Wednesday 26 August 2020

३६ - भारतीयत्व आणि भाषिकत्व

 

जीवनमार्ग बुलेटिन : ३६
बुधवार, ६ मे २०२०
चिंतनिका - ४

भारतीयत्व आणि भाषिकत्व

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एक प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्यच होते: मराठी राज्याबद्दल एवढे आग्रही आहात, मग तुमच्या भारतीयत्वापेक्षा मराठी असणे मोठे आणि जास्त महत्त्वाचे आहे काय ? आणि जर असेच होणार असेल, तर भारत देशाचे काय होईल ? त्याच न्यायाने प्रत्येक भाषिक राज्याबाबत हाच प्रश्न उपस्थित होत होता.
भारतीयत्व आणि भाषिकत्व परस्पर निरपेक्ष नाहीत!
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याचे पूर्ण भान होते. म्हणूनच उत्तर अगदी स्पष्ट होते. महाराष्ट्रातील जनतेचे भारतीयत्व आणि मराठीपण हे दोन्ही परस्पर निरपेक्ष नाहीत. परस्पर विरोधी नाहीत. परस्परांना पर्यायीदेखील नाहीत, तर पूरक आहेत. म्हणजेच माझे भारतीयत्व हे मराठी असण्यातून साकार होते. आणि उलटपक्षी मी भारतीय असल्याशिवाय मला माझे मराठीपणदेखील खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही. दोन्ही संकल्पनाची काही स्वतंत्र ओळख आहे. ते एकच नाहीत, पण परस्परांशिवाय राहू शकत नाहीत. जसे फूल आणि फुलाच्या पाकळ्या. मूठ आणि हाताची बोटे. तसे भारतीयत्व आणि भारतातील विविध भाषिक संस्कृती. यालाच भारतीय न्यायशास्त्रात अयुतसिद्ध संबंध किंवा समवाय संबंध असे म्हणलेले आहे.
ही बाब प्रत्यक्ष भारतीय इतिहासात कशी आणि केंव्हा दिसून आली, ते आता पाहू. आपण पाहिले की ब्रिटीश येण्यापूर्वी लोकांच्या प्रादेशिक -भाषिक संस्कृती विविध असल्या तरी, जनता ही कोणत्या तरी राजाच्या अंमलाखाली म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची अंकित होती. विविध सत्तांच्या अंमलाखाली विभागलेली होती. त्यांना आपल्या अखिल भारतीय असण्याची जाणीव होण्याचे अवसरच कमी होते. जुलमी राज्यांच्या-धर्मसत्तांच्या विरोधात जसजशी लढण्याची संधी मिळत गेली, तसतसे त्यांना भाषिक सांस्कृतिक एकत्वाचे दर्शन होत गेले. जसा महाराष्ट्रातील वारकरी भक्ती संप्रदाय. आपली वेदना आणि भवितव्य एक असल्याची नवी जाणीव झाली. आपल्या राजकीय शक्तीचा प्रत्यय आला.जसे छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंग, संत बसवेश्वर यांच्यामधून आपल्याला या जाणीवेची बीजे पाहण्यास मिळतात. एखाद्या राजाच्या किंवा धार्मिक नेत्याच्या नावाने का असेना, पण स्वतःची नवी सामुदायिक प्रादेशिक भाषिक अस्मिता तयार झाली. तीच प्राथमिक राष्ट्रीय जाणीव. त्याचे स्वरूप प्रादेशिक-भाषिक सांस्कृतिक होते. भक्ती संप्रदाय,नवे धार्मिक संप्रदाय, प्राकृत भाषेतील वाङ्मय- काव्यरचना–लिपीचा विकास यातून प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत ते व्यक्त होत गेले. जातिव्यवस्थेला आणि धर्मसत्तेला आव्हान देण्यासाठी लागणारी प्रगत आणि स्वतंत्र असा वर्ग युरोपप्रमाणे निर्माण झालेला नव्हता. छापण्याची कला नव्हती. दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित होती. त्यामुळे तिला फार मोठ्या मर्यादा होत्या. त्यामुळे या प्राथमिक राष्ट्रीय जाणीवांच्या आधारावर ब्रिटीश सत्तेशी मुकाबला करण्याइतकी एकजूट जनतेमध्ये निर्माण होऊ शकली नाही.
प्रादेशिक भाषिक अस्मिता आणि राष्ट्रीय जाणीव
ब्रिटीशांमुळे एक संपूर्णतः नव्या स्परूपाची अखिल भारतीय सत्ता प्रस्थापित झाली. तिचे उद्देश आर्थिक-व्यापारी होते. भाषा, राज्यपद्धती, कायदे, न्याय, शिक्षणपद्धती, समाजरचना, उत्पादन, तंत्रज्ञान सर्वच काही वेगळे होते. ते आपल्या वनांचे, निसर्गाचे तसेच समाजाचे आर्थिक शोषण करत असल्याचे दिसत होते. पण तरीही परंपरागत सरंजामी राजेशाहीच्या, जन्मजात विषमतेवर आधारित व्यवस्थेच्या तुलनेत ब्रिटीश अधिक प्रगत असल्याचे लोक अनुभवत होते.
ब्रिटीश सत्ता येईपर्यंत देशात सामुदायिक जनशिक्षणाची आणि पुस्तके छापण्याची पद्धती जवळ जवळ अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मौखिक परंपरेने, धर्म परंपरेने किंवा काही प्रमाणात हस्तलिखितांमधून जे काही वाङ्मय, काव्य, नाट्ये इत्यादी लोकांमध्ये पसरेल तेवढेच प्रचलित असे. तसेच शूद्रांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. १२ मैलांवर भाषा बदलत होती. एकाच भाषेच्या कित्येक बोली असल्याने, भाषिक समुदायाची व्यापक जाणीव निर्माण होण्यावर फारच मोठ्या मर्यादा होत्या. छापील पुस्तकांचा प्रसार आणि व्यापक प्रमाणात शिक्षणाचा प्रसार होऊ लागल्यानंतर विविध भाषांत वाङ्मयप्रसार झाला. नव्या जगाची ओळख झाली. स्वभाषेतून शिक्षण देणाऱ्या हजारो संस्था निघाल्या. स्थानिक भाषेत शेकडो वृत्तपत्रे, पुस्तके निघू लागली. साहित्य संमेलने सुरू झाली. ह्या सर्वातून एक नवा समाज आणि सामाजिक जाणीव घडत होती. तिचे सहज विश्व अर्थात् भाषिक-प्रादेशिक असणार हे अत्यंत स्वाभाविक होते.
त्यातून त्या त्या भाषिक समुदायांना स्वतःच्या सांस्कृतिक वारशाचा, परिचय झाला. धर्म, जात पंथ यांच्या पलिकडे जाणारी सर्व स्वभाषिकांना एकत्वात पाहणारी एक स्वाभाविक अस्मिता आणि उस्फूर्त क्रियाशीलता आली. नव्या उर्मी क्रियाशील झाल्या.
प्रादेशिक संस्कृतीच्या आधारे भारतीयत्वाची जाणीव
या सर्वच प्रादेशिक-भाषिक संस्कृतींचे हे आविष्कार विविध असले तरी, सर्वच भारतीय संस्कृतींमधून काही समान सूत्रे पाझरत आहेत, याचीदेखील जाणीव त्या मागोमाग येत गेली. मग त्या भारतीय भाषा असतील, संगीत असेल, तत्त्वज्ञान असेल, भक्ति वाङ्मय असेल, संप्रदाय असतील, अन्न संस्कृती असेल, बरी वाईट कौटुंबिक मूल्ये, रूढी परंपरादेखील असतील.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील संत परंपरा ही मराठी असली, तरी गुरू नानक यांनी स्थापन केलेल्या शीख धर्माच्या गुरू ग्रंथ साहिबमध्ये महाराष्ट्राचे संत नामदेव, वाराणसीचे कबीर, रविदास यांच्यापासून ते पंजाबी मुस्लीम संत फरीद पर्यंत सर्वांचे अभंग समाविष्ट होऊ शकतात.
ज्या प्रदेशात ही प्रक्रिया अधिक सखोल आणि व्यापक प्रमाणात घडली, तेथेच राष्ट्रीय चळवळी मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या. उदाहरणार्थ, बंगाली भाषिकांमध्येच प्रथम सामाजिक सुधारणेची आणि नंतर स्वातंत्र्य चळवळ आणि डाव्या विचाराची चळवळ सुरू झाली. त्यामध्ये शोनार बांग्लाची भूमिका मोठी आहे. वंदे मातरम् हे बंगालमधील दुर्गा मातेला राष्ट्रीय रूपात पाहणारे बंगाली गीत प्रथम बंगालच्या चळवळीचे गीत बनले. नंतर ते स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणा गीत झाले. तीच बाब कमी जास्त प्रमाणात मराठीची, महाराष्ट्राची आहे. महात्मा फुले यांनी शूद्रांच्या चळवळीसाठी, तर टिळकांनी स्वराज्य चळवळीची प्रेरणा म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रतिमा घेतली. त्यांचाच इतिहास सांगितला.हा केवळ योगायोग नाही. भारतीय राष्ट्रीय जाणीव ही या भाषिक-प्रादेशिक इतिहासाच्या जाणीवेच्या आधारावरच विकसित झालेली आहे. हेच यातून दिसून येते.
स्वातंत्र्य आंदोलनात भाषिक मुद्यांचे महत्त्व
हा झाला भावनिक प्रेरणेचा मुद्दा. पण खरे तर स्वातंत्र्यांच्या चळवळीला जनचळवळीचे स्वरूप येण्यासाठी भाषा आणि प्रदेश यांच्याशी निगडित राजकीय मुद्दे किती महत्त्वाचे होते, हे खालील ऐतिहासिक घटनांवरून दिसून येईल. पण भाषिक-प्रादेशिक-मुद्दे दुर्लक्षित करून किंवा चक्क नाकारूनच सर्वसाधारणपणे स्वातंत्र्य चळवळीची मांडणी होते, ती चूक आहे. हे प्रथम लक्षात घेतले गेले पाहिजे.
