Friday 4 September 2020

५० - २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये श्रमिकांना मात्र धत्तुरा . . .


जीवनमार्ग बुलेटिन: ५०

बुधवार, २० मे २०२०

२० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये श्रमिकांना मात्र धत्तुरा . . .

१२ मार्च रोजी पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी व आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. तसेच, हा निधी राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या १० टक्के असल्याचे जाहीर करून एकविसावे शतक भारताचे असेल, अशी गर्जनाही केली.
गरजणारे पंतप्रधान म्हणून मोदींची ख्याती जगभर आहे. त्यांच्या भाषणात आकर्षक घोषणा असणारच! मायावी भाषणांनी जनतेला भ्रमित करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे असेच म्हणावे लागेल. २०१४ च्या लोकसभेच्या प्रचाराच्या सभा आठवा आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतरची भाषणेही ... घोषणांचा मुसळधार पाऊस व त्यामध्ये ओलेचिंब होणारी सामान्य जनता. हे आता नित्यनेमाचे झाले आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा १२ मे रोजी आपल्या अनुभवास आला. मोदींचे भाषण संपले आणि बाकी तपशील जाहीर करण्याची जबाबदारी त्यांनी अर्थमंत्री निर्मलाताईवर टाकली. ते स्वतः मोकळे झाले, नव्या घोषणांचा शोध घेण्यासाठी….
अर्थमंत्री सीतारामन यांनी अनेक टप्प्यांमध्ये २० लाख कोटींचा तपशील जनतेसमोर मांडला. खरंतर, ही एक पब्लिक रिलेशन्स एक्झरसाइज होती असेच म्हणावे लागेल. त्यांनी तपशील जाहीर करायचा, वर्तमान आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो स्वप्नवत लोकांसमोर सादर करायचा. कोरोनात आलेल्या अपयशाने काळवंडलेली मोदी साहेबांची प्रतिमा उजळ करण्याचाच उपक्रम जणू पाच दिवस चालू होता…
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाही या पॅकेजमध्ये घुसडवली . . .
ही अगदी ताजी योजना असल्याचा आव आणला तरी या अगोदरच जाहीर केलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाही त्यात ताईंकरवी मोदींनी घुसडवली आहे. त्या आधीच जाहीर केलेल्या योजनेचे १.७० लाख कोटी रुपये या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये धरण्यात आले आहेत. या योजनेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा, ८० कोटी गरिबांसाठी ५ किलो गहू किंवा तांदूळ व प्रत्येक कुटुंबाला एक किलो डाळ, २० कोटी महिलांच्या जनधन खात्यावर ५०० रुपये दरमहा प्रमाणे तीन महिने आर्थिक मदत, ८ कोटी गरीब कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस सिलेंडर , गरीब ज्येष्ठ नागरिक , विधवा व अपंगांसाठी १००० रुपये प्रमाणे मदत, १५,००० कोटी रुपये कोविड विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तातडीचे आर्थिक सहाय्य, एप्रिलमध्ये देय असलेले ८.७ कोटी शेतकऱ्यांना २००० रुपये प्रमाणे आर्थिक मदत इ. योजना जाहीर केल्या होत्या. हा आकडा मोठा दिसत असला तरी यातील बहुतेक तरतुदी २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पात केलेल्याच आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पा व्यतिरिक्त फक्त ७०,००० कोटी रुपयांचाच खर्च सरकारला उचलावा लागणार आहे. फक्त पॅकेजचा आकडा फुग्विण्यासाठी याचा पुन्हा पुन्हा पुनरुचार करण्यात आला, एवढेच.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
थेट मदत. . . अगदीच तुटपुंजी
