Wednesday 2 September 2020

४१ - राजकीय समुदाय म्हणून दलितांची ओळख कोणती?

 

जीवनमार्ग बुलेटिन: ४१
सोमवार, ११ मे २०२०
सर्वप्रथम 'जीवनमार्ग' चे संस्थापक- संपादक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ सहकारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य कॉ. रामचंद्र बाबाजी तथा आर. बी. मोरे यांना त्यांच्या स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन करून आजचे बुलेटिन सादर आहे.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

राजकीय समुदाय म्हणून दलितांची ओळख कोणती?

‘दलित’, ‘एस्.सी.’, ‘बौध्द’ की अन्य काही?
- दत्ता देसाई
भाग – २
महाराष्ट्रात एका टप्प्यावर, खास करून १९७०-८० च्या दशकांमध्ये अधिक व्यापक भूमिका घेण्याची गरज जाणवू लागली. ती केवळ संसदीय वा अस्मितावादी राजकारणाची नव्हे, तर परिवर्तनवादी चळवळीची आणि राजकारणाची गरज होती. दलित पॅन्थर, मागोवा, युक्रांद, प्रतिशब्द, विषमता निर्मूलन शिबीर अशा चळवळींनी, तसेच अनेक विचारवंतानी ‘दलित-श्रमिक एकजुटी’ची मागणी करण्यामागे हे एक कारण होते. सर्वांना हे जाणवत होते की ‘दलित’ आणि ‘श्रमिक’ यांना आपापल्या मर्यादांमधून बाहेर काढले पाहिजे. यात पुन्हा दोन बाजूंनी बदल गरजेचा होता. एकीकडे दलित असलेले श्रमिक आणि श्रमिकेतर म्हणजे अगदी छोटासा नवमध्यम वर्गीय विभागातील दलित यांच्यात ‘वर्गीय’ आशयाविषयी जाणीव विकसित होण्याचा मुद्दा होता.
तर दुसरीकडे, दलितेतर श्रमिक आणि श्रमिकेतर सवर्ण जनसामान्य यांनी ‘जातीय’ आशयाचे भान विकसित करण्याचा मुद्दा होता. तसेच या सर्व विभागांनी हा नवा ‘सामाजिक’ आशय घेऊन नवीन ‘राजकीय’ जाणीव आणि ‘ओळख’ प्रस्थापित करणे आवश्यक होते. पण १९८०-९० च्या दशकापासून नवउदारमतवादी पर्वात हे सामाजिक आशयाचे मुद्दे मागे पडू लागले. कथित ‘मुक्त बाजार’स्पर्धेला सोयीस्कर असे अस्मितावादी [identity politics] व लोकानुरंजनवादी [populist] राजकारण अधिक प्रभावी बनले. यात ‘जात’ ही वर्गकोटी सर्वसाधारणपणे, आणि ‘दलित’, ‘बहुजन’ या वर्गकोटी त्यांच्यातील एका विभागाच्या संधीसाधू राजकारणामुळे, ‘जैसे-थे’वादी बनू लागल्या.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘अस्मिते’चा पेच आणि परिवर्तन
यातील परिवर्तनवादी आशय पुन:स्थापित करणे आवश्यक होते. त्यासाठी आपल्या येथे सर्वच अंगांनी वेगाने होणारे बदल लक्षात घेऊन नवे राजकारण ऐरणीवर आणायला हवे होते. त्यासाठी काही गोष्टी गरजेच्या होत्या : एकतर दलितांसह सर्व जातींची राजकीय अर्थव्यवस्था समजून घेणे; दुसरे, दलित-दलितेतर प्राथमिक उत्पादक व संघटीत-असंघटीत श्रमिकांबाबतचे विशेषत: स्त्रियांबाबतचे बदललेले वर्गीय-जातीय आणि सामाजिक-सांस्कृतिक वास्तव नेमके जाणून घेणे; आणि तिसरे, डाव्या-दलित-आंबेडकरवादी प्रवाहांनी वैचारिक पुनर्मांडणी करणे. अर्थातच या तीनही गोष्टी केवळ अकादामिक-वैचारिक नव्हे तर त्यासह प्रत्यक्ष व्यवहार आणि चळवळी यांच्या क्रमात होणे गरजेचे होते. या काळात घडलेले काही तात्त्विक-वैचारिक वाद आणि काही चळवळींचे प्रयत्न वगळता यात पुढे जाऊन भरीव असे काही झाले नाही. उलट, ही गुंतागुंत आणि तिच्या राजकारणाचे आव्हान पेलण्याऐवजी उत्तरोत्तर सोपे, सरधोपट आणि सोयीस्कर मार्ग स्वीकारले गेले.