१८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. ब्रिटिशांच्या मर्जीत राहून अर्ज विनंत्या करणारी उच्चभ्रू प्रतिष्ठित मंडळीची सभा असेच तिचे स्वरूप होते.पण तिला जनचळवळीचे रौद्र स्वरूप केंव्हा आले? त्यामध्ये भाषिक प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आल्यानंतरच. कर्झन १७ जानेवारी १९०४ रोजी एका पत्रामध्ये म्हणाला होता,
"The bengalees consider themselves a separate nation and indulge in driving away the British, and putting a Bengalee Babu in the government house as governor-general. The partition of Bengal would undermine their sense of superiority and destroy their dreams and that is why they are agitating against it.” (Nitish Sengupta: Land of Two Rivers: A History of Bengal from Mahabharata to Mujib)
म्हणूनच १९०५ मध्ये जेंव्हा त्यावेळच्या व्हाईस रॉय कर्झनने बंगाली जनतेमध्ये हिंदू मुस्लीम फूट पाडण्यासाठी बंगाल प्रांताची फाळणी केली. पूर्वेकडील मुस्लीम बहुल प्रदेश वेगळा काढला. आणि पश्चिमेकडील हिंदूबहुल भागात बंगाली भाषिकांची बहुसंख्या होणार नाही, याची काळजी घेऊन प्रांताची फेर आखणी केली. पूर्वेकडील काही जमीनदार वर्ग सोडता, त्यामुळे संपूर्ण बंगाल पेटून उठला. हजारो लोक संतापाने रस्त्यांवर उतरले. धर्मापेक्षा भाषिक-प्रादेशिक मुद्दा जास्त महत्त्वाचा असल्याचे सिद्ध झाले. वंगभंग नावाने ही कृती ओळखली गेली. त्याच्या विरोधात देशात देखील संतप्त प्रतिक्रिया उमटली. अखेर कर्झनची लंडनमध्ये १९०९ मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी हत्या केली. आणि १९११ मध्ये ब्रिटीश सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला.
इतिहासाच्या पुनरावृत्तीचे उत्तम उदाहरण १९७१ मध्ये दिसले. मुस्लीम लीगने आपले धर्मांध फूटपाटे धोरण रेटून १९४७ मध्ये भारताची फाळणी घडवून आणली. त्याला यासर्व संघप्रणित द्विराष्ट्रवादाच्या सिध्दांताचे पाठबळ लाभले होते. भारताच्या फाळणीनंतर एका पाकिस्तानचे मुस्लीम बहुसंख्या असणारे दोन प्रदेश पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणून अस्तित्वात आले. धर्माच्या नावाखाली केलेल्या या फुटीवर अवघ्या २५ वर्षांत भाषिक-प्रादेशिक आधारावरील राष्ट्रवादाने मात केली. बंगाली भाषिक पूर्व पाकिस्तान सशस्त्र मुक्तिसंघर्ष करून बांग्लादेश म्हणून नकाशावर झळकू लागला. असो.
स्वातंत्र्य आंदोलनाच्या चतुःसूत्रीपैकी स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण या दोन्हीमध्ये प्रादेशिक भाषा आणि संस्कृती यांना अनन्य साधारण महत्त्व होते.ब्रिटीशांनी केलेली प्रांतरचना मनमानी पद्धतीने केलेली होती, हे आपण मागील लेखात पाहिले. ४ भाषा असणारे एक एक प्रांत होते. त्या ऐवजी भाषावार प्रांतरचना असावी ही मागणी १८९१ पासूनच होत होती. त्यात मुख्यतः ओरिसा, आंध्र यांचा समावेश होता. मद्रास प्रांतामध्ये त्यावेळी तेलुगु, तामीळ, मल्याळी, कानडी असे विविध प्रदेश येत होते. त्यातून तेलुगु भाषिक प्रदेश वेगळा काढून आंध्र प्रदेश निर्माण करण्याची मागणी करणारा ठराव १९१७ मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात मंजूर करण्यात आला.
१९१८ मध्ये जेंव्हा ब्रिटीशांनी माँटेग्यू सुधारणा जाहीर करून कौन्सिलसाठी निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले, त्यावेळी टिळकांनी डेमोक्रेटिक काँग्रेस पार्टीची स्थापना करून त्याच्या जाहीरनाम्यात, भाषावार प्रांतरचना करण्याचे वचन दिले.
गांधीजींनी केलेल्या घोषणेनुसार १९२१ नंतर असहकार आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसने जनतेला आंदोलनात उतरविण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर हा सहभाग वाढत गेला. पण त्यासाठी काँग्रेसने आपल्या संघटनेच्या रचनेत आमूलाग्र बदल केला. १९२१ पासून भाषावार प्रदेशानुसार काँग्रेसच्या समित्या संघटित केल्या. काँग्रेसचा कारभार आणि यंत्रणा भाषा-प्रदेश यांच्यानुसार निर्णय घेऊन चळवळ करू लागली. भाषावार प्रांतरचना करण्याचा विचार त्यातूनच निश्चितपणे व्यक्त झाला.
१९२८ मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताची संभाव्य घटना म्हणून सर्वपक्षीय दस्तऐवज तयार करण्यात आला, त्यामध्ये भाषावार प्रांतरचना हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. त्या नंतर १९३७ मध्ये तसेच १९४६ मध्ये देखील काँग्रेसने निवडणुकांमध्ये सरळ सरळ भाषावार प्रांतरचनेचा स्वीकार केलेला होता.
थोडक्यात, भारतीयत्व आणि भाषिकत्व या पूरक घटकांकडे दुर्लक्ष करणे हेच खरे तर राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे, याची जाणीव संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होती. त्यामुळेच इतक्या आग्रही पद्धतीने ही चळवळ लढविण्यात आली.
शिवाय भारत हा प्रचंड आकाराचा व्यापक भाषिक-भौगोलिक-सांस्कृतिक विविधता असणारा देश आहे. अशा देशात दिल्लीसारख्या एका केंद्रामध्ये राहून संपूर्ण देशाचे प्रशासन चालविण्याची कल्पनाच अत्यंत अव्यवहार्य आहे. जनतेची दुःखे, आकांक्षा, मागण्या यांना प्रतिसाद देण्यासाठी पुरेसे अधिकार असणारी शासनसंस्था दिल्लीत नव्हे तर, त्या त्या राज्यातच असणे आवश्यक आहे. हा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या केंद्र स्थानी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील लोकशाहीच्या दृष्टीने या विषयाबाबत आपले विचार मांडले होते.
डॉ. आंबेडकरांकडून एक राज्य - एक भाषा तत्त्वाचा पुरस्कार
फाळणीच्या भळभळत्या जखमांमुळे १९४६ ते १९४९ मध्ये भारताची घटना तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना भाषावार प्रांतररचनेचा मुद्दा पुढे ढकलण्याचे धोरण अवलंबिण्यात आले. १९५५ पर्यंत भाषावार प्रांतरचना झालेली नव्हती. त्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती आयोगाने आपला अहवाल डिसेंबर १९५५ मध्ये दिला. त्या आधी आणि त्यानंतर देशात त्या विषयावर आंदोलने झाली. राष्ट्रीय पातळीवर त्याची सखोल चर्चा झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांतरचना या विषयावरील ३ पुस्तकांमधून आपली या विषयावरील अत्यंत अभ्यासपूर्ण मते मांडली आणि एक राज्य एक भाषा या प्रांतरचनेच्या तत्त्वाला पूर्ण समर्थन दिले. त्यांनी असे स्पष्ट केले की, शासन आणि लोकशाही ही सामाजिक सहभावनेशिवाय राबविणे शक्य नाही. ..... भाषेभोवती संस्कृती बांधली जाते... भाषा लोकांमध्ये एकजूट निर्माण करते.....जर भिन्न भाषिकांना एकाच राज्यात नांदण्यास सांगितले तर त्यांच्यात नेतृत्वासाठी विसंवाद आणि प्रशासनात भेदभाव निर्माण होतात, इत्यादी. मात्र, त्यांच्या मते एका भाषेचे एकच राज्य असावे या तत्त्वाऐवेजी एकाच भाषिकांची प्रशासन आणि अर्थव्यवस्था यांचा विचार करून अनेक राज्ये असणे योग्य ठरेल. उत्तर प्रदेश, बिहार, तसेच मध्य प्रदेश या अतिविशाल राज्यांचे प्रत्येकी अनेक राज्यात विभाजन कसे करावे याची तपशीलवार योजनादेखील मांडली. परंतु भाषावार प्रांतरचना केल्यानंतर गेल्या ६० वर्षांत खरोखर केंद्र आणि राज्ये यांच्या अधिकारांचा वापर लोकशाही तत्त्वास अनुकूल झाला काय, हा प्रश्न केंद्र आणि राज्य यांच्या संबंधांबाबत गेल्या ५० वर्षांत काय घडले आणि आणि आज काय घडविले जाते आहे, त्याची या अंगांनी चर्चा येत्या लेखांकात करू.
__________________________________________________________________________________________________________
अजित अभ्यंकर