अर्थमंत्र्यांनी जनतेसाठी थेट मदत करण्याबद्दल ज्या घोषणा केल्या त्यामध्ये त्यांनी मागील काळामध्ये केलेल्या कामाचा पुनरुच्चार केलाच, परंतु त्याचबरोबर लॉकडाऊन काळामध्ये देशांमध्ये कोट्यावधी स्थलांतरित मजूर देशाच्या विविध कानाकोपरा मध्ये आणि शहरांमध्ये अडकले होते, त्यांची उपासमार होत होती, त्यांच्यासाठी तीन वेळचे जेवण दिल्याचे सांगत त्यासाठी ११,००० कोटी रुपये खर्च केल्याचा हिशोब प्रसारमाध्यमांसमोर मांडला.रेशन कार्डधारकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ व दोन किलो दाळ देण्यासाठी ३,५०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना पूर्वीच जाहीर झालेल्या योजनेचे २,००० रुपये प्रमाणे १७ हजार कोटी रुपये दिल्याचे पुन्हा त्यांनी सांगितले. हे तर शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये देयच होते. जनधन खात्यावर ५०० रुपये प्रमाणे मदत दिल्याचे सांगायला त्या विसरल्या नाहीत. मध्यमवर्गीयांच्या घर कर्जावर सबसिडी म्हणून ७०,००० कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. रस्त्यावर धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी ५००० कोटी रुपयांची तरतूद करून त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी दहा हजार रुपये पर्यंतचे भांडवल देण्याचे त्यांनी जाहीर केले. ५०,००० रुपयांपर्यंतच्या मुद्रा लोन वरील व्याजावर सूट देण्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्या म्हणाल्या. आदिवासीसाठी रोजगार निर्माण करण्याकरिता कॅम्पा फंडाचे सहा हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अर्थात हा फंड अगोदरचाच आहे. आता हा संपूर्ण हिशोब केला तरी १.९४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होत नाहीये. फार तर २ लाख कोटी रुपये होईल.
पंतप्रधानांनी जाहीर केले होते २० लाख कोटी रुपये; प्रत्यक्षामध्ये १३० कोटी जनतेसाठी मात्र सरकार खर्च करीत आहे फक्त २ लाख कोटी रुपये…. करोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सरकारने तातडीने दरडोई १५,४०० रुपये खर्च करायला पाहिजेत. प्रत्यक्षात किती करत आहे? १५३८ रुपये . . . किती हा भंपकपणा अन खोटारडेपणा ... ”खोट बोल पण रेटून बोल आणि पुन्हा पुन्हा तेच बोल” या पद्धतीने मोदी सरकार सातत्याने जनतेची दिशाभूल करीत आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
जुन्याच घोषणाच्या शिळ्या कढीला ऊत . . .
अर्थमंत्र्यांनी बँक आणि वित्त संस्थांसाठी खूप मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये फेब्रुवारीपासून रिझर्व बँकेने घेतलेल्या निर्णयांचा बेमालूमपणे समावेश केला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये रिझर्व बँकेमार्फत अर्थव्यवहारात सोडलेली रोकड २.८७ लाख कोटी रुपये, याच पद्धतीने मार्च महिन्यामध्ये ३.७४ लाख कोटी रुपये रोकड सोडण्यात आली होती. व्याजदरांमध्ये कपात करून १.३७ लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. अडचणीत आलेल्या म्युचुअल फंडाला वाचवण्यासाठी ५०,००० कोटींची तरतूद यापूर्वीच करण्यात आलेली होती. यामुळे हे लाखो कोटी रुपये फक्त कर्ज वाटपासाठी आहेत. स्वतः सरकार त्यातली छदामही देणार नाही.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
रोजगार देणाऱ्या लघु उद्योगांची फक्त कर्जावरच बोळवण . . .
लघु व मध्यम उद्योगासाठी अनेक घोषणा केल्या. त्यात लघु व मध्यम उद्योगांसाठी ३ लाख कोटी रुपयांचे विनातारण कर्ज, लघु उद्योगाच्या विस्तारासाठी ५० हजार कोटी रुपये, अडचणीतील उद्योगासाठी २० हजार कोटी रुपये, असे एकूण ३.७० लाख कोटी रुपये तर कर्जाच्या स्वरूपातच आहेत.