परिणामी एकांगी अस्मितावादी वा चाकोरीबध्द आणि संसदीय व उदारमतवादी राजकारणाचा प्रभावच वाढला. हे केवळ ‘दलित’ राजकारणात नव्हे तर सर्व डाव्या-परिवर्तनवादी राजकारणात घडले. ‘दलित-बहुजन’ हा प्रयत्नही याचाच भाग राहिला. तो मुख्यत: संसदीय राजकीय बेरीज वा फारतर गठबंधन वा देवघेव अशा स्वरूपाचा राहिला. त्यात ना सामाजिक-वर्गीय, मुख्य म्हणजे परिवर्तनवादी आशय स्पष्टपणे मांडला गेला, ना एक प्रक्रिया ‌म्हणून तो पध्दतशीरपणे विकसित केला गेला. ‘ओळखी’विषयीची आजची द्विधावस्था ही याचीच परिणती आहे. या द्विधावास्थेचे रुपांतर ‘नवनिर्मितीक्षम [creative] ताणा’त करायचे असेल तर वर उल्लेखिलेल्या सामाजिक आशयाच्या मुद्द्याला भिडावेच लागेल. अन्यथा हेतू चांगले असूनही वेळ मारून नेणाऱ्या उत्तरांवर समाधान मानावे लागेल. आणि अंतत: हाती काहीच लागणार नाही.
या पार्श्वभूमीवर ‘ओळखी’ची चर्चा करताना इतरही काही पर्यायी संज्ञांची चर्चा केली जात आहे. त्यातील काहींचा थोडा विचार इथे उपयुक्त ठरेल. यातील अनेक पर्यायी संज्ञांमध्ये निश्चितपणे अर्थ आहे. पण तो कोणत्या पातळीवर आणि कोणत्या कार्यासाठी असतो हे पाहिले पाहिजे. उदा., ‘आंबेडकरी’, ‘विवेकवादी’, ‘समतावादी’ या संज्ञा विशिष्ट चळवळीच्या किंवा विचारप्रवाहाच्या ओळखी बनतात. ‘रिपब्लिकन’ ही मुख्यत: राजकीय पक्ष/संघटन या अंगाने ओळख बनते.
तसेच इतर काही संज्ञा/ ओळखींबद्दलही म्हणता येईल. उदा., मूलनिवासी. गेल्या काही वर्षांतील डीएनए नकाशे आणि जैव-विज्ञानाने हे अगदी स्पष्ट केले आहे की एकंदर जगात आणि भारतात ‘मूलनिवासी’ असे काही प्रकरण नाही. आपल्या येथे गेल्या काही हजारो वर्षात झालेली आगमने, स्थित्यंतरे आणि सरमिसळ ही अफाट आहे. विविध जमाती, वर्ण-जातीव्यवस्था, भाषा, रंगभेद, संस्कृती हे मूलत: मानव व समाज निर्मित आहे. त्यांचे प्रदेश आणि डीएनए यांच्याशी काहीएक ढोबळ [pattern वजा] आणि ओझरते संबंध दाखवता येतात. मात्र ते फारतर अनुषंगिक असू शकतात, नियतक [determining] नाही. डीएनएचा वापर यांत्रिकपणे अथवा मूलघटकवादी [reductionist] पध्दतीने मूलनिवासी वगैरे ठरवण्यासाठी करणे व ठरवणे हे अत्यंत अशास्त्रीय तर आहेच पण ते ब्राह्मण्यवाद आणि ‘सुप्रजनन’शास्त्रवाद [Eugenics] यांची घातक दृष्टी उलट्या बाजूने अंगिकारणे आहे. ही एक संकुचितता वाढवणारी, अपवर्जन [exclusion] करणारी आणि देशातील मोठ्या जनविभागांना दूर लोटणारी संज्ञा ठरू शकते. पुढे जाऊन कदाचित ही संज्ञा काही विभागांकडून जाणीवपूर्वक तिरस्कार आणि द्वेष पसरवण्यासाठीही वापरली जाऊ शकते. हे नकळतपणे इथल्या वर्णजातवादी जाणीवांना बळकटच करेल, हा धोका लक्षात घेतला पाहिजे.