३५ - २०२वी कार्ल मार्क्स जयंती - अत्यंत प्रतिभाशाली आणि द्रष्टा क्रांतिकारक

 


जीवनमार्ग बुलेटिन : ३५
मंगळवार, ५ मे २०२०

२०२वी कार्ल मार्क्स जयंती
अत्यंत प्रतिभाशाली आणि द्रष्टा क्रांतिकारक

आज ५ मे - कार्ल मार्क्सच्या जन्माला २०२ वर्षे झाली. आजच्या कोरोनाच्या विध्वंसक काळात ह्या प्रतिभाशाली द्रष्ट्या क्रांतिकारकाने लावरोव्ह नावाच्या मित्राला लिहिलेल्या पत्रातील एका उताऱ्यापासून सुरुवात करू या. मार्क्स लिहितो,
मानव आणि निसर्ग
"मानवाच्या निसर्गावरील विजयांमुळे आपण फार शेफारून जाता कामा नये. कारण असा प्रत्येक विजय आपल्यावर सूड उगवत असतो. हे खरे आहे की, असा प्रत्येक विजय आपल्याला अपेक्षित असलेले निकाल सुरुवातीला देतो. पण नंतर त्याचे वेगळेच अनपेक्षित परिणाम होतात, जे सुरुवातीच्या परिणामांना रद्द करून टाकतात...
"प्रत्येक पावलावर आपल्याला आठवण करून देण्यात येते की, एखादा जेता विदेशी लोकांवर जसे राज्य करतो, तसे आपण निसर्गावर अजिबात राज्य करू शकत नाही. किंबहुना आपण रक्तामांसाने व मेंदूने त्या निसर्गाचाच भाग असतो आणि त्या निसर्गातच राहात असतो. निसर्गावर आपण जे वर्चस्व मिळवतो ते केवळ यामुळेच की, निसर्गाचे नियम शिकण्याची आणि त्यांना योग्यरीत्या लागू करण्याची आपली क्षमता इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते."
किती गहन आणि सखोल विचार आहे हा! कोरोना महामारी, जागतिक तपमानवाढीचा गंभीर प्रश्न, त्यामुळे येणारे महापूर आणि महादुष्काळ अशा कितीतरी नैसर्गिक आपत्तींना तो लागू होतो. मानवाने जर निसर्गाचे नियम नीट शिकले नाहीत, ते योग्यरीत्या लागू केले नाहीत, तर त्यातून काय धोके संभवतात याचा इशारा वरील उताऱ्यात मार्क्सने दीड शतकापूर्वी देऊन ठेवला आहे.
मार्क्स आयुष्यभर ज्या भांडवलशाहीशी प्राणपणाने लढला, तीच भांडवलशाही आज शेफारून जाऊन आपल्या नफ्याच्या हव्यासापोटी निसर्गाचा नाश करण्यास निघाली आहे. आणि त्याचे परिणाम आता सारे जग भोगते आहे.
भांडवलशाही, समाजवाद आणि कोरोना
'हिंदुस्थान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्रात जगात सर्वाधिक कोरोना केसेस आणि त्यामुळे झालेले मृत्यू यांची पहिल्या १० देशांची अधिकृत यादी दररोज येत असते. काल ४ मे रोजी रात्री ९ वाजता प्रसारित केलेली ही यादी पुढीलप्रमाणे:
क्र. देश कोरोना केसेस / कोरोना मृत्यू
१. अमेरिका ११,९२,३१४ / ६८,७१५
२. स्पेन २,४८,३०१ / २५,४२८
३. इटली २,१०,७१७ / २८,८८४
४. ब्रिटन १,८६,५९९ / २८,४४६
५. फ्रान्स १,६८,६९३ / २४,८९५
६. जर्मनी १,६५,७४५ / ६,८६६
७. रशिया १,४५,२६८ / १,३५६
८. टर्की १,२६,०४५ / ३,३९७
९. ब्राझिल १,०१,८२६ / ७,०५१
१०. इराण ९८,६४७ / ६,२७७
याचा अर्थ की, जगातील सुमारे ३६ लाखांपैकी तब्बल २२ लाख कोरोना केसेस (६१ टक्के), आणि २.५ लाखांपैकी तब्बल १.८ लाख मृत्यू (७२ टक्के) फक्त अमेरिका, स्पेन, इटली, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या ६ अतिप्रगत भांडवलदारी-साम्राज्यवादी देशांत झाले आहेत. उर्वरित ४ देश - रशिया, टर्की, ब्राझिल आणि इराण हेही भांडवलदारी देशच आहेत.
कोरोनाचा सर्वात भयानक फटका बसलेल्या अमेरिका या देशाचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने, या रोगाचा सामना करण्यातील आपली स्वतःची नालायकी झाकण्यासाठी रोजच्या पत्रकार परिषदेत समाजवादी चीनला या ना त्या कारणाने शिव्याशापांची लाखोली वाहण्याचाच ठेका घेतला आहे.
वास्तविक पाहता या सर्व प्रगत पाश्चिमात्य भांडवलदारी देशांतील आरोग्यसेवा अत्यंत आधुनिक आहेत यात शंका नाही. मग हे चित्र तेथे का निर्माण झाले? एक तर अमेरिकेसकट या देशांच्या राज्यकर्त्यांनी कोरोनाचे संकट सुरुवातीपासून हव्या त्या गांभीर्याने घेतलेच नाही. केसेस मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या तेव्हाच हे सर्व खडबडून जागे झाले.
दुसरे म्हणजे अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू पावलेले बहुसंख्य लोक गरीब आणि कृष्णवर्णीय आहेत असे वृत्त आले आहे. युरोपच्या अन्य देशांतही आणि खरेतर जगभरच तशीच परिस्थिती आहे. श्रीमंतांनी विमानांतून आणलेला हा रोग गरिबांचा सर्वाधिक सत्यानाश करत आहे.
या सर्व देशांत नवउदारवादी म्हणजेच अतिभांडवलदारी धोरणांमुळे तेथील आरोग्य सेवांचे प्रचंड खाजगीकरण करण्यात आले आहे. बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांनी तेथील इस्पितळे आणि औषधी उत्पादन क्षेत्रांचा फार पूर्वीच ताबा घेतला आहे. नफा कमावणे (Profits over People) हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. गरीब कामगार-किसानच काय, तर मध्यमवर्गीयांनाही हे सर्व अजिबात परवडण्यासारखे नाही. आणि म्हणूनच मरण पावणारे बहुसंख्य लोक सामान्य व गरीब आहेत.
याउलट समाजवादी देशांची कोरोनाबाबतची कामगिरी पहा. चीनला या रोगाचा पहिला फटका डिसेंबर २०१९ मध्ये बसला, पण आटोकाट प्रयत्न करून त्याने तो आटोक्यात आणला. व्हिएतनाम आणि कोरिया चीनच्या लगत असतानाही त्यांनी तो काबूत ठेवला आणि व्हिएतनाममध्ये तर कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. क्युबानेही त्याला लगेच लगाम घातला. आज हे चारही समाजवादी देश आपले डॉक्टर्स अथवा वैद्यकीय साहित्य जगातील इतर अनेक देशांना कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुरवत आहेत.
भारतात सुद्धा भाजपचे केंद्र सरकार कोरोनाचा कसा सामना करत आहे (पुढे पाहू) आणि त्याउलट केरळसारख्या मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखालील राज्याने त्यात कशी नेत्रदीपक प्रगती केली आहे याची गौरवास्पद दखल केवळ आपल्या देशातच नव्हे, तर जगभर घेतली गेली आहे.
कोरोना संकटाच्या निमित्ताने भांडवलदारी आणि समाजवादी देशांमधील आमूलाग्र फरक जगासमोर सुर्यप्रकाशाइतका स्पष्ट झाला आहे.
मार्क्सचे भांडवलशाहीचे विश्लेषण
ह्या व अशा अनेक घटना नीट समजून घेण्यासाठी मार्क्सवादच अपरिहार्य ठरतो. मार्क्सवादी तत्त्वज्ञानात गत्यात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी अर्थशास्त्रात भांडवलशाहीचे गतिनियम आणि मार्क्सवादी राजकारणात वर्गसंघर्ष, शासनसंस्था, क्रांती व समाजवाद यांचा समावेश होतो.
प्रचलित भांडवलशाहीचे सखोल विश्लेषण कार्ल मार्क्सने 'भांडवल (कॅपिटल)' या १८६७ साली प्रकाशित झालेल्या त्याच्या जगप्रसिद्ध ग्रंथात केले. त्यानंतरच्या काळात भांडवलशाहीत अर्थातच प्रचंड बदल झाले. लेनिनने मार्क्सवादी दृष्टिकोनातून तत्कालीन साम्राज्यवादाचे अचूक विश्लेषण केले. इतरांनी पुढे त्यात भर घातली. पण मार्क्सचे भांडवलशाहीचे मूळ विश्लेषण आजही तंतोतंत लागू आहे आणि आजवर अनेक भांडवली विचारवंतांनी सातत्याने प्रयत्न करून सुध्दा ते कोणीच खोडून काढू शकलेले नाही. त्या सर्व तपशिलात येथे जाण्याचे प्रयोजन नाही. पण सूत्ररूपाने मार्क्सने काय मांडले आणि त्यानुसार आजची परिस्थिती काय आहे, हे थोडक्यात पाहू.
१. अधिकाधिक नफा कमावणे हे भांडवलशाहीचे उद्दिष्ट असते. त्या क्रमात भांडवलाचे केंद्रीकरण होत राहते, बडे भांडवलदार छोट्या भांडवलदारांना गिळंकृत करतात आणि मक्तेदार कॉर्पोरेट्स तयार होतात. वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि फॅसिझम हे भांडवलशाहीचेच विविध आविष्कार आहेत. गेल्या काही दशकांपासून भांडवलशाहीचे रूपांतर अजस्त्र आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलात आणि त्याने लादलेल्या नवउदारवादी धोरणांत (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) झाले आहे. पण हे सर्व असले तरी नफ्याचा मूळ उद्देश मात्र कायम आहे.
२. हा नफा उत्पादन प्रक्रियेत वरकड मूल्य या रूपाने तयार होतो. हा आहे मार्क्सचा जगप्रसिद्ध 'वरकड मूल्याचा (सरप्लस व्हॅल्यू) सिद्धांत'. उत्पादन प्रक्रियेतून वरकड मूल्य उकळणे म्हणजेच कामगारवर्गाचे शोषण करणे, हे मार्क्सने प्रथमच सिद्ध करून दाखवले.
३. हा नफा वाढविण्यासाठी एकीकडे कामाचे तास वाढवून, पगार कमी ठेवून अथवा कामगार कपात करून कामगारांचे शोषण केले जाते, तर दुसरीकडे प्रगत तंत्रज्ञानातून नवीन यंत्रे इ. द्वारे उत्पादन प्रक्रियेत सुधारणा केल्या जातात.
४. कामगारांचे पगार कमी ठेवण्यासाठी समाजात 'बेरोजगारांची राखीव फौज' असावीच लागते. म्हणून भांडवलशाही आणि बेरोजगारी यांचे अतूट नाते असते.
५. भांडवलशाहीच्या विकासातून अपरिहार्यपणे एका ध्रुवाकडे मूठभर शोषणकर्त्यांची अमाप संपत्ती आणि समृद्धी, तर दुसऱ्या ध्रुवाकडे बहुसंख्य श्रमिक-शोषित जनतेचे अफाट दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, रोगराई केंद्रित होते. ही अतीव विषमता प्रत्येक भांडवली देशात तर तयार होतेच, पण त्याचबरोबर जगात सुद्धा एकीकडे मूठभर गर्भश्रीमंत साम्राज्यवादी विकसित शोषक देश तर दुसरीकडे आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका खंडांतील बहुसंख्य गरीब विकसनशील शोषित देश अशी विषमता निर्माण होते.
६. सामाजिक उत्पादन (कामगारांकडून) आणि व्यक्तिगत नफा (मालकाचा) हा भांडवलशाहीतील मुख्य अंतर्विरोध असतो आणि तो सातत्याने वाढत जातो.
७. तिच्यातील अशा अनेक अंतर्विरोधांमुळे भांडवलशाहीत वेळोवेळी अरिष्टे येतात (उदाहरणार्थ १९२९ची महामंदी, १९७३चे अरिष्ट, २००८चे महाअरिष्ट आणि आता कोरोनामुळे जास्तच गडद होणारे अभूतपूर्व आर्थिक संकट).
८. आपल्या आक्रमक वृत्तीमुळे आणि युद्धातूनही नफा कमावण्याच्या हव्यासातून भांडवलशाही युद्धाशिवाय जगूच शकत नाही (उदाहरणार्थ पहिले व दुसरे भीषण महायुद्ध, त्यानंतर कोरिया, व्हिएतनाम, युगोस्लाव्हिया, अफगाणिस्तान, इराक, इराण, पॅलेस्टाईन, लिबिया, सीरिया अशा अनेक देशांत अमेरिका व त्याच्या दोस्त राष्ट्रांनी लादलेली युद्धे).
९. भांडवलशाहीला पर्याय समाजवादच असू शकतो आणि तो कामगार-शेतकरी वर्गांच्या एकजुटीतून भांडवलशाही आणि सरंजामशाही (भारतात वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, महिलांवरील जुलूम यांच्यासह) यांचे उच्चाटन करूनच प्रस्थापित होऊ शकतो (उदाहरणार्थ रशिया, चीन, व्हिएतनाम, कोरिया, क्युबा येथील समाजवादी क्रांत्या). पण प्रत्येक देशात तेथील ठोस परिस्थितीनुसारच क्रांतिकारी परिवर्तन होत असते.
भारतीय असंतोषाचे आधुनिक जनक बनू या!
मार्क्सवादी दृष्टिकोनातून पाहिले तर आज भारताचे चित्र कसे दिसते? कोरोनापासूनच सुरुवात करू.
कोरोनाचा प्रश्न हाताळताना जी असंवेदनशील हृदयशून्यता प्रत्येक बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजप-आरएसएसच्या केंद्र सरकारने दाखवली तशी यापूर्वीच्या कोणत्याही केंद्र सरकारने दाखवलेली नव्हती. हा केवळ काही व्यक्ती अथवा एखाद्या पक्षाचा प्रश्न नाही, हा त्या सर्वांच्या मूळ वर्गीय दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.
३० जानेवारीला कोरोनाची पहिली केस केरळमध्ये सापडली. पण त्यानंतर दीड महिना मोदी सरकार काय करण्यात मग्न होते? तर अमेरिकन 'सम्राट' ट्रम्प यांचे लांगूलचालन करण्यात! ते भारतात असतानाच दिल्लीत भीषण धर्मांध दंगली पेटवण्यात! आणि लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून मध्य प्रदेशचे राज्य सरकार पाडण्यात!
२५ मार्चला शेवटी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून एकीकडे ४० हून अधिक दिवस देशभरातील कोट्यवधी स्थलांतरित मजुरांना अन्न व पैशाशिवाय तडफडत ठेवले. विदेशात गेलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाची स्पेशल विमाने पाठवून त्यांना फुकट भारतात आणले, पण या कोट्यवधी गरीब मजुरांकडून ट्रेन व बसचे भरमसाठ भाडे उकळले. भयंकर परिस्थितीत असणाऱ्या कोट्यवधी शेतकरी-शेतमजुरांना, असंघटित व कंत्राटी कामगारांना आणि महिलांना कोणताही भरीव आर्थिक दिलासा देण्यास साफ नकार दिला. कोरोनाविरुद्धची लढाई हिमतीने लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना साधे संरक्षक किट्स न दिल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. आणि या सर्वांसाठी केले काय? तर टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा आणि कोट्यवधी रुपये खर्चून विमानांतून पुष्पवृष्टी करा!
तर दुसरीकडे या सरकारने पीएम केअर्स या वेगळ्या, पूर्णतः अपारदर्शक निधीत कोट्यवधी रुपये जमा केले. नुकतेच नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या या देशाला फसवणाऱ्यांनी आणि बाबा रामदेव सारख्या उपटसुंभांनी ६८,००० कोटी रुपयांचे बुडवलेले बँकांचे कर्ज त्यांना माफ केले. आणि पंतप्रधानांसाठी नवीन महाल, नवीन संसद भवन अशा दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा योजनेसाठी २०,००० कोटी रुपये पाण्यात टाकण्याचा निर्णय पुढे रेटला. या सर्वातून या सरकारचे उफराटे आणि चीड आणणारे अग्रक्रम स्पष्ट होतात.
कोरोनानंतर प्रचंड आर्थिक अरिष्टाला आपल्या देशाला सामोरे जावे लागणार आहे. खरं तर, कोरोना संकट सुरू होण्यापूर्वीच मोदी सरकारच्या धोरणांमुळे हे अरिष्ट सुरू झाले होते. ते आता जास्त उग्र होणार आहे. पण पूर्वानुभव लक्षात घेता हे सरकार त्यातून सुध्दा अंबानी-अदानी सारख्या त्याच्या निवडणूक निधीस अफाट मदत करणाऱ्या वशिलेबाज भांडवलदारांनाच वाचविण्याचा प्रयत्न चालू ठेवणार आहे, श्रमिक-शोषित-दलित-वंचित-पीडितांना वाचविणे तर फार दूर राहिले.
हे सर्व करत असताना या भाजप-आरएसएस सरकारची धर्मांध, जातपातवादी, हुकूमशाही व फॅसिस्ट कारस्थाने सुरूच राहणार आहेत याची तयारी सुद्धा आपण ठेवलीच पाहिजे. भीमा कोरेगाव येथील दलितांवरील हल्ल्यांस जबाबदार असलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना मोकाट सोडणे आणि उलट आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा आणि सुधा भारद्वाज सारख्यांना तुरुंगात टाकणे, जामिया मिलिया विद्यापीठात अमित शहांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पाशवी हल्ला करणे पण त्यांना मोकळे सोडून सफुरा झरगर या तीन महिने गरोदर असलेल्या निष्पाप मुलीला निर्दयपणे तुरुंगात डांबणे, संजीव भट्ट या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत ठेवणे, अशा असंख्य उदाहरणांवरून या सरकारची खुनशी मनोवृत्ती स्पष्ट होते.
खेदाची बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिचे शिल्पकार होते, त्या भारतीय संविधानाच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचे रक्षण करण्याची ज्या संस्थेची घटनादत्त जबाबदारी आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाने आपली जबाबदारी अनेक बाबतीत पार पाडलेली नाही. रंजन गोगोई या माजी सरन्यायाधीशांनी सरकारच्या बाजूने अनेक वादग्रस्त निर्णय दिल्यानंतर निवृत्त होताच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणे यातच सर्व काही आले. सत्तेपुढे सत्य बोलणारे काही सन्माननीय अपवाद वगळता, भारतातील बहुतांश मीडिया सत्तेसमोर कशी लाचार लोटांगणे घालत आहे हे आपण पहातच आहोत. अर्णब गोस्वामी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
हे सर्व जरी खरे असले तरी मार्क्स, एंगेल्स, लेनिन, स्टॅलिन, माओ, हो ची मिन्ह, फिडेल कॅस्ट्रो, शहीद चे गव्हेरा आणि आपलेच अमर शहीद भगत सिंग व इतर अनेक योद्धे ज्या परिस्थितीविरुद्ध लढले ती यापेक्षाही कितीतरी जास्त खडतर होती. आणि तरीही ते जिंकले आणि अजरामर झाले. "ठोस परिस्थितीचे ठोस विश्लेषण हे मार्क्सवादाचे सार आहे" हे अनमोल मार्गदर्शन लेनिनने आपल्याला दिले होते.
त्यानुसार कार्ल मार्क्स या उत्तुंग क्रांतिकारकाच्या आजच्या जयंतीदिनी भारतीय असंतोषाचे आधुनिक जनक बनण्याची प्रतिज्ञा करू या! इतर सर्व पुरोगामी, जनवादी आणि धर्मनिरपेक्ष शक्ती आणि व्यक्तींना एकजुटीत सोबत घेऊ या! आणि मार्क्सने ज्या उद्दिष्टासाठी स्वतःला चंदनासारखे झिजवले, ते पूर्ण करण्यासाठीच्या लढ्यात स्वतःला झोकून देऊ या!
__________________________________________________________________________________________________________

डॉ. अशोक ढवळे
सदस्य, माकप केंद्रीय कमिटी
अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा

३४ - कोरोनाइतकाच नफेखोरीचा भयाण विषाणू

 

जीवनमार्ग बुलेटिन : ३४

सोमवार, ४ मे २०२०

कोरोनाइतकाच नफेखोरीचा भयाण विषाणू

कोरोनाने निर्माण केलेला हाहाःकार आपण भोगतोच आहोत. विचार करण्याचा मुद्दा आहे की, कोरोनाची भीषण आपत्ती टाळणे निदान तिची तीव्रता कमी करणे, शक्य होते काय ? याबाबत अमेरिकेतील बड्या कंपन्यांच्या भीषण आर्थिक हितसंबंधांची जी माहिती समोर येते आहे, ती अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे. त्याचाच थोडा आढावा आपण घेऊ.
गेल्या 20 वर्षांत विषाणुंच्या अनेक साथी जगाने अनुभवल्या जसे, स्वाईन फ्लू, (H1N1 ), कोरोना विषाणुचाच भिन्न प्रकार असलेला सार्स इत्यादी. अमेरिकेसहित जगातील प्रगत देशांतील सरकारांनी आणि खास करून जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणुंच्या उद्भवाची आणि प्रसाराची गंभीर दखल घेऊन भविष्यातील अशा संभाव्य साथींच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली.
अमेरिकेतील केंद्रीय पातळीवरील सरकारी संस्था सेंटर फॉर डिसीझ कन्ट्रोल (CDC) ने २००८ मध्ये असा निर्णय घेतला की, अशा श्वसनसंस्था निकामी करून टाकणाऱ्या साथीशी तोंड द्यायचे झाले तर मोठ्या प्रमाणात कृत्रिम श्वसनयंत्रांची एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर गरज पडते. त्यांचा मोठा साठा केंद्रीय पातळीवर असणे आपत्ती व्यवस्थापन म्हणून अत्यावश्यक आहे. श्वसनयंत्राचा सामान्य आकार छोटा करून त्याचा उपयोग सोपा करणे तसेच त्याचवेळी त्याची किंमत कमी करून ती कोणत्याही इस्पितळाला परवडणाऱ्या किंमतींच्या आवाक्यात आणणे ही उद्दिष्टे ठरविण्यात आलेली होती. त्यावेळी जगात अशा यंत्रांची बाजारातील किंमत सुमारे १० हजार डॉलर्स इतकी होती. अशी यंत्रे बनविणारी एक छोटी कंपनी अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये होती. तिचे नाव न्यूपोर्ट कंपनी. कंपनी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तज्ञांनी सुरू केलेली तुलनेने लहान आणि होतकरू होती. तिच्याशी चर्चा आणि वाटाघाटी करून या कंपनीशी सरकारने असा करार केला की, सरकारच्या योजनेनुसार लहान आकाराची श्वसनयंत्रे कंपनीने निर्माण केल्यास, अशी ४० हजार यंत्रे ती प्रत्येकी ३ हजार डॉलर्स किंमतीला अमेरिकन केंद्र सरकार विकत घेईल. यात फार नफा नसला तरी जगाची बाजारपेठ आपल्याला खुली होईल. शिवाय सरकारचे पुरवठादार म्हणून कंपनीचा नावलौकिक व प्रतिष्ठा उत्तुंग शिखरावर जाईल, म्हणून न्यूपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापनाने हा करार केला. त्यानुसार काम सुरू झाले. नवीन छोट्या यंत्राचे उभयमान्य असे प्रतिरूप २०११ मध्ये तयार होऊन उत्पादनाचे काम सुरू होण्याच्या अवस्थेपर्यंत पोचले.
पण या निर्णायक अवस्थेला जात असताना त्यातील धोका वैद्यकीय उपकरणांच्या धंद्यात मक्तेदारी आणि बाजार नियंत्रणाच्या माध्यमातून प्रचंड नफेखोरी करणाऱ्या बड्या कंपन्यांच्या लक्षात आला. कारण जर ३ हजार डॉलर्सला श्वसनयंत्र मिळू लागले तर जगात सर्वच देश याच प्रारूपाचा आणि किंमतीचा आग्रह धरतील. परिणामी सोन्याच्या मापात नफा देणारी श्वसनयंत्र नावाची बाजारपेठ ताब्यातून जाईल. कोवेडियन नावाच्या अशाच एका कंपनीने हा धोका ओळखला ; आणि वरील करार करणारी न्यू पोर्ट ही कंपनीचे सर्व शेअर्स अत्यंत चढ्या किंमतीला विकत घेऊन तिला कोवेडियन कंपनीची दुय्यम कंपनी बनविले. (जाता जाता -कोवेडियन आणि कोविड १९ यातील नावाचे साधर्म्य इतके तंतोतंत जुळते.)
नंतर कोवेडियनने सर्वात पहिली गोष्ट केली म्हणजे हा ३ हजार डॉलर्समध्ये छोटे श्वसनयंत्र पुरविण्याचा करार रद्द करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. दोन वर्षे काही कारणे देत काळकाढूपणा केला. अखेरीस २०१४ मध्ये हा करारच रद्द करून टाकला. खरे तर या कराराचे सार्वजनिक महत्त्व लक्षात घेऊन न्यू पोर्ट विकत घेण्याच्या प्रकाराला मुळातच अमेरिकन कायद्यानुसार संबधित व्यापार दक्षता समितीमार्फत आक्षेप घेतला गेला जाऊ शकला असता. पण तसे झाले नाही. हा करार रद्द झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर असाच करार फिलिप्स कंपनीबरोबर करण्यात आला. पण त्यांनी उत्पादन केलेल्या श्वसनयंत्रांचे पहिले जहाज अद्यापर्यंत अमेरिकेच्या किनाऱ्याला लागलेले नाही. कदाचित् संपूर्ण अमेरिकेत मृत्यूचे तांडव पूर्ण झाल्यानंतर ती अमेरिकेत अवतरतील.
हे सर्व घडले अमेरिकन सरकारने यासाठी लक्षावधी डॉलर्सचा जनतेचा निधी खर्च केला असूनदेखील ! आज अमेरिकेत आणि जगात इतके प्रचंड मृत्यू होत आहेत, यापैकी हजारो लोकांचे प्राण जर अशी छोटी श्वसनयंत्रे मोठ्या प्रमाणावर उत्पादित झाली असती, तर वाचविता आले असते. त्यासाठी अमेरिकन सरकारप्रमाणे कोणेत्याही सरकारने त्याची वाजवी नफ्यासहित किंमत दिली असती, यात शंका नाही. पण तसे घडले नाही. जगातील हजारो लोकांचे प्राण जाण्यास ही मक्तेदारी आणि नफ्याची हावच जबाबदार ठरली यात शंकाच नाही.
स्वस्त पर्याय बंद करण्याचे भीषण मार्ग
पण केवळ आपला नफा आणि मक्तेदारी टिकून रहावी यासाठी जनतेच्या प्राणांशी, आरोग्याशी या बड्या कंपन्या किती क्रूर खेळ करू शकतात, याचे कोवेडियन कंपनी हे एकमेव उदाहरण नाही. लंडन स्कूल ऑफ बिझिनेसच्या एका संशोधन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जगात दरवर्षी किमान ४५ असे छोट्या कंपन्या या प्रचंड कार्पोरेट बलाढ्यांकडून विकत घेण्याचे व्यवहार होतात. त्यांचा उद्देश कोवेडियनच्या उदाहरणाप्रमाणेच छोट्या कंपनीने केलेले स्वस्त आणि परिणामकारक असे औषध किंवा संशोधन बाजारात येण्यापासून रोखणे एवढाच असतो. केवळ बड्या कंपनीच्या स्वतःच्या नफेखोरीच्या हितसंबंधांसाठी !!
याचे उत्तम उदाहरण आहे, रोश या कंपनीचे. रोश ही औषधनिर्मितीमधील जागतिक कंपनी. तिचे हेमोफेलिया या रक्त न गोठण्याच्या विकारावर एक प्रख्यात औषध आहे. त्याचे नाव हेमलिब्रा. रुग्णाला ते दर ४ आठवड्यांनी घ्यावेच लागते. रोश कंपनीने २०१८ मध्ये स्पार्क थेराप्युटिक्स नावाची एक कंपनी विकत घेतली. कशासाठी ? तर स्पार्क कंपनी असे एक औषध निर्माण करण्याच्या अंतिम अवस्थेत होती की, जे फक्त एकदाच घेतले तर हेमोफेलिया या विकारावर कायमचा इलाज होईल. अर्थात् रोश कंपनीच्या हेमलिब्रा या औषधाचा रस्ताच बंद होईल. त्यातून मिळणारा नफा कायमचा बंद होईल. म्हणून उपाय असा की, अशा औषधाचा स्पर्शदेखील बाजारपेठेला होता कामा नये. याला म्हणतात भांडवलशाही.
लस निर्मितीमध्ये देखील नफेखोरीचा अधिकार
कोरोनाने इतका हाहाः कार माजविल्यानंतर त्याच्या विरोधात लस निर्माण करण्यासाठी जगातील सर्वच सरकारे प्रयत्नशील आहेत. अमेरिकन सरकार आणि त्यांच्या संस्थांनी आतापर्यंत त्यासाठी ८० कोटी डॉलर्स खर्च केलेले आहेत. शिवाय आता फेब्रुवारी 20 मध्ये जे पॅकेज लशीची चाचणी घेण्यासाठी तेथील सरकारने मंजूर केले त्यात ३ अब्ज डॉलर्सचा आणखी निधीदेखील त्यासाठी मंजूर करण्यात आला. पण हा यापेक्षा कितीतरी जास्त सरकारी निधी खाजगी कंपन्यांना संशोधनासाठी उपलब्ध होऊन देखील अमेरिकन खाजगी औषध कंपन्यांनी त्यातून तयार झालेली औषधे ही स्वस्त आणि सामान्यांना परवडण्याजोग्या किंमतीला ठेवण्याची हमी तर दिलेली नाही. या सर्व सार्वजनिक निधीची संशोधनातील भूमिका मांडून त्याआधारे अमेरिकन संसदेच्या ६४ सदस्यांनी अध्यक्षांकडे स्वस्त लस आणि अन्य औषधांची मागणी केली. त्यालादेखील औषध कंपन्यांच्या संघटित फळीने दाद दिलेली नाही. औषधे, मग ती प्राण वाचविणारी लस असली तरी आणि संशोधनाचा निधी सरकारने दिलेला असला तरी, त्यावर अमेरिकन कंपन्यांनी आपले पूर्ण बौद्धिक स्वामीत्व अधिकार राखून ठेवलेले आहेत. कोणतेही किंमत व नफ्याचे नियंत्रण मान्य करणार नाही, अशीच भूमिका आजदेखील कायम ठेवलेली आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सिनेटने ती कायमच मान्य केलेली आहे. या नफेखोरी मक्तेदारी विरोधात लढल्याशिवाय कोरोनाशी लढणे अशक्यच आहे.
अजित अभ्यंकर
__________________________________________________________________________________________________________
('संयुक्त महाराष्ट्र चळवळ' मालिकेतील अजित अभ्यंकर यांचा लेख अपरिहार्य कारणास्तव आजच्या बुलेटिनमध्ये देऊ शकत नाही. वाचकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. - संपादक)

३३ - भारतीयत्व आणि भारताच्या राष्ट्र निर्मितीचे आधार

 

जीवनमार्ग बुलेटिन : ३३

रविवार, ३ मे २०२०

भारतीयत्व आणि भारताच्या राष्ट्र निर्मितीचे आधार

मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र, तेलुगू भाषिकांसाठी आंध्र, पंजाबी भाषिकांसाठी पंजाब इत्यादी अशा भाषावार प्रांतररचनेच्या मागण्यांसाठी देशात १९५० ते १९६६ पर्यंत मोठ्या चळवळी झाल्या. त्या हिरीरीने लढविल्या गेल्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही त्यातील एक सर्वात महत्त्वाची चळवळ. कारण महाराष्ट्रासाठीच्या चळवळीत भावनेइतकाच विचार हा महत्त्वाचा होता. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र तर हवाच. पण तो समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने, ही त्या आंदोलनाची महत्त्वाची घोषणा होती.
या आंदोलनाबाबत विचार करताना असा प्रश्न विचारला गेला की, मराठी राज्यात राहिलो काय किंवा द्वैभाषिक राज्यात राहिलो काय, शेवटी भारतातच राहणार ना ? भारतीय असाल तर तुम्हाला ते पुरेसे नाही काय ? शिवाय भाषेच्या प्रश्नावर इतके आक्रमक होण्याइतके आपले भारतीयत्व कमी महत्त्वाचे आहे का ?
मग पहिला प्रश्न असा येईल की, भारतीयत्व काय आहे ? ते कसे निश्चित होते ? भारत हे एक राष्ट्र आहे. तेथील बहुसंख्य नागरिकांचा धर्म हिंदू आहे. पण मग हिंदू असणे हीच भारतीय असण्याची मुख्य अट का असू नये ? संघवाले असे म्हणतात की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. ते का नाकारावे ? याचे उत्तर समजण्यासाठी आपल्याला राष्ट्र म्हणजे नेमके काय ? याचे उत्तर शोधावे लागेल.
राष्ट्राचा गाभा जनेच्छेने निर्मित सार्वभौम सत्ता
राष्ट्र याचा अर्थ समान भाषा, संस्कृती, इतिहास, लोकजीवन, भविष्य यांनी तसेच सलग भूप्रदेशाने जोडला गेलेला, आणि स्वतःची सार्वभौम सत्ता निर्माण करण्याच्या आकांक्षेने प्रेरित झालेला समुदाय. असा समुदाय जेंव्हा आपली स्वतःची सार्वभौम सत्ता स्थापन करतो त्याला म्हणतात, राष्ट्र-राज्य. त्यातील राज्य ह्या शब्दाचा अर्थ येथे सार्वभौम सत्ता. इंग्रजीमध्ये Nation State. राष्ट्र-राज्य असे न म्हणता, त्यालाच राष्ट्र म्हणून ओळखले जाते. याचा साधा अर्थ अशा एकत्वाच्या भावनेने प्रेरित जनतेने आपल्या स्वेच्छेने निर्माण केलेली सार्वभौम सत्ता.
राजेशाही, साम्राज्यशाही ही जनतेच्या इच्छेने नव्हे तर, राजपुरुषांच्या तलवारीवर निर्माण होते आणि त्यांच्या घराण्यात वारसाहक्काने चालत राहते. तिला एखाद्या धर्मसत्तेची –धर्मपीठाची मान्यता मिळालेली असते. राजा हा सार्वभौम असतो. सर्व सत्ताधीश असतो. राजा किंवा धर्मप्रमुख-धर्मसत्ता चांगले वाईट असू शकतात. परंतु एखादा मनुष्य कितीही चांगला, न्यायी असला तरी राजघऱाण्याबाहेरचा कोणीही राजा होऊ शकत नाही. कारण काहीही झाले तरी जनता आणि राजा यांच्यात एक अभेद्य दरी कायमच असते.
पण राष्ट्र –राज्य हे जनतेच्या स्वेच्छेने निर्माण होते. कारण ते प्रजासत्ताक असते. राजसत्ताक किंवा सम्राटसत्ताक नसते. म्हणूनच ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल ही युरोपात आज दिसणारी राष्ट्रे किंवा अमेरिका, मेक्सिको, ब्राझील यासारखी अमेरिका खंडातील राष्ट्रे गेल्या 250 वर्षांत म्हणजे, १७५० ते १९०० च्या दरम्यान निर्माण झालेली आहेत.(काही वासाहतिक देशांचा विचार केल्यास हा काळ अर्थात १९५०पर्यंत लांबेल.) तेथील राजसत्तांच्या विरोधात एक तर तेथील जनतेने उठाव केले किंवा चळवळी करून जनतेने स्वतःच्या इच्छेने सार्वभौम सत्ता स्थापन केल्या.
साम्राज्यांमधून राष्ट्रनिर्मिती कशामुळे त्यांची निर्मिती कशामुळे आणि कशाच्या आधारावर झाली ? काय गरज होती राष्ट्र–राज्यांच्या उदयाची ? इतिहास आपल्याला दाखवितो की, लोकांना १६००-१८५० दरम्यान युरोपमध्ये एका बाजूला नवे शास्त्रीय शोध, नवे तंत्रज्ञान,औद्योगिक आणि व्यापारी क्रांती, नवे भूप्रदेश यातून स्वतंत्र संपन्न आर्थिक जीवनाची शक्यता स्पष्ट दिसत होती. तर दुसऱ्या बाजूला सामंतशहा-राजा-चर्चची राजकीय-आर्थिक सत्ता असह्य झाली होती. त्यामुळे त्यांना सामंतशहांच्या लुटारू, शोषक जोखडाखालून मुक्त होऊन समानतेवर आधारित स्वतःची म्हणजे जनतेची लोकशाहीवर चालणारी सत्ता स्थापन करावयाची होती. पण जनता म्हणजे कोण ? साम्राज्यात तर अनेक भाषिक सांस्कृतिक लोक होते. त्यांच्यावर सत्ता गाजविणारा एक सम्राट हा नाकारायचा तर सत्ताधारी कोण होणार ? त्यामुळे त्यासाठी जनतेला स्वतःची सांस्कृतिक ओळख स्वतःलाच पटवावी लागली. त्यांच्यात समान दुवा काय आहे, याचा शोध सांस्कृतिक घुसळणीतून लागला. त्यावेळी त्यांच्यातील भाषिक-सांस्कृतिक एकत्व हाच त्यांना त्यांच्या नव्या राजकीय आर्थिक जीवनाचा आधार वाटला.
नव्या आर्थिक क्रांतीच्या क्षितिजावर असताना, कोणत्या तरी सम्राटाच्या हुकूमशाही सत्तेखालील बहुभाषिक -बहुसांस्कृतिक –बहुप्रदेशी वळकटीमध्ये बांधल्याप्रमाणे राहणे, त्यांना स्वीकारार्ह वाटेना. त्यांना त्यांची त्यांची भाषा-संस्कृती-परंपरा यांच्या आधारावर, सर्व व्यक्तिंना समान राजकीय अधिकार देणारी लोकशाही व्यवस्था, म्हणजेच नवे राष्ट्र राज्य हे घडवावेसे वाटले. त्याचा आधार धर्म हा तर नव्हताच, पण उलट सामंतशहांच्या सोबतीनेच धर्माच्या नावाखाली सत्ता गाजविणाऱ्या चर्च-पोप-बिशप यांचे विशेष अधिकार नाकारणे, हाच तर त्यांचा क्रांतीकारी कार्यक्रम होता. त्यामुळे युरोपमधील राष्ट्र राज्यांची निर्मिती म्हणजे, राजकीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-व्यवसाय स्वातंत्र्य, विचारस्वांतत्र्य या घोषणांच्या आधारावर विविध भाषिक-सांस्कृतिक समूहांनी सामंतशहा-चर्च यांच्याशी केलेल्या प्रखर संघर्षातून, आपापल्या राज्यांची प्रत्यक्षात आणलेली घोषणा होय. हे इतिहासात कधीच घडलेले नव्हते. एका बाजूला औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेली व्यापारी-भांडवलदारांची, सामंतशहांच्या हितसंबंधांच्या विरोधात जाणारी ताकद असल्याशिवाय असे उठाव होणे इतिहासात शक्यच नव्हते.
भारतात काय घडले?

भारतासारखे जे प्रदेश साम्राज्यवादी वसाहतवादी सत्तेखाली होते, त्यांची लढाई त्या त्या वसाहतवादी सत्तेशी, त्यांच्या साम्राज्याशी झाली. त्याच प्रक्रियेमध्ये त्या त्या प्रदेशातील जनतेने आपापली भाषिक-सांस्कृतिक-सामाजिक अस्मिता गोळा करत, नव्या स्वतंत्र आर्थिक-राजकीय जीवनाच्या स्वप्नासाठी जो लढा दिला, त्यातून त्या त्या राष्ट्रांची निर्मिती झाली. अर्थातच जगात ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १९५०-६० चा कालखंड उजाडावा लागला.
ब्रिटीशांनी भारताची सत्ता हातात घेतली होती ती एका कोणत्या तरी एका सत्तेचा किंवा सम्राटाचा पराभव करून नव्हे. तर मोगल, त्यांचे स्वतंत्र बनलेले सरदार, मराठेशाहीतील सरदार आणि पेशवे, निजामशाही, शीख सत्ता, दक्षिणेतील स्थानिक सत्ता इत्यादी विविध केंद्रात विभाजित झालेली सत्ता त्यांनी मिळविली. याचे कारण ब्रिटीश येण्यापूर्वी भारताचे रूपांतर त्या काळात जनतेने स्वेच्छेने निर्माण केलेल्या राष्ट्र-राज्यात झालेले नव्हते. म्हणजे ब्रिटीश येण्यापूर्वी भारत हे फ्रान्स, जर्मनी इटली या देशांप्रमाणे एक आधुनिक राष्ट्र-राज्य बनलेच नव्हते. किंबहुना म्हणूनच ब्रिटनसारख्या छोट्या राष्ट्राने भारतासारख्या इतक्या मोठ्या देशावर आपली सत्ता स्थापन केली आणि सुमारे १५० वर्षे चालविली.
भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे आधार
त्या नंतर भारतामध्ये शिक्षणाची चळवळ सुरू झाली. युरोपमध्ये झालेल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय क्रांतीची जाणीव झाली. ब्रिटीश राज्याचे कारण, उद्देश आणि मर्म ध्यानात येऊ लागले. आपल्यातील दोषांची जाणीव झाली. त्यानंतर त्यांच्याकडून होणारी लूट आणि शोषण थांबविण्यासाठी, तसेच आपल्या समाजात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक चळवळी सुरू झाल्या.
ब्रिटीश साम्राज्यवाद्यांशी संघर्ष करून स्वातंत्रचळवळ निर्माण होत असताना भारतीय नावाची राष्ट्रीय-राजकीय ओळख निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याआधी भारताचे अखंड असे एकछत्री राज्य काही मोजके अशोक, चंद्रगुप्ताचे अपवाद वगळले तर निर्माण झालेले नव्हते. तुर्की-मोगल साम्राज्याच्या काळात विविध शाह्या आणि त्यांचे सरदार यांच्यातच सत्ता विभाजित राहिली. संत परंपरेच्या निमित्ताने जनतेची स्थानिक भाषिक संस्कृतींमधील उदात्तता यांचा परिपोष झाला. सामंतशहांच्या सत्तेपेक्षा वेगळी अशी सांस्कृतिक ओळख त्या त्या प्रदेशांना प्राप्त होऊ लागली. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले रयतेच्या राज्याचे आवाहन खऱ्या अर्थाने गेल्या तीनशे वर्षांतील महत्त्वाचे राष्ट्रीय आवाहन म्हणता येईल. परंतु त्याचा विस्तार आणि कालखंड हा मर्यादित राहिला.
स्वातंत्र्यांची चळवळ निर्माण होत असताना आपण भारतीय आहोत आणि आपल्याला ब्रिटीश गुलामीच्या विरोधात एकत्रच लढा करायचा आहे, याची जाणीव तीव्र होती. तरी पण आपापली भाषा वेगळी आहे, वेगळी प्रादेशिक सांस्कृतिक ओळख आहे, अशी जाणीवही व्यक्त होत होती. १९१५ नंतर त्याला थोडा वेगदेखील आलेला होता.
प्रत्येक भाषेसाठी एक प्रांत ब्रिटीशांनी निर्माण केलेला नव्हता. तसे करण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. कारण त्यांना भारताचा विकास करायचा नव्हता किंवा लोकशाही राज्य चालवायचे नव्हते. त्यांना वासाहतिक शोषणासाठी राज्य टिकवायचे होते, इतकेच. त्यांनी निर्माण केलेले प्रांत हे बहुभाषी, अतिशय मोठे आणि संपर्कासाठी अतिशय कठीण असे होते. त्यामध्ये प्रशासकीय सुलभता जवळपास नव्हतीच.
स्वातंत्र्यचळवळीच्या माध्यमातून भारतीयत्वाच्या राष्ट्रीय भावनेचा उदय होत असतानाच भाषा आणि स्थानिक प्रादेशिक संस्कृतींचा मुद्दा स्वाभाविकपणे त्याला जोडूनच पुढे येत होता. किंबहुना दोन्ही एकाच स्वातंत्र्यांच्या प्रक्रियेचे दोन पैलू होते. उदाहरणार्थ १९०५मध्ये बंगाल प्रांताची विभागणी पूर्व आणि पश्चिम अशी करण्याचा निर्णय कर्झन याने केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या कारणासाठी केला. पण त्याला प्रचंड विरोध झाला. ब्रिटीशांविरोधात अभूतपूर्व चळवळी झाल्या, त्या भाषिक एकवाक्यतेच्या आधारावरच. म्हणजेच धर्मापेक्षा भाषा हा कितीतरीपटीने लोकांना जोडणारा राष्ट्रीय दुवा असतो, हे त्याच वेळी सिद्ध झाले.
धार्मिक उन्मादावर राष्ट्र उभे राहू शकत नाही
पुढे धार्मिक उन्मादाच्या आधारावर , मुस्लिम लीग आणि जीना यांना वापरून पाकिस्तानची निर्मिती झाली खरी. पण पश्चिमेकडील पंजाबी-सिंधी भाषिक पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेकडचा बंगाली भाषिक पूर्व पाकिस्तान यांचे पाकिस्तान नावाचे एक राष्ट्र, अशी अत्यंत कृत्रिम-अव्यवहार्य अशी व्यवस्था जिना यांनी देशातील जनतेच्या माथी मारली.
याचा परिणाम काय झाला? केवळ २५ वर्षांच्या आतच, भाषेची जवळीक धर्माच्या उन्मादापेक्षा तीव्र असते, आणि हा उन्माद आर्थिक शोषणाचे वास्तव झाकू शकत नाही, हे पुन्हा एकदा पूर्व पाकिस्तानमध्ये दिसून आले. १९७१ मध्ये बांगला भाषिकांचा बांगलादेश निर्माण झाला. मुसलमानांसाठी पाकिस्तान ही संकल्पना नाकारून, अगदी स्वधर्मियांच्या विरोधात सशस्त्र संघर्ष करून. त्यामुळे भारताच्या संदर्भात आपण भाषिक अस्मितांचा विचार करतो, त्यावेळी आपल्याला भारत या राष्ट्राच्या निर्मितीची मूल्ये कोणती होती, ते तपासून पाहिले पाहिजे.
त्यासाठी जागतिक संदर्भदेखील विचारात घेतले पाहिजेत. जगात इतकी इस्लाम धर्मीय राष्ट्रे आहेत. त्यांचे एक राष्ट्र होऊ शकत नाही. ख्रिश्चन धर्मियांचे एकराष्ट्र कधीच झाले नाही. कारण धर्म हा राष्ट्राचा पाया कधीच होऊ शकत नाही. हा जागतिक इतिहासाचा धडा आहे.
म्हणूनच हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतीय राष्ट्रवादाची उभारणी खालील मुद्यांवर झालेली आहे.
• अनेकविध भाषा-संस्कृतींमधून पाझरणारी भारताची धर्मनिरपेक्ष सांस्कृतिक परंपरा-भारतीय असल्याची ओळख. त्या ओळखीचा एक पैलू अनेक भाषिक-प्रादेशिक संस्कृती असा आहे, तर दुसरा त्यातून स्रवणारी भारतीयत्वाची ओळख असा आहे.
• ब्रिटीश साम्राज्यवादाच्या विरोधात जनतेची एकजूट आणि लढा
• लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर समाज उभारणीची घटनेमध्ये व्यक्त झालेली उमेद
यासर्वांमध्ये भाषेची आणि विविध भाषिक प्रादेशिक जाणीवांची भूमिका काय होती, ती कशी विकसित झाली ते पुढील भागात पाहू.
___________________________________________________________________________________
अजित अभ्यंकर

३२ - आत्मभान हरविलेला महाराष्ट्र - भाग : २

 

जीवनमार्ग बुलेटिन : ३२

शनिवार, २ मे २०२०

चिंतनिका

आत्मभान हरविलेला महाराष्ट्र - भाग : २

भारतीय प्रजासत्ताक हे एक संघराज्य (Federation) आहे;
एकस्तंभी एकतंत्री सत्ता नाही
काल आपण पाहिले की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही काही निश्चित अशा राजकीय वैचारिक मुद्द्यांवर उभी होती. ती केवळ जमावाची भावनिक मानसिकता आणि झुंडशाही नव्हती. लोकशाहीची जबाबदार जाणीव तिच्यामध्ये ओतप्रत भरलेली होती. म्हणूनच २ महिन्यात १०५ सामान्य माणसे संपूर्ण अहिंसक मोर्चातून पोलिसांच्या गोळ्यांनी टिपली; तरीही एकाही नेत्याने कधीही हिंसक प्रतिकाराचा शब्ददेखील काढला नाही.
कारण काही मूलभूत राजकीय वैचारिक मुद्द्यांवर आणि निष्ठांवर ही चळवळ उभी होती. मराठी राज्याच्या या चऴवळीने नेमके कोणते वैचारिक राजकीय मापदंड स्थापित केले, हे आपण येत्या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी पहिला आहे, भारतीय प्रजासत्ताक हे संघराज्य आहे, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना करून देणे. आज 2020 च्या परिस्थितीत तर त्याची फारच मोठी गरज असल्याने त्या मुद्याची उजळणी होणे अत्यंत गरजेचे आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
संघराज्य याचा अर्थ काय?
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक महत्त्वाचा आधार होता की भारत हे संघराज्य आहे. पण म्हणजे नेमके काय ? आणि ते खरे कशावरून ? याचा विचार आज करू.
अनेक राज्यांचे मिळून जे प्रजासत्ताक बनते, त्याला संघराज्य असे म्हणतात. हा झाला शब्दशः अर्थ. त्याचा खरा अर्थ राज्य आणि केंद्र यामध्ये प्राथमिक कोण ? आणि त्यांच्यात अधिकाराचे वाटप कसे होते ? यामध्ये दडलेला आहे. ज्या राज्यव्यवस्थेत केंद्राचे आणि घटकराज्यांचे अधिकार एका निश्चित योजनेनुसार दोघांनाही बंधनकारक असलेल्या घटनेनुसार प्रथम ठरवलेले असतात ते संघराज्य असते. म्हणजे त्याचा अर्थ असा की, केंद्र हे प्रमुख असून त्यांनी काही अधिकार दिले तर आणि तेवढेच राज्यांना असतील, अशी परिस्थिती संघराज्यात असू शकत नाही. कारण उभयतांना बंधनकारक असणाऱ्या आणि त्यांच्यात अधिकारांचे वाटप करणाऱ्या घटनेमधूनच संघराज्य व्यवस्था निर्माण होते. म्हणजेच, केंद्र सरकार मनमानी पद्धतीने राज्यांना दुय्यम लेखून त्यांच्यावर आपल्या अधिकाराचा वरवंटा चालू शकत नाही.
भारतीय राज्यघटनेचे पहिले कलमच असे सांगते की, इंडिया, म्हणजे भारत हा राज्यांचा संघ आहे. India, that is Bharat, is a Union of States. यातून असे दिसते की राज्ये ही भारतीय प्रजासत्ताकाचा पाया आहेत. राज्ये प्राथमिक आहेत. त्यांचा संघ बनल्याने भारतीय प्रजासत्ताक बनते. पण तरीही येथे वापरलेला शब्द Union असा आहे, Federation असा नाही. त्यामुळे भारतामध्ये राज्ये एकत्र आल्याने जरी ते बनलेले असले, राज्ये ही स्वतंत्र सौर्वभौम नाहीत. असणार नाहीत. हे स्पष्ट केलेले आहे आणि ते योग्यच आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भारत आणि यूएसए मधील फरक
भारताप्रमाणेच युएसए म्हणजे ज्याला आपण अमेरिका अशा नावाने ओळखतो, ते देखील एक संघराज्यच आहे. पण भारत आणि युएसए मध्ये त्याबाबत मूलभूत फरक आहे. अमेरिकेत (युएसए) केंद्राचे अधिकार मर्यादित आहेत. आणि ते घटनेत ठरवून सीमित केलेले आहेत. परराष्ट्र धोरण, परराष्ट्र संबंध, सीमा, संरक्षण, चलनव्यवस्था, नागरिकत्व याबाबत सर्व अधिकार केंद्रीय सरकारला आहेत. मात्र ते अधिकार वगळता उर्वरित सर्व अधिकार हे राज्यांचे असतात. अमेरिकन राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांना बाधा पोचणार नाही, अशा पद्धतीने बनविलेली स्वतःची स्वतंत्र घटना राज्यांना असते. त्यांचे निवडणुकीचे, व्यवसायाचे, फौजदारी कायद्याचे, करांचे नियम सर्व काही राज्यानुसार भिन्न असतात.
याचे कारण युएसए संघराज्य बनण्यापूर्वी तेथे १४ राज्ये म्हणजे वसाहती आधी स्वतंत्रपणे अस्तित्वात होत्या. त्यांनी इंग्लडच्या राजाविरोधात एकत्र येऊन बंड करून संघराज्य बनविले. (आज युएसएमधील राज्यांची संख्या ५० आहे.) त्यानंतर त्यांच्या एकत्र येण्याचा दस्तऐवज म्हणून १५ वर्षांनी घटना बनविली. त्यामुळे तेथे घटना दुरूस्ती करण्याची त्याच प्रमाणे राज्यांची पुनर्ररचना करण्याची शक्यता आणि प्रक्रिया फारच अवघड आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भारताचे एकत्रीकरण आणि राज्ये
भारतात मात्र तसे नाही. राज्ये प्रथम अस्तित्वात येऊन त्यांनी एक करार केला आणि त्यातून भारतीय संघराज्य बनले, असे झालेले नाही. ब्रिटीशांनी भारतात विविध संस्थाने, राजे यांच्याशी करार करून किंवा लढाया करून सत्ता जबरदस्तीने हस्तगत केली. १९४७ मध्ये ब्रिटीश गेले तेंव्हा भारतीयांकडे ही सत्ता ब्रिटीश संसदेचा कायदा करून हस्तांतरित केली गेली. त्यानुसार ब्रिटीशांचे राज्य संपुष्टात आले. फाळणीची जखम घेऊऩ भारत स्वतंत्र झाला.
अर्थात, जाताना ब्रिटीशांनी देशात जी संस्थाने होती, त्यांना तुम्ही आता स्वतंत्र राहण्यास किंवा भारतात सामील होण्यास किंवा पाकिस्तानमध्ये जाण्यास स्वतंत्र आहात, असे सांगून एकसंध भारताला ५६२ छिद्रे पाडण्याची तयारी करून ठेवली. पण भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या व जनतेच्या दबावाखाली या संस्थानिकांनी निमूटपणे भारतात सामील होण्याचा कौल दिला. ज्या जुनागढ आणि निजामासारख्या सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या इच्छेविरोधात राजेपणा दाखविण्याचा प्रयत्न केला, त्यांना वठणीवर आणण्यात आले. त्यामुळे भारतात हा संस्थानांचा अपवाद वगळता, ब्रिटीशांच्या केंद्रीय सत्तेकडे जसे होते तसे भारताचे राज्य स्वतंत्र भारताच्या केंद्र सरकारकडे हस्तांतरित झाले. त्या त्या प्रांतांकडे नाही.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भारतीय घटनेची निर्मिती
भारतीय संघराज्य ही भारतीय घटनेने केलेली निर्मिती आहे. १९४६ मध्ये निवडण्यात आलेल्या घटना समितीने जनतेच्या वतीने भारताची घटना तयार करून ती भारतीय जनतेस दिली.
भारतीय घटनेच्या कलम एक नुसार भारत हे संघराज्य असल्याचे जाहीर करून येथील प्रजासत्ताकाची आणि राज्यकारभाराची दिशा दाखविली आहे. केंद्र आणि राज्य यांच्यात अधिकाराचे घटनानिर्णित विभाजन केलेले आहे.