२०० कोटी रुपयांपर्यंतची सरकारी टेंडर घेण्यास परकीय कंपन्यांना बंदी, लघु मध्यम उद्योगाच्या व्याख्येत बदल, याव्यतिरिक्त १०० पेक्षा कमी कामगार असलेल्या व १५,००० पेक्षा कमी वेतन असलेले ९० % कामगार असतील तर अशा आस्थापनांच्या पुढील तीन महिने प्रॉव्हिडंट फंड भरण्यासाठी २५०० कोटी रुपये तरतूद (यामुळे ३.६७ आस्थापनाना व त्यांच्या ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असा सरकारचा दावा आहे.) ५० हजार रुपये पर्यंतच्या मुद्रा लोन वरील व्याजावर सूट देण्यासाठी १५०० कोटी रुपये याप्रमाणे तरतूद केली आहे, तेवढाच काय तो लघुउद्योगांना दिलासा म्हणता येईल.
देशामध्ये सहा कोटी पेक्षा जास्त लघू आणि मध्यम उद्योग आहेत. पंतप्रधान यांनी घोषणा केलेले ३.७० लाख कोटी रुपये, तेही कर्जाच्या स्वरूपात, या उद्योगांना कसे जिवंत करणार आणि ते कसे धावणार हा खरा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष मंदीच्या तडाख्यात सापडलेले लघु आणि मध्यम उद्योग अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर होते, त्यात मोदी साहेबांच्या नोटाबंदीच्या दणक्याने आणि त्यानंतर जीएसटी हल्ल्याने ते बेजार झाले आणि आता कोरोना लॉकडाउनमुळे ते जवळपास भुईसपाट झालेले आहेत. अशा उद्योगांना फक्त कर्ज देऊन ते उभारी घेतील अशी अपेक्षा बाळगणे वास्तवाला धरून नाही.
लघु आणि मध्यम उद्योग, मोठे उद्योग बड्या कार्पोरेटसाठी काम करतात. बडे कार्पोरेट आणि मोठे उद्योग कामगारांप्रमाणेच लघु आणि मध्यम उद्योगांनाही वेठीला धरतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यांना कामाचे वेळेवर बिल न देणे, त्यांच्याकडून कमीत कमी किमतीमध्ये काम करून घेणे, आणि स्वतःच्या मोनोपॉलीच्या ताकतीवर लघु उद्योगांमध्ये आपसात स्पर्धा लावून स्वतः नफा ओरबाडणे हेच धोरण या मोठ्या उद्योगाचे राहिलेले आहे. त्यामुळे कर्जरुपी टॉनिकने ते बरे होतील अशी शक्यता नाही. या कोट्यावधी लघु आणि मध्यम उद्योगापैकी काही लाख उद्योग या संकटामध्ये बळी जाणार हे निश्चित आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीचे वेतन कुठलीही कपात न करता कायम, कंत्राटी कामगारांना दिले पाहिजे असा आदेश केला खरा; परंतु लघु आणि मध्यम उद्योगांना जगातील इतर देशाप्रमाणे कामगारांचे वेतन करण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगही संकटात आणि त्यांच्या कामगारांना वेतनही मिळाले नाही, ही परिस्थिती पहावयास मिळत आहे.
खरे तर मोदी साहेबांच्या आत्मनिर्भर च्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये कर्ज, कर्ज आणि कर्ज हाच प्रमुख फॅक्टर दिसून येतो. बँकांचा १२ लाख कोटी रुपयांचा एनपीए झालेला आहे. देशांमध्ये मंदीचं वातावरण प्रचंड आहे. कर्ज उचलण्यासाठी कोणी उद्योजक तयार नाहीयेत. व्यवसायाचा कोणी विस्तार करण्याचा विचार करत नाहीय. अशा वेळेला सात लाख कोटी रुपये बँकांनी वित्तपुरवठा साठी उपलब्ध करूनही जर कर्ज घेणारेच तयार नसतील तर यामुळे अर्थव्यवस्थेला गती कशी मिळणार या प्रश्नाचे उत्तर हे सरकारकडे नाही.
