जीवनमार्ग बुलेटिन: ७
मंगळवार, ७ एप्रिल २०२०
तपासणी करा, तपासणी करा, तपासणी करा!
हा आहे जागतिक आरोग्य संघटनेचे सरसंचालक टेड्रोस अधानोम यांनी कोव्हिड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी जगाला दिलेला सल्ला. या क्षणाला भारतात या विषाणूने ग्रासलेल्या ४२८१ व्यक्ती असून त्याने १११ जण मरण पावले आहेत. महाराष्ट्रात ८६८ रुग्ण असून ५२ जणांना मृत्यू आला आहे.
संपूर्ण देशात सुरुवातीला कोव्हिड-१९ ची तपासणी करणारी ६२ केंद्रे होती. ती सर्व सरकारी होती. ती खूप अपुरी असल्याने खासगी तपासणी केंद्रांना परवानगी दिल्याने त्यांची संख्या आता १२६ झाली आहे. या केंद्रांतून दररोज किती जणांचे तपासणी अहवाल प्राप्त होणार याची निश्चित माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. कोव्हिड-१९ चा प्रसार द. कोरियाने प्रभावीपणे रोखला. त्यामागे भरपूर तपासणी हे महत्त्वाचे कारण होते. त्या देशाने १७० व्यक्तींमागे एका व्यक्तीची तपासणी केली होती. भारताने किमान २०० लोकांमागे एकाची तपासणी केल्यास त्याला किमान ६५ लाख लोकांची तपासणी करावी लागेल. मागच्या आठवड्यात भारत सरकारने आठवड्याला ६०,००० तपासण्या करणार असल्याचे जाहीर केले होते. आज साधारणतः दरदिवशी १०,००० च्या आसपास तपासण्या होत आहेत. या गतीने देशाच्या लोकसंख्येची तपासणी करण्यास किमान दोन वर्षे लागतील! तोपर्यंत टाळ्या-थाळ्यांच्या आवाजाने आणि दिव्यांच्या प्रकाशाने कोरोनासुर पळून जाऊन वुहानमध्ये दडून बसेल, याची भक्तांनी तजवीज करून ठेवली आहे. खोटे नाही, आता काही घरांतून सकाळच्या आरतीत ‘कोरोना गो’ असा रामदास आठवले स्टाईल मंत्रोच्चार होऊदेखील लागला आहे!
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
२४ मार्चपर्यंत केरळने ४५१६ जणांची तपासणी केली होती, तर महाराष्ट्राने फक्त २१४४ जणांची. रुग्णांचा आकडा होता अनुक्रमे १०९ आणि १०१. महाराष्ट्र अगदीच राज्यात केवळ एकच तपास प्रयोगशाळा असलेल्या बिहारच्या पंक्तीत नसला तरी तो केरळच्या पासंगालाही पुरत नाही, हे वास्तव आहे. मराठी जनतेच्या भल्यासाठी महाराष्ट्र सरकारने याबाबतीत पावले उचलायला हवीत. आपण काय उपाय करत आहोत, याची खरी माहिती जनतेला दिली पाहिजे. अज्ञानाचा अंधार करून नव्हे तर तिच्या डोक्यात ज्ञानाचा उजेड करूनच या दुर्धर रोगराईवर मात करता येईल.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
या रोगराईने आज जवळजवळ सर्व जगाला विळखा घातला आहे. त्याचे काही हॉटस्पॉट जगभरात तयार झाले आहेत. भारतात ६२ जिल्ह्यात असे हॉटस्पॉट बनले असल्याचे वृत्त ६ एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. याचा अर्थ इतके अणुबॉंब देशात टिकटिकत आहेत. त्यांना तेथेच निकामी केले नाही, तर त्याचा भडका किती प्रदेशाचा आणि किती लोकांचा घास घेईल, याची कल्पनाही करवत नाही. सहा आठवड्यांपूर्वी वुहान होता आणि चार आठवड्यांपूर्वी इटली होता, त्या अवस्थेला आज अमेरिका आहे. अमेरिकेच्या मागे आपण तीन आठवडे आहोत.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
जगभराची कोव्हिड-१९ प्रसाराची आकडेवारी काय सांगते? लागण झालेल्यांची संख्या १०० झाली की, ती ३ - ५ दिवसांत दुप्पट होऊ लागते. याचा अर्थ, त्याची वाढ गणिती पद्धतीने होऊ लागते. आजचा ४०००च्या आसपासचा आकडा एका आठवड्यात पाच पट होऊन ती संख्या १५,००० होऊ शकेल आणि पुढच्या दोन आठवड्यात ५०,००० सहज पार करील.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
इतक्या गंभीर परिस्थितीत लॉकडाऊनला पर्याय नाही, हे खरेच. पण तयारी न करता केलेल्या घोषणेचे जनतेला काय परिणाम भोगावे लागतात, हे नोटाबंदीच्या बाबतीत आपण पाहिले आहे. एक दिवसाचा जनता कर्फ्यू करताना मोदींनी जनतेला पुढील सावल्यांसाठी तयार राहण्याचे सूतोवाच केले होते. पण त्यासाठी शासकीय यंत्रणा तयार केली नाही. लॉकडाऊनच्या काळात जनतेची चिंता वाहायची जबाबदारी येते, त्या राज्यांना अंधारात ठेवूनच पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा दिवा लावला. चार तासात सारा देश ठप्प झाल्याने १०० कोटी सर्वसामान्य जनतेचे काय होईल, याची बिलकुल पर्वा त्या घोषणेत नव्हती. नगरांच्या आणि महानगरांच्या खुराड्यात स्थलांतरित मजूर कोट्यवधींनी राहतात याची या भाडवलदारांच्या लाडक्या सरकारला वार्ताच नाही. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर जाता येत नाही, आणि घरात बसून पोट भरत नाही अशी त्यांची अवस्था होणार, हे समजायला सरसंघचालकांच्या आदेशाची वाट पाहायची गरज नसते. उपासमार नाहीतर २०० कोस पायपीट एवढेच दोन पर्याय मोदी सरकारने त्यांच्यापुढे ठेवले. पैर शाबीत तो पेट पचास, म्हणत ते पोराबाळागाठोड्यांसकट निघाले घरवापसीला.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
या रोगराईच्या काळात सर्व जनतेला घरी बसवण्यासाठी केलेल्या योग्य घोषणेच्या चुकीच्या अंमलबजावणीने काय झाले? कोट्यवधी लोक घराबाहेर पडले. त्यातील किती जणांना लागण झाली आहे, याची कुणालाही कल्पना नाही. रस्त्याने जाताना ते एकमेकांच्या संपर्कात येणार. वेगवेगळ्या गावातील लोकांच्या संपर्कात येणार. त्यातून नवेच हॉटस्पॉट निर्माण होणार. आणि हे हॉटस्पॉट मोबाईल असल्याने जास्तच कहर करणार. हे लोक आपापल्या गावी पोहोचल्यावर त्याच गावातील लोक त्यांना अस्पृश्यासारखे वागवू लागले आहेत. गावातल्या गरीब नातवाईकांना हे वाटकेरी का आले असे वाटणे साहजिक आहे. शिवरात्रीच्या घरी एकादस. पण महत्त्वाचे म्हणजे प्रवासात, घरी गेल्यावर त्यांचा संसर्ग कुणाला झाला आहे, हे कसे शोधून काढणार?
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
या महास्थलांतराचे काय परिणाम झाले असतील, हे समजायला अजून ४ ते ६ आठवडे लागतील, असे अभ्यासक सांगतात. त्यांना या अवस्थेत ढकलल्याबद्दल आज तरी पंतप्रधानांनी शब्दांच्या बुडबुड्याऐवजी त्यांच्या हाती काहीही ठेवलेलं नाही. वादळात सापडलेल्या गोरगरिबांना मात्र त्यांनी आठवणीनं त्यांना मदत न केलेल्या सर्वांबद्दल दिवा लावायला सांगितलं आहे. इतकेच नव्हे, तर रस्त्याने जाणारे कायदा मोडत असल्याबद्दल त्यांच्यावर राज्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करून कारवाई करण्याचे फर्मानही सोडले आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
येत्या दीडदोन महिन्यात या रोगराईवर काबू मिळवायचा झाल्यास मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यास काहीच पर्याय नाही. त्याशिवाय, या रोगाचा मुकाबला करायचा झाल्यास नेमकी परिस्थिती काय आहे, याचा अंदाज कसा येणार? जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस अधानोम म्हणाले ते आपल्या सरकारने नीट ऐकले पाहिजे: “डोळ्याला पट्टी बांधून आग विझवता येत नसते.” हा इशारा देत असताना ते व्यापक तपासणीचे महत्त्व जगाला पटवून देत होते. पण आपण विश्वगुरू असल्याचा साक्षात्कार झालेल्या भारत सरकारला असल्या सल्ल्याची तमा ती काय? अधोनाम म्हणाले आहेत, “कुणाला लागण झाली आहे, हे समजले नाही तर आपण ही रोगराई काबूत आणू शकणार नाही. सर्व देशांना आमचा एकमेव सल्ला आहे: तपासणी करा, तपासणी करा, तपासणी करा !”
पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार ३० मार्चपर्यंत आपण देशभरात केवळ ४७,९५१ जणांची तपासणी केली होती. दक्षिण कोरियाने २१ फेब्रुवारी ते १४ मार्च या तीन आठवड्यात अडीच लाख लोकांची तपासणी केली होती. आपली लोकसंख्या त्या देशाच्या पंवचीस पट आहे, यावरून आपण या बाबतीत किती लंगडत आहोत, हे स्पष्ट होते. आज कोव्हिड-१९ चा प्रसार नेमका कोणत्या अवस्थेत आहे, हे कळणे अवघड झाले आहे. प्रथम आयात रुग्ण, नंतर स्थानिक लागण आणि नंतर सामाजिक लागण अशा त्याच्या प्रसाराच्या अवस्था असतात. आपण स्थानिक अवस्थेतून सामाजिक लागण झाल्याच्या अवस्थेत प्रवेश केला आहे की नाही, हे कसे कळायचे?
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
मेडिकल संशोधन कौन्सिल आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘मर्यादित सामाजिक संसर्ग’ अशी शब्दयोजना शोधून काढली आहे. मेडिकल कौन्सिलच्या नियमावलीनुसार फक्त मर्यादित तपासणीच शक्य आहे. त्यामुळे त्यानुसार व्यापक तपासणी अशक्यच दिसते. आता लॉकडाऊन आहे, याचा अर्थ आपण सामाजिक संसर्गाच्या उंबरठ्यावर तरी निश्चितच आहोत. याच्यापुढील टप्प्यावर व्यापक तपासणी करून संसर्ग झालेल्या रुग्णांचे कडक विलगीकरण करावे लागेल; गंभीर रुग्णांसाठी अस्तित्वातील इस्पितळे तयार ठेवून कमी गंभीर रुग्णांसाठी तात्पुरती इस्पितळे उभी करावी लागतील.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
रुग्णांची शुशृषा करणाऱ्या सेवकवर्गासाठी एन ९५ हे मास्क, हातमोजे, संपूर्ण शरीर झाकणारे पेहराव, मुखवटे आदींची सोय करण्याची तयारी सरकारने केली आहे काय? वुहानमधील या साथीच्या पहिल्या टप्प्यातच ३,००० मेडिकल सेवकांना लागण झाली होती. त्यानंतरच्या टप्प्यात वुहानमधील वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बाहेरच्या प्रांतांमधून ४२,००० वैद्यकीय सेवकांची फौज तैनात करण्यात आली. चीनने केलेल्या तयारीमुळे या ४२,००० मधील एकालाही लागण झाली नाही! त्या सर्व सेवकांना संरक्षक साधने पुरवण्यात आली होती. त्या साधनांच्या अभावी मुंबईचं एक मोठं हॉस्पिटल आजच सील करायची पाळी आली आहे. पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी आणि अब्दालीने किती लाखांची फौज तैनात केली याच्या रसभरीत फुकाच्या गप्पा मारण्यापेक्षा चीनने केले ते करायला पाहिजे. काय लावायचे तितके दिवे लावा, पण वैद्यकीय सैनिकांना संरक्षणात्मक साधने देणार की नाही? कट्टर शत्रू असलेल्या अमेरिकेने मागणी केल्यावर चीनने २२ विमाने भरून अत्यावश्यक औषधे पुरवली. आजच बातमी आहे की चीनने भारताच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी १,७०,००० पी.पी.ई. किट्स देणगी म्हणून दिले आहेत. तरीही भाजपचे म्होरके अजूनही चीनच्या नावाने शिमगा का करत आहेत?
डॉ. उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग
________________________________________________________________________________________________________

No comments:
Post a Comment