पण तरीही एखाद्या राज्याचे विभाजन किंवा दोन वा अधिक राज्यांचे एकत्रीकरण भारतीय परिस्थितीत करणे फार अवघड नाही. कारण राज्ये कशाच्या आधारावर बनवावी व त्याचे निकष काय याबाबत कोणतीही तरतूद घटनेत नाही. घटनेत केंद्र आणि राज्य यांचे स्वतंत्र अधिकार कोणत्या विषयांबाबत कायदे करण्याचे आहेत, ते स्पष्टपणाने मांडलेले आहे. शिवाय केंद्र आणि राज्य सरकार या दोहोंच्याही अखत्यारीत काही विषय ठेवण्यात आलेले आहेत. ज्या विषयांचा अथवा अधिकारांचा समावेश कोणत्याच यादीमध्ये नाही, ते सर्व उर्वरित अधिकार हे केंद्राचे आहेत. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या पाहिले तर भारतात केंद्रीय सत्ता ही प्राथमिक ठरते. राज्ये ही प्रजासत्ताकाचा फक्त भाग बनतात.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भारतीय लोकशाहीत राज्यांचे स्थान
परंतु हा झाला कायदेशीर घटनात्मक भाग. याचा अर्थ असा नाही की भारतात राज्यांचे महत्त्व कस्पटासमान किंवा केवळ प्रशासकीय विभाजन याच स्वरूपाचे आहे. तसे असते तर, भारतीय घटनेत भारतीय प्रजासत्ताकाला भारतीय संघराज्य असे म्हटले नसते. ही गोष्ट सत्य आहे की, गेली ३० वर्षे भारतात राज्यांचे अधिकार कममुवत करून केंद्राकडे अमर्याद अधिकाराचे केंद्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भारत हे संघराज्य नसून केंद्रीय एकवट सत्तेचे प्रजासत्ताक आहे, असा समज होऊ शकतो. परंतु त्यातून जनतेचे तसेच विकासाच्या प्रक्रियेचे अतोनात नुकसान झालेले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. त्याचा विचार आपण नंतर करणारच आहोत.
ब्रिटीशांनी भारताचे प्रांत एक दिवसात बनविले नाहीत. जसे प्रदेश त्यांच्या ताब्यात येत गेले, तसे ते बनत गेले. ते बनविताना वसाहतिक सत्तेच्या राजकीय सोयीपलिकडे कसलाही विचार केला नव्हता. त्यामुळे बहुतेक राज्यांत भाषेनुसार ३-४ प्रमुख गट असत. जसे मुंबई प्रांतात मराठी, कानडी, गुजराथी आणि सिंधी हे प्रमुख भाषिक गट होते. मद्रास प्रांतात तामिळ, मल्याळम्, तेलुगु, कन्नड अशा भाषांचे प्रदेश होते. अर्थात् राज्यकारभाराची भाषा त्या सर्वांपेक्षा वेगळी म्हणजे इंग्रजी हीच असे. लोकांना न कळणारी भाषा राज्य-न्याय कारभारात असणे ही तर ब्रिटीशांना हवी असणारीच बाब होती.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भाषावार राज्य हाच लोकशाहीचा मूलभूत घटक
पण स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेत्यांना हे उमगले होते की, वासाहतिक सत्तेसाठी हे ठीक असेल. कारण त्यांचा उद्देशच मुळी जनतेची लूट करणे हा होता. पण जर स्वातंत्र्य मिळविणे म्हणजे लोकांचे राज्य निर्माण करणे असेल, तर राज्यांची रचना भाषावार असली पाहिजे. भाषा हाच जनतेच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा पोत असतो. भाषा ही केवळ माध्यम किंवा साधन नाही, तर सांस्कृतिक अभिव्यक्ती असते. म्हणून प्रजासत्ताकाची राज्यव्यवस्था ही भाषेला समांतरच झाली पाहिजे. कारण जनता हीच जर प्रजासत्ताकाचा पाया असेल, त्यांचे भाषावार विभाग हेच प्रजासत्ताकाचे मूलभूत घटक, भारताचे मूलभूत राजकीय एकक बनतात. याचाच अर्थ स्वातंत्र्यानंतर निर्माण होणारे भारतीय प्रजासत्ताक हे अपरिहार्यपणे संघराज्यच असले पाहिजे, हे निश्चित होते.
हे वास्तव आणि भवितव्य लक्षात घेऊन स्वाभाविकपणे लोकांसाठी सुरू असणारे स्वातंत्र्याचे राजकारण हे देखील लोकांच्या भाषेतूनच चालले पाहिजे, हा विचार काँग्रेसमध्ये आला. म्हणूनच १९२२ पासून काँग्रेसची संघटना भाषावार विभागानुसारच करायचे ठरविण्यात आले व ती तशी करण्यात आली. १९२८ मध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकून भारताच्या भविष्यातील घटनेचे प्रारूप मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील ज्या एका समितीने केले, तिनेदेखील भाषावार प्रांतरचना हाचा पाया असल्याचे स्पष्ट केले.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
स्वातंत्र्योत्तर काळात बदलली भूमिका
मात्र स्वातंत्र्यानंतर राज्यांची रचना करण्याचा मुद्दा आला, तेंव्हा मात्र काँग्रेसने आपली स्वातंत्र्य चळवळीतील भूमिका बदलण्यास सुरूवात केली. भारतीय घटना लिहिली जात असतानाच (१९४६ ते १९४९ ) हा प्रांतरचनेचा प्रश्न राजकीय ऐरणीवर येत होता. पण त्याच वेळी देशासमोर भारत-पाकिस्तान फाळणीचे भयंकर संकट आले. ती फाळणी धार्मिक पायावर झालेली असली, तरी हा फुटीरतेचा वणवा कदाचित भाषिक पायावर अन्यत्र पसरला, तर देशावर आणखी एखाद्या विभाजनाची वेळ येऊ नये, असा विचार नेहरू, पटेल यांच्यासारख्या नेत्यांच्या मनात आला. तो योग्य असला तरी, त्यांनी काढलेले उत्तर योग्य नव्हते. ते लोकशाहीच्या मूलभूत मुद्यालाच फाटा देणारे होते.
कोणत्याही कारणाने असेना, १९४७ ते १९५० या काळात भाषावर प्रांतरचना करण्याचा मुद्दा सरकारने प्रथम न्यायमूर्ती दार आयोग नेमून टाळला. नंतर स्वतः नेहरू, पट्टाभि सीतारामय्या, आणि वल्लभभाई पटेल हे सदस्य असणाऱ्या एका समितीच्या शिफारसींच्या माध्यमातून पुढे ढकलण्यात आला. २६ जानेवारी रोजी घटना अस्तित्वात आली तेंव्हा, विवाद टाळण्यासाठी बहुधा, पूर्वीप्रमाणे प्रांतरचना ठेवून त्यात समाविष्ट संस्थानांची सोय करण्यासाठी राज्यांचे अ, ब, क असे गट करण्यात आले.
ही घटना एकमताने स्वीकारून स्वतंत्र भारताने धर्मनिरपेक्षता, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, सामाजिक न्याय इत्यादी मूलभूत मुद्यांवरील आपली निष्ठा व्यक्त केली. कितीही धर्मांध विचाराने आणि ब्रिटीशांच्या उत्तेजनाने पाकिस्तानची निर्मिती झालेली असली, तरी उर्वरित भारतीय राष्ट्र हे धर्मनिरपेक्षच राहील याची ग्वाही भारताने दिली. भारतात कधीही कोणत्याही धर्माला प्राथमिकत्व देणारे राष्ट्र येणार नाही, याचा स्पष्ट निवाडाच दिला. जगात एक नवे अभिमानास्पद असे पर्व सुरू झाले.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भाषावार प्रांतरचनेसाठी आंदोलने
परंतु नंतर दोन वर्षांत भाषावार प्रांतरचनेच्या मुद्याने प्रखर राजकीय स्वरूप धारण केले. मद्रास प्रांतातून तेलुगु भाषिक प्रदेश वेगळा काढून आंध्र प्रदेश राज्य बनविण्यासाठी १९५२ मध्ये आंदोलन सुरू झाले. पोट्टी श्रीरामलू या नेत्याने आमरण उपोषण करून ५८ व्या दिवशी प्राण सोडले. या घटनेमुळे तर राजकीय भूकंपच निर्माण झाला. आंध्र प्रदेशची मागणी तात्काळ मंजूर करण्यात आली.आणि १९५३ मध्ये न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नावर अभ्यास करून सरकारला शिफारसी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला. कारण १९४० पासूनच महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पंजाब, गुजरात भाषिक प्रांतांसाठीच्या मागण्या सुरू झालेल्या होत्या. युद्धामुळे तसेच, हे आंदोलनकर्तेदेखील स्वातंत्र्य आंदोलनाचा हिस्सा असल्याने त्याला राजकीय स्वरूप नव्हते. स्वातंत्र्यानंतर ते स्वरूप तीव्रतेने आले. त्याला पुढील काळात आलेल्या राजकीय स्वरूपाचा विचार पुढील विभागांमध्ये करू.
__________________________________________________________________________________________________________
अजित अभ्यंकर