लोकांकडे पैसा नाहीये, त्यांची खरेदी शक्ती कमी कमी होत चालली आहे, शेतकरी कामगार या दोघांचे उत्पन्न सातत्याने घटत चाललेले आहे. अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठेतला माल घेणार कोण आणि बाजारपेठेतला माल उचलला गेला नाही तर उत्पादन तरी कसे केले जाईल? त्यामुळे बँक आणि पतसंस्था मार्फत लाखो कोटीच्या कर्जपुरवठ्याच्या घोषणा केल्या तरी त्यामुळे उद्योग विश्व भरारी घेईल, ही मोदी सरकारची फेकूबाजी आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष . . .
अर्थमंत्र्यांनी शेती व शेती विषयक उद्योगधंद्यासाठी मोठी तरतूद केल्याचे जाहीर केले. ग्रामीण कृषीआधारित पायाभूत सोयीसुविधा विकासासाठी १,००,००० कोटी रुपये, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेसाठी २० हजार कोटी रुपये, पशुधनाच्या १०० % लसीकरण साठी १३,३४७ कोटी रुपये, पशुपालन सुविधा विकासासाठी १५ हजार कोटी रुपये, वनौषधी लागवडीसाठी ४,००० कोटी रुपये, पुरवठा साखळी विकासासाठी पाचशे कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यातील अर्ध्या योजना फेब्रुवारी मध्येच मांडलेल्या होत्या व त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली होती, याचा केवळ पुनरुच्चार अर्थमंत्र्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डामार्फत कर्ज देण्यासाठी २.२५ लाख कोटी रुपये, शेती कर्जासाठी ८६,६०० कोटी रुपये व तातडीचे कर्ज देण्यासाठी नाबार्डला ३०,००० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत, ते या योजनांचा किती लाभ घेऊ शकतील हा खरा प्रश्न आहे. मुख्य बाब म्हणजे यात शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळण्याची कुठलीही योजना नाही.
आज लॉक डाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी झाली आहे,भाजीपाला फळे तयार होऊनही ते बाजारात आणू शकले नाहीत, त्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. अन्नधान्य आणि इतर वस्तू हमीभाव देऊन खरेदी करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची गरज होती, त्यावेळेला सरकारने काही केले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे. त्याबद्दल अर्थमंत्री काही बोललेल्या नाहीत. आताच्या शेतकऱ्यांसाठीच्या अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा भविष्यकाळासाठी आहेत, परंतु आज संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत हवी होती. त्याबद्दल अर्थमंत्र्यांनी कुठलेही पाऊल उचललेले दिसून येत नाही.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
शेतमजूर व स्थलांतरित कामगारांसाठी अपुरी तरतूद . . .
ग्रामीण भागात मजुरांना व आपल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांना काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद केलेले ६१ हजार कोटी व आता नव्याने जाहीर केलेले ४० हजार कोटी असे एकूण एक लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यातून ग्रामीण भागातील मजुरांना व शहरातून परतलेल्या स्थलांतरित मजुरांना पन्नास दिवसही काम देणे शक्य होणार नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. किमान दोनशे दिवस काम उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करायला हवी होती.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
ही तर फसवाफसवी . . .
विशेष म्हणजे पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम तर पॅकेज जाहीर होण्यापूर्वीच खर्च केलेली होती किंवा त्या रकमेचे खर्च करण्याची व्यवस्था अगोदरच लावण्यात आलेली आहे. एकंदरच ताळेबंद जर मांडला तर असे दिसून येते, की पन्नास दिवसानंतर जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेज पैकी अगोदर खर्च झालेले किंवा कसे खर्च करावयाचे आहे याबद्दल निर्णय घेतलेले व कर्ज रूपाने देण्यात येणारी एकूण रक्कम १७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मग प्रश्न पडतो की लॉकडाऊन काळात काम बंद, उत्पन्न बंद, वेतन बंद झालेल्या सामान्य कष्टकऱ्यांसाठी या पॅकेजमध्ये नेमके काय आहे? तर १३० कोटी लोकसंख्येच्या सुमारे अडीच ते तीन लाख कोटी रुपये हे थेट प्रत्यक्ष मदत देण्यासाठी तरतूद केलेली आहे. आणि ते आणि त्यांचे भाट त्याला छान पैकी पॅकेजिंग करून २० लाख कोटी रुपये असल्याचे पुन्हा पुन्हा सांगताहेत.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
संवेदना नसलेले सरकार . . .
मोदी सरकारला भारतीय जनतेची, विशेषतः गोरगरीब कष्टकऱ्यांची, स्थलांतरित मजुरांची, ग्रामीण मजुरांची, कारागिरांची, छोट्या व्यवसायिकांची थोडीफार चिंता असती तर त्यांनी नोटाबंदी प्रमाणे अचानक लॉकडाऊन जाहीर केला नसता. ३० जानेवारीला देशातला पहिला रुग्ण आढळून आला. जागतिक आरोग्य संघटनेने २५ जानेवारीला जागतिक आणीबाणी जाहीर केली. मात्र मोदी साहेब २२ मार्च पर्यंत ढिम्म होते. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक तज्ञांनी धोक्याचा इशारा दिलेला असूनही लॉक डाऊनचा निर्णय घेण्यासाठी मोदी साहेबांना २३ मार्च उजाडावा लागला. तोपर्यंत विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी हा विषाणू आपल्या देशांमध्ये आणलेला होता व देशभर तो पसरलेला होता.. आणि या यामुळे उशिराचे शहाणपण आल्यानंतर ही त्यांनी कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली नाही, जनतेला विश्वासात घेतले नाही, जनतेकडून सूचना मागविल्या नाहीत, पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयाप्रमाणे मोदी साहेब रात्री आठ वाजता अवतीर्ण झाले आणि चार तासाच्या अवधीनंतर रात्री १२ वाजता लॉक डाऊन लागू केला. यामुळे जनतेला प्रचंड हालआपेष्टांना सामोरे जावे लागले. त्यांची काहीच चूक नाही, त्यांना काम करायचे होते, त्यांना उदरनिर्वाहासाठी मेहनत करण्याची त्यांची तयारी होती ;परंतु आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांचे काम बंद केले, त्यांचे व्यवसाय बंद केले, अर्थव्यवस्था ठप्प केली, उत्पन्न बंद केले, लोकांना काम करता येत नव्हते, उपासमार होत होती, मजूर शेकडो किलोमीटर पायी चालत त्यांच्या राज्यात निघाले होते ,अपघातात अनेकांचा मृत्यू झाला मात्र मदत करण्याची बुद्धी आमच्या राज्यकर्त्यांनाझाली नाही. मोदी साहेबांनी जनतेला टाळ्या वाजवायला, थाळ्या वाजवायला लावले, दिवे लावायला लावले, परंतु स्वतः मात्र जनतेला मदत करण्याचा दिवा त्यांनी ५० दिवस लावला नाही.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
कामगार संघटना व विरोधी पक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष . . .
सर्व कामगार संघटना, विरोधी राजकीय पक्षांनी जनतेच्या हालअपेष्टा पाहून त्या दूर करण्यासाठी अनेक सूचना केंद्र सरकारला केल्या. कामगार संघटना संयुक्त कृती समितीने चार-पाच वेळा पंतप्रधानांना पत्र लिहून कामगारवर्गाच्या हाल-अपेष्टां कडे लक्ष वेधले. आयकर लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला 7500 रुपये रोख रक्कम द्यावी, सर्व गरजूंना पुरेसे रेशन द्यावे, फ्रंट लाईनवर काम करणा-यांसाठी सुरक्षा साधने व विमा काढण्यात यावा, प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी रेल्वेची मोफत सुविधा लवकरात लवकर करावी, अशा अनेक मागण्या केल्या. परंतु मोदी साहेबांना कामगार संघटनांशी चर्चा करायला वेळ भेटला नाही. त्यांनी कार्पोरेटशी चर्चा केल्या, मालकांच्या संघटनांशी चर्चा केल्या, पण संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगारांच्या संघटना प्रतिनिधींशी चर्चा करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. कामगार संघटनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना व सूचनांना मोदींनी केराची टोपली दाखवली.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
कामगारांच्या जगण्याचा हक्क व अधिकारांवर हल्ला .....
बडे कार्पोरेट आणि मालक वर्गाला जे हवे ते त्यांना दिले. एवढेच नाही तर या वