जीवनमार्ग बुलेटिन : १५
बुधवार, १५ एप्रिल २०२०
स्त्रीमुक्तीचे शिल्पकार
घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने भारतातील कोट्यवधी गुलामांना त्यांच्या पशुवत जगण्याच्या खातेऱ्यातून बाहेर काढले. त्यातील प्रत्येकाला एक स्वाभिमानी, आत्मसन्मान जागा झालेला माणूस म्हणून जगायचा हक्क मिळवून दिला; देश कोणाचा हे ठरवायचा मताचा अधिकार मिळवून दिला. या देशाने स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांच्या मार्गाने जावे यासाठी भारताच्या राज्यघटनेचा नकाशा ज्यांनी बनविला, त्या आंबेडकरांचे आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवे, त्यांच्या कार्याचे मोठेपण समजून घ्यायला हवे.
विशेषत: आजच्या काळात अल्पसंख्य, दलित आणि स्त्रिया यांच्यावर होणा-या अन्यायांचा आलेख वाढत चालला आहे, आणि देशातील कोट्यवधी गरीब जनतेचे नागरिकत्वाचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत, अशा वेळी आपल्याला आपल्या गुलामगिरीच्या इतिहासाचे भान आणि नागरीक म्हणून आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे नेमके काय, याची जाणीव पुन्हा एकदा जागी करायला हवी. आंबेडकरांचे स्मरण करायचे ते त्यासाठी. इतिहास आणि वर्तमानातील कृती यांचा मेळ घालण्यासाठी.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
गुलामगिरीवर आघात
आपण गुलाम का होतो? केवळ आपल्यावर ब्रिटिशांचे राज्य होते म्हणून? पण ब्रिटिश फार नंतर आले. हजारो वर्षांपासून इथल्या वर्णव्यवस्थेने आणि जातीव्यवस्थेने कष्टक-यांना गुलाम केले होते. त्यांचे श्रेणीबध्द विभाजन केले होते. हिंदू धर्माच्या नावाने कर्मविपाक आणि विटाळचांडाळाच्या कल्पना त्यांच्या माथी मारून, त्यांना गुलामगिरीच्या टाचांखाली चिरडले होते. यातले उच्चवर्णीय व उच्चवर्गीय सत्ताधारी त्यांच्या कष्टांनी निर्मिलेल्या संपत्तीचा मलिदा खात होते. सामाजिक, धार्मिक व राजकीय सत्तेचा यथेच्छ उपभोग घेत ऐश्वर्याच्या गाद्यागिरद्यांवर लोळत होते. या शिडीच्या वरच्या पायरीवरच्या जातीबद्दल आदर व खालच्या जातीबद्दल तुच्छता यांच्या मानसिक दोरांनी या जातीव्यवस्थेचे पाश गुलामांच्या गळ्याभोवती करकचून आवळले होते. इथल्या व्यवस्थेने हाडामांसाच्या जिवंत माणसांना गुलाम केले होते ते असे!
त्यातही स्त्रियांची परिस्थिती तर फारच दारूण होती. कारण स्त्रिया हे जातीचे प्रवेशद्वार. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र या पाच वर्णांच्या अंतर्गत ज्या हजारो जाती आहेत त्यांच्यातली सत्तेची उतरंडीची रचना शाबूत रहायची असेल तर स्त्रियांवरती, त्यांच्या लैंगिकतेवर, त्यांच्या अधिकार व हक्कांवर सर्वाधिक बंधने असली पाहिजेत. त्याशिवाय शुध्द जाती कशा टिकणार? त्यातही स्त्रियांबद्दल जातीनिहाय वेगवेगळे कायदेकानू, यमनियम बनवले गेले होते. पितृसत्ताकता, वर्णीय व वर्गीय शोषण यांचा अर्क बेमालूमपणे जातीत एकजीव केला होता. वेगवेगळ्या पध्दतीने त्यांच्या हातापायांभोवती बेड्या आवळलेल्या होत्या. समाजाच्या निम्म्या संख्येने असलेल्या स्त्रियांची गुलामगिरी हा जातीव्यवस्थेचा आणि पर्यायाने वर्गव्यवस्थेचा सर्वात मोठा आधारस्तंभ होता आणि आजही आहे. गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली तर हे जोखड सारे गुलाम भिरकावून देतील अशी धारणा समाजात सर्वार्थाने रुजविण्यात डॉ. आंबेडकरांनी केलेले कार्य तर समजून घेतले पाहिजेच. पण विशेषत: समाजातील स्त्रियांची परिस्थिती काय आहे हे मला सांगा आणि मी त्या समाजाचे भवितव्य सांगेन म्हणणारे आंबेडकर म्हणूनच स्त्रियांच्या दृष्टिकोनातूनही समजून घेतले पाहिजेत.