थोडक्यात, आपली संज्ञा वा ‘ओळख’ ही संकुचित नसावी, ती व्यापक असावी तसेच ती शास्त्रीय असावी, किमान त्याला छेद देणारी वा अशास्त्रीय व दुरावा वाढवणारी नसावी. त्या विशिष्ट विभागाला न्याय देत असतानाच ती व्यापक परिवर्तनाला आणि मानवमुक्तीला पुढे नेणारी असावी याचे भान ठेवले जाणे गरजेचे आहे. तसेच वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय कार्यासाठी वेगवेगळ्या ‘ओळखी’ असू शकतात. व्यक्ती वा जनसमूह हे ‘बहु-ओळखी’सह [multi-identity] जगत असतात. अशा भाषिक-सांस्कृतिक-धार्मिक अस्मिता यांना एका अर्थी राजकीय आयाम असतो, पण त्या आपापत: अव्वल [per se] राजकीय असण्याची गरज नसते. तशा त्या जेव्हा बनतात आणि बनवल्या जातात तेव्हा काय घडते हे आपण आपल्या देशात आणि जगात गेली ३-४ दशके अनुभवत आहोत आणि त्यांची भरपूर चर्चा सतत होत आली आहे. त्यामुळे इथे तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा करण्याचे कारण नाही.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

बौद्ध धर्म आणि बाबासाहेबांचा धम्म
या संदर्भात ‘बौध्द’ संज्ञेचा विचार करावा लागेल. ही संज्ञा सांस्कृतिक अंगाने अधिक योग्य ठरेल का आणि ‘राजकीय ओळख’ म्हणून गोंधळ करेल का यांचा विचार आवश्यक आहे. कारण ‘बौध्द’ हे मूलतः एक तत्त्वज्ञान, एक जीवनदर्शन म्हणून अस्तित्वात आले आणि ते तशाच स्वरूपात अधिक प्रभावी आहे. बाबासाहेबांनी त्याचा ‘धम्म म्हणजे नीती’ म्हणजे खरेतर नव-बौध्दवादाचा केलेला पुरस्कार हा काहीएक प्रगती आणि समता याकडे नेणारा होता. मात्र याचा धर्म म्हणून जेव्हा विचार होतो तेव्हा तो विसंगती घेऊन येतो. बुध्द काळापासून पुढची सुमारे हजार वर्षे वैदिक-ब्राह्मणी धर्म आणि श्रमण-संस्कृती [जैन, बौध्द, आदी] यात संघर्ष दिसतो. पण उत्तरोत्तर वैदिक-ब्राह्मणी धर्म /वर्णाश्रम धर्म प्रभावी होत जातो. तो आणि वर्ण-जाति व्यवस्था बौध्दधर्म/संस्कृतीचे दमन करते हे खरेच.
मात्र बौध्द तत्त्वज्ञान या काळात ‘आध्यात्मिक-शून्यवादी’ होत जाते, ज्याचा फायदा शंकराचार्य [‘प्रच्छन्न बौध्द’] घेतात. हे का व कसे घडते? मध्ययुगात हे घडते तेव्हा बौध्द ‘धर्म’/तत्त्वज्ञान क्रांतिकारक उरलेले असते का? बौध्द परंपरा निस्तेज होण्याच्या या काळात श्रमण परंपरेपासून आणि मग सूफी परंपरेपासून प्रेरणा घेत पुढे दक्षिणेत भक्ती, लिंगायत, इ आणि मग उत्तरेत नानक-कबीर, भक्ती, आदी परंपरा या जनसामान्यांच्या वतीने ‘खालून’ उभ्या का राहातात? मध्ययुगापासून टिकून राहिलेला बौध्द ‘धर्म’, आधुनिक भारतात याच बौध्द ‘धर्मा’च्या नावाने बाबासाहेबांना विरोध करणारे आणि अलीकडचे काही कर्मकांडी प्रवाह हे बौध्द विचारसरणीला पारंपरिक धर्माचे स्वरूप देणारे राहत आले आहेत. यातून येणारी संकुचितता आणि अन्य काही देशातील कट्टरतावाद [उदा., म्यानमार, श्रीलंका] पाहता ही ओळख वा अस्मिता राजकीय बनवण्यामध्ये धोके नक्कीच दडलेले आहेत. कदाचित हे राजकारण अन्य धर्मातील जमातवादी/धर्मांध राजकारण्यांच्या फायद्याचे ठरू शकेल!
मुळात धर्म, वर्ण, जात, या वर्गकोटी/अस्मितांमध्ये फक्त स्थिर वा कायमस्वरूपी आशयच दडलेला असतो असे नाही. तर सामाजिक संबंध आणि संरचना यातील बदलांप्रमाणे त्यांचा आशय आणि त्यांचे ‘राजकारण’ बदलत असते. उदा., प्राचीन काळी बौध्द तत्वज्ञान हे एकीकडे सर्वात प्रगत विचार होते, पण एक सामाजिक घटीत म्हणून त्याचे स्वरूप अंतर्विरोधी होते. तो जनसामान्यांमध्ये पकड घेत असतानाच विस्तारू लागलेल्या जातिव्यवस्थेशी आणि तत्कालीन राज्यकर्त्या वर्गाशी [राजे-सम्राट, गृहपती-श्रेष्ठी-व्यापारी, इ] असलेले त्याचे नाते बळकट होत गेले हे विसरता येत नाही. बौध्द तत्वज्ञान/धर्म असो वा वर्ण-जाति व्यवस्था, त्यांचे स्वरूप हे गेल्या अडीच हजार वर्षात आणि खास करून वासाहतिक काळात तसेच आधुनिक भांडवली समाजात त्यांच्यात मूलभूत बदल होत गेले आहेत.
याउलट बाबासाहेबांनी पुरस्कारलेला बौध्द धर्म/धम्म हा इथल्या सर्वाधिक दडपलेल्या व शोषित जनविभागांचा होता. एका पातळीवर आजही बौध्द विचार हा अन्य सर्व धर्मांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचा नक्कीच आहे. पण यात झालेले ऐतिहासिक-सामाजिक बदल आणि त्याचे आत्ताच्या वर्गीय-जातीय-सामाजिक वास्तवाशी असलेले नाते लक्षात न घेता याचा विचार करणे योग्य नाही. उदा., बौध्द विचाराला अन्य धर्मांच्या साच्यात व ‘धार्मिक’ स्पर्धेत आणण्यामागे खुद्द एका छोट्या दलित मध्यमवर्गाची मानसिक-सामाजिक गरज आणि हितसंबंध आहेत. त्यामुळे या संज्ञांची/वर्गकोटींची आज अमूर्त चर्चा करणे हे वास्तवापासून तुटलेले आणि शाब्दिक मंथन ठरते. त्यावर आधारलेले राजकारण हे प्रस्थापित वर्चस्ववादी शक्तींच्या हातातले खेळणे ठरू शकते.
__________________________________________________________________________________________________________
(क्रमश:)

No comments:

Post a Comment