रमाणे आठ वाजता टीव्ही वर येऊन घोषणा केली. शेठ आठ वाजता टीव्हीवर आले की बारा वाजता जनतेचे बारा वाजणार हे एव्हाना सगळ्यांना ठाऊक झाले आहे. नोटाबंदीच्या अनुभवाने ते शिकवले आहे. आता लगोलग बारा वाजता देशभर शेठने लॉकडाऊन जाहीर केला. झाले ! ट्रेन बंद, बसेस बंद, असंघटित मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून लांबवर आलेले, त्यांनी काय करायचे? निघाले आपले चालत मैलन मैल.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
शेठने करोना रोखण्यासाठी पहिला जाहीर कार्यक्रम सांगितला - खिडकीत येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवा. इटली मध्ये लोकांनी वैद्यकीय हिरोंचे आभार मानण्याकरीता हे केले होते, म्हणून आपणही करायचे! झाले, आपल्याकडची भक्त मंडळी लागली बडवायला, रस्त्यावर येऊन करोना च्या नावाने शिमगा करायला.
आणखी एक उत्सवी कार्यक्रम जाहीर केलाय ना शेठने ! तो म्हणजे अंधार करून करोना ला घाबरवायचे आणि नंतर खिडकीत येऊन मेणबत्ती, टॉर्च, आरती काही तरी पेटवून करोना आणि शेठची आरती करायची ! अर्थात ही उत्सवी कल्पनादेखील शेठच्या स्वत:च्या डोक्यातील नव्हे , ती पण इटली कडून चोरलेली.
थोडक्यात, हा मनुष्य - एवढ्या प्रचंड देशाचा पंप्र, एवढे जगाच्या तोंडाला फेस आणणारे आव्हान पेलण्यासाठी काय करतो? तर थाळ्या बडवायला आणि आरती करायला सांगतोय, आणि आपल्या अकलेची झेप एवढीच आहे, हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून धर्मद्वेषाच्या मशाली पेटवत ठेवतो.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
डाव्या पक्षांचे संयुक्त निवेदन
पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिव्याखालच्या अंधाराकडे कुणी लक्ष दिलेच पाहिजे. त्यासाठी माकप, भाकप, भाकप (माले - लिबरेशन), आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांच्या वतीने एक संयुक्त पत्रक काढण्यात आले आहे. त्या पत्रकात केंद्र सरकारने जनतेला युद्धपातळीवर कोणती मदत केली पाहिजे, हे सांगितले आहे.
देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे. या एका आठवड्यातच जनतेपुढे उभ्या राहिलेल्या गंभीर समस्यांवर केंद्र सरकारने कसलाही थिल्लरपणा न करता उपाय करण्याची गरज त्या पत्रकात व्यक्त केली आहे. त्या पत्रकाचा सारांश असा:
१. पंतप्रधानांच्या या अचानक केलेल्या घोषणेने कोट्यवधी स्थलांतरित कामगार एका रात्रीत बेदखल झाले आणि त्यांचे लोंढे आपापल्या गावांकडे परतू लागले. त्यांची कुटुंबे उपासमार आणि कुपोषणाची शिकार बनले आहेत. जनतेच्या अशा शारीरिक कमजोरीवरच कोव्हिड-१९ विषाणूची रोगराई पोसत असते. पंतप्रधानांनी जनधन योजनेतील, बीपीएलखालील सर्वांना आणि असंघटित कामगारांना प्रत्येकी ५००० रु. त्वरित दिले पाहिजेत.
रेशन कार्ड असो वा नसो, सर्व स्थलांतरित आणि गरीब कुटुंबांना प्रत्येकी ३५ किलो धान्य केंद्र सरकारने पुरवले पाहिजे. सरकारकडे ७.५ कोटी टन धान्य पडून आहे. दूरवरून आपल्या गावी परतलेल्या स्थलांतरित कामगारांना त्वरित आरोग्य सुविधा पुरवली पाहिजे. देशाच्या सर्व भागात निरोगी आणि परिणामकारक विलगीकरणाची सोय केली पाहिजे. त्यांच्यावर होणारे पोलिसी अत्याचार थांबवून असे अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.
कोव्हिड-१९ प्रसार रोखण्यासाठी शहरांतील झोपडपट्ट्या आणि कामगार वस्त्यांत गरजूंना पुरेसे धान्य व गरजेच्या वस्तू पुरवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना आपला माल कमी किंमतीत विकावा लागू नये, यासाठी तो अन्न महामंडळाने खरेदी केला पाहिजे.
२. हे सर्व काम राज्यांना करावे लागणार आहे. आज राज्यांची आर्थिक अवस्था डबघाईला आलेली आहे. केंद्राने त्यांना सढळ हाताने आर्थिक मदत केली पाहिजे. कर्जउभारणीवर राज्यांना असलेले बंधन सैल केले पाहिजे.
३. जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्याराज्यातून होणाऱ्या त्यांच्या वाहतुकीविषयी स्पष्टता नाही. या वस्तू व औषधे त्वरित उपलब्ध झाली पाहिजेत.
४. आपला जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी सुरक्षा साधनांशिवाय धैर्याने काम करत आहेत. त्यांना ही साधने व औषधे तातडीने पुरवली पाहिजेत. व्हेन्टिलेटर सारखी साधने त्वरित दिली पाहिजेत. इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आजवर ४३ रुग्ण दगावले आहेत.
५. ही रोगराई वेगाने पसरत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तपासणी केली पाहिजे. ते विभाग अलग करून रुग्णांवर उपचार केले पाहिजेत. मेडिकल कौन्सिलने मान्यता दिलेले तपासणी किट देशभर उपलब्ध करून दिले पाहिजेत. आज भारताचा तपासणी दर जगात फार खाली आहे. तो दक्षिण कोरियाहून २४१ पटीनं कमी आहे.
६. तबलिगी जमातीने निषेधार्ह बेजबाबदारपणा दाखवला आहे. त्यांच्या कृतीला प्रतिक्रिया देतानाही निषेधार्ह धर्मांधता व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या कृतींनी समाजातील एकजूट भंग होऊन कोव्हिड-१९ विरुद्धची लढाई कमजोर होईल. या विषाणूची लागण हा डाग नसून त्या रुग्णांना सहानुभूतीची गरज आहे. याविषयीच्या फेक न्यूजला आळा घालून वैज्ञानिक जाणीव प्रसृत केली पाहिजे. निर्धाराने करायच्या कोव्हिड-१९ विरुद्धच्या लढाईत केंद्राने सर्वांना सहभागी करून घेतले पाहिजे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
केरळचे सरकार - लोकांचे सरकार
देशाचे पंतप्रधान घोषणांचे पोकळ फुगे उडवत असताना केरळचे डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार खऱ्या अर्थाने लोकांनी, लोकांसाठी बनवलेले, लोकांचे सरकार असल्याचे सिद्ध करत आहे. केरळमधील जो कोणी एखाददुसरा वाट चुकलेला मोदीभक्त ५ तारखेला रात्री ९ वाजता दिवा लावील, तो लगेच विझवून केरळ सरकारने पुरवलेल्या धान्याचा भरपेट आस्वाद घ्यायला बसेल. याचे कारण त्या सरकारने गरिबांच्या पोटातील अंधार नष्ट करण्यासाठी खंबीर पावले उचलली आहेत. कुठल्याही मुहूर्ताची वाट न पाहता केरळ सरकारने कालपासूनच स्वस्त धान्य दुकानांतून सूर्यफुलाचे तेल, खोबऱ्याचे तेल, मीठ, गव्हाचा आटा, रवा, मूग, हरभरा, तूर दाळ, मोहरी, जिरे, धने, उडीद दाळ, तिखट, साखर, चहा आणि साबण आदी सोळासतरा वस्तू द्यायला सुरुवात केली आहे. सर्व पदार्थांचं किट पर्यावरणस्नेही कापडी पिशव्यात दिलं जात आहे. आणि ते कमी किंमतीत दिलं जात नाही, तर मोफत दिलं जात आहे ! अशी ८७ लाख किट केरळ सरकारने वाटण्यास सुरुवात केली आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
कोव्हिडविरोधी युद्धात प्रगती
३ एप्रिलच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी राज्यात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव थोपवण्यात काही यश आल्याचे निदर्शनास आणून दिले. या बाबतीत चांगले सकारात्मक परिणाम दिसत असले, तरी केरळ सरकार आणि जनता बेसावध राहणार नाही, हेही त्यांनी ठामपणे सांगितले.
आजवर ४-५ लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींची कोव्हिड-१९ तपासणी केली जात असे. पण येथून पुढे एखाद दुसरे लक्षण असले तरी तपासणी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. रॅपिड टेस्ट किटनेदेखील तपासणी चालूच राहील. त्या तपासणीत कुणाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी ती व्यक्ती निरीक्षणाखालीच ठेवली जाईल. पुढे लागण दिसू लागल्यास त्याविषयी जागरूक राहून आधीच उपचाराची सोय करण्यात येत आहे.
लॉकडाऊन कालावधी केव्हा ना केव्हा संपुष्टात येईलच. तेव्हा सार्वजनिक जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याच्या शिफारसी करण्यासाठी एक १७ सदस्यांचा टास्कफोर्स मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. त्याचे निमंत्रक ज्येष्ठ निवृत्त अधिकारी आणि भूतपूर्व मुख्य सचिव के. एम. अब्राहम असतील.
पत्रकार परिषदेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विषाणूग्रस्ततेचा अद्ययावत अहवाल सादर केला. कोट्टायममधील अनेक व्याधींनी ग्रस्त झालेले एक वयोवृद्ध जोडपे या कोरोनावर यशस्वी मात करून बरे झाले, ही “आपल्या आरोग्यव्यवस्थेला मिळालेली पावती” असल्याचे सांगत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्यसेवकांना त्यांनी धन्यवाद दिले.
राज्यात १,६९,९९७ लोक निरीक्षणाखाली असून त्यापैकी १,६९,२९१ स्वतःच्या घरी असून ७०६ इस्पितळात आहेत. काल एका दिवसात राज्यभरात १५४ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले. तपासण्यास पाठवलेल्या ९,१३९ नमुन्यांपैकी ८,१२६ निगेटिव्ह आले आहेत.
लागण झालेल्या २९१ रुग्णांपैकी २०६ परदेशांतून आलेले असून ७ परदेशी प्रवासी आहेत आणि ७८ जणांना थेट संपर्कातून लागण झाली आहे. निजामुद्दिनला झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमातून परतलेले तिघे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या विविध आर्थिक मदतीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी जोमाने सुरू करण्यात आली आहे. मोदी सरकार दिवे पाजळत सुटले आहे आणि त्या दिव्याखालचा अंधार वारायचे काम डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार करत आहे.

No comments:

Post a Comment