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
जातीची उतरंड आणि स्त्रिया
स्त्रिया म्हणून सर्वजणी समान आहेत हा एकेकाळचा सर्वसाधारण समज हा फारसा योग्य नव्हता, हे आपल्याला जगातील अनेक समुदायांमधील वेगवेगळ्या उतरंडींच्या रचनेतून व त्याविरुध्दच्या संघर्षातून समजले आहे. गो-या व काळ्या स्त्रिया, पाश्चात्य व आशियाई स्त्रिया, उच्चवर्णीय व कनिष्ठवर्णीय स्त्रिया या अन्यायग्रस्त म्हणून देखील समान नसतात, कारण त्यांना समाजातील सत्ता व अधिकारांच्या उतरंडीत बेमालूमपणे गुंफलेले असते. म्हणून गो-या स्त्रियांना काळ्या स्त्रियांच्या शोषणाबद्दल जाणीव नसावी, पाश्चात्य स्त्रियांना आशियाई स्त्रियांबद्दल आपलेपणा वाटू नये आणि उच्चवर्गीय व वरिष्ठ जातीतील स्त्रियांना कनिष्ठवर्गीय व खालच्या जातीतील स्त्रियांबद्दल तुच्छता व तिरस्कारच वाटावा, अशी स्थिती दिसते.
डॉ. आंबेडकरांनी केलेले कार्य या दृष्टीने खूप महत्वाचे आहे, कारण एकीकडे त्यांनी स्त्रिया हे जातीचे प्रवेशद्वार आहेत असे म्हणून सर्व स्त्रियांना गुलामगिरीच्या एका सूत्रात बांधले; तर दुसरीकडे वेगवेगळ्या वर्गवर्णातील स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. हे आपल्याला नीटच समजून घ्यावे लागेल.
सर्व जातीतील स्त्रिया या त्या त्या जातीच्या समाजांची जणू मालमत्त्ताच असतात. त्यांच्यासाठी नियम जातीनिहाय वेगवेगळे बनविले जातात. दलित स्त्रियांच्या बाबतीत जे यमनियम होते ते नेमके कसे होते? त्यांनी काठापदराचे अखंड लुगडे नेसायचे नाही; वेगवेगळे धडपे जोडलेले वस्त्रच नेसायचे. सोन्याचांदीचे दागिने घालायचे नाहीत, फारतर लोखंड वा कथलाचेच दागिने घालायचे. मातीच्याच मडक्यात अन्न शिजवायचे. शिक्षण घ्यायचे नाही, शाळेची पायरी चढायची नाही. आपली सावली देखील उच्चवर्णीयांवर पडणार नाही, अगदी दुकानातून वस्तू हवी तरी कोसभर लांब उभे राहून विनवणी करायची, पाण्यासाठी वणवण करीत हिंडायचे, कारण पाणी घेतले तर पाणवठे बाटतील ! भयानक दारिद्र्यात जगायचे, पाऊसपाणी आणि दुष्काळ-अकालांच्या तावडीत भुकेने मरत रहायचे, बाळंतपणाच्या यमयातना गावकुसाबाहेरच्या झोपड्यात सोसायच्या. एखाद्या किडामुंगी सारखे जगायचे. उच्चवर्णियांची कामे करणे, त्यांच्या घरादारात, शेताभातात, वीटभट्ट्यांवर बिनामजुरीचे वेठबिगार म्हणून राबणे, हे तर होतेच. अनेक मुलांना जन्म देत मालकांना श्रमिक गुलामांचा अव्याहत पुरवठा होत राहील याची काळजी घेणे, हेही त्यांचे काम होते. शिवाय त्यांची लैंगिक भूक भागवण्यासाठी अनेक धर्माधिष्ठित संस्थात्मक व्यवस्थाही उच्चवर्णियांनी उभ्या केलेल्या होत्याच. देवदासी म्हणून, खंडोबाला मुरळी म्हणून, तमासगीर म्हणून, त्यांचे अनेकविध मार्गांनी भयंकर शोषण करणे हे उच्चवर्णियांचे ’कर्तृत्व’ होते!
डॉ. आंबेडकरांनी त्या सर्व जुलुमी व्यवस्थेविरुध्द बुलंद आवाज उठविला. वेगवेगळ्या सभा व परिषदांमधून स्त्रियांना समाविष्ट केले, त्यांच्या गुलामगिरीविरुध्द, जाती व जातींमधल्या घृणास्पद प्रथांविरुध्द त्यांची जाणीव जागी केली. तुम्ही कोणाचेच गुलाम नाहीत, ही गुलामांसारखी कोणतीही कामे करू नका, स्वत:चे छोटे छोटे का होईना, व्यवसाय सुरू करा, आत्मनिर्भर बना, जातीव्यवस्था हा तुमच्या गुलामगिरीचा पाया आहे म्हणून ती मोडून टाका, गाव सोडून शहरात जा आणि माणूस म्हणून जगा, हे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या व महिलांच्यादेखील मनीमानसी बिंबवले. शिक्षण घ्या, मुलांना शिक्षण द्या आणि आपली उन्नती साधा हा मंत्र त्यांनी स्त्रियांच्या मनांवर कोरला. आपल्या आंदोलनांमधून स्त्रियांना सहभागी करत त्यांच्या कर्तृत्वाला पंखही दिले आणि उन्नतीचे, विकासाचे आकाश त्यांच्यासाठी मोकळे केले. स्त्रिया त्यांच्या झुग्गीझोपड्यांमधून बाहेर पडल्या, शिकू लागल्या आणि पुरुषांच्या बरोबरीने, वर्ण/जाती व पितृसत्ताकतेला आव्हान देत, खांद्याला खांदा लावून सार्वजनिक आंदोलनात, व अन्य व्यवहारांमध्ये सामील होऊ लागल्या, जबाबदारी पेलू लागल्या. एक नवा समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी विचारव्यवहारांचे झुंझार हत्यार हाती घेऊन लढू लागल्या. निरक्षर, अडाणी आणि सर्वस्वी शोषित असलेल्या स्त्रिया आमूलाग्र बदलल्या आणि परिवर्तनाच्या लढ्याच्या झुंझार शिलेदार बनल्या.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
स्त्रीमुक्तीची पायाभरणी : हिंदू कोड बिल
पण हा बदल डॉ. आंबेडकरांनी केवळ कनिष्ठवर्गीय स्त्रियांच्या जीवनात केला, असे नाही. उच्चवर्णीय स्त्रियांची अवस्था व परिस्थिती देखील शोषितांचीच होती. सावित्रीबाई व जोतिबांनी लावलेल्या शिक्षणाच्या ज्योतीची मशाल या स्त्रियांच्या हाती आली होती खरे. केशवपन, सतीची चाल, विधवांवरचे घरात व बाहेर होणारे भयंकर अत्याचार, जरठबाला विवाह यांसारख्या घृणास्पद प्रथांमधून त्या हळूहळू बाहेर पडत होत्याही. पण त्यांना त्यांच्या खाजगी आयुष्यात संपत्ती, विवाह, दत्तकविधान आदिंविषयक अतिशय कमी अधिकार होते.
हिंदू कोड बिल ही डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांच्या जीवनात केलेल्या क्रांतिकारी परिवर्तनाची प्रत्यक्ष साक्ष आहे. त्यांनी आणलेल्या या क्रांतिकारी बिलामुळे त्यांच्यावर त्या काळचे जनसंघादि आरएसएसवाले, हिंदूसभावाले इत्यादि हिंदुत्वनिष्ठ तुटून पडले. स्त्रियांना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि स्वतंत्र नागरीक बनविण्यातले हिंदू कोड बिलाचे व पर्यायाने डॉ. आंबेडकरांचे कर्तृत्व वादातीत आहे. विवाह, विवाह विच्छेदन, पोटगी, दत्तकविधान, एकत्र कुटुंबपध्दतीतून पुरुषांच्या हाती एकवटलेले संपत्ती धारण करण्याचे अधिकार स्त्रियांना मिळणे, विधवांना संपत्ती मिळण्याचे अधिकार, पित्याच्या संपत्तीत मुलीला मुलाइतकेच अधिकार, वारसाचे हक्क, आंतरजातीय विवाहांना मान्यता, नागरी कायद्यानुसार विवाह करण्याची अनुमती, घटस्फोटादि अधिकार, इत्यादि अधिकारांची चर्चा या हिंदू कोड बिलाने सुरू केली. त्यातील अनेक कलमे व तरतुदी हिंदुत्ववाद्यांच्या तीव्र विरोधामुळे त्याकाळी मान्य झाल्या नाहीत. घटस्फोटाचा अधिकार देता येणार नाही कारण हिंदू धर्मात विवाह ही पवित्र दैवी गोष्ट आहे, स्त्रियांना संपत्तीत अधिकार दिले तर मिताक्षारा कायद्याप्रमाणे चालणारी एकत्र कुटुंबपध्दत कोलमडून पडेल इत्यादि कारणे देऊन हिंदुत्ववाद्यांनी या बिलाला भयंकर विरोध केला. मुळात आपली सत्ता व आपले अधिकार जातील याची त्यांना भीती वाटत होती. हे बिल पूर्णपणे न स्वीकारल्यामुळे आणि त्यात अनेक अडथळे मुद्दाम तयार केल्यामुळे शेवटी डॉ. आंबेडकरांनी त्या समितीचा राजिनामा दिला. पण ’खाजगी’ म्हणून संबोधल्या जाणा-या व स्त्रियांवरती जातीनिहाय, प्रांतनिहाय असे वेगवेगळे अन्याय करणा-या हिंदू धर्मीयांच्या अनेक जुलुमी प्रथा या बिलाने उजेडात आणल्या. आणि त्यात बदल घडवून आणू शकतील अशा अनेक क्रांतिकारी तरतुदींबाबतची जाणीव जागृती समाजात या बिलाने घडवून आणली. केवळ त्यामुळेच नंतरच्या दशकांमध्ये स्त्रिया आपला समान अधिकारांचा लढा तीव्र करू शकल्या.
नंतरच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराबाबत स्त्रीमुक्ती चळवळीने मोठे लढे उभारले, हे खरे पण त्यांची मुळे हिंदू कोड बिलाने सुरू केलेल्या, स्त्रीविरोधी हिंदू कायद्यांत बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत आहेत, हे सत्य आहे. इतकेच नव्हे तर सर्वच धर्मांमधील स्त्रीविरोधी असलेले “व्यक्तिगत” म्हणून गेलेले अन्यायी कायदे बदलण्याची प्रेरणा ही देखील त्यातून आली आहे. स्त्रियांना समान नागरी अधिकार अजूनही मिळालेले नाहीत, अशा वेळी डॉ. आंबेडकरांची प्रेरणा या लढ्यांना बळ देत राहील.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
मानवमुक्तीचा मंत्र
अर्थात डॉ. आंबेडकराचे कार्य केवळ स्त्रियांपुरते सीमित नाहीच. समाजातील सर्व शोषित व अन्यायग्रस्त लोक हे त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होते. म्हणूनच तर जर समाजात सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित झाली नाही तर विषमतेमध्ये खितपत पडणा-या लोकांच्या असंतोषाचा क्षोभ उसळून राजकीय लोकशाहीचा हा डोलारा केव्हाही कोसळून पडू शकतो, हा त्यांनी दिलेला इशारा किती खरा आहे हे आपल्या सद्य परिस्थितीवरून लक्षात येऊ शकते.
त्यांनी दिलेल्या घटनेच्या गळ्यालाच नख लावण्याचे नवे कारस्थान २०१४ साली या देशात सुरू झाले आहे. नागरीक म्हणून दिलेले जनसामान्यांचे अधिकार त्यांच्या हातून हिरावून घेऊन त्यांना छळछावण्यांमध्ये टाकण्याची योजना कार्यान्वित करण्याचेही कारस्थान सुरू आहे. अशा वेळी डॉ. आंबेडकरांना केवळ जातीत बंदिस्त करण्याचे षडयंत्र ओळखले पाहिजे. दलित जातींबरोबरच भटके विमुक्त, अन्य अल्पसंख्य, छोटे-मध्यम शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्ग, स्त्रिया या सर्वांप्रति असलेली त्यांची निष्ठा समजून घेऊन त्यांचा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांवर आधारलेला घटनाधिष्ठित समाज निर्माण करण्याचे कंकण हाती बांधून आपण यापुढची वाटचाल केली पाहिजे.
_________________________________________________________________________________________________________
डॉ. माया पंडित
सदस्य, जीवनमार्ग संपादक मंडळ

No comments:
Post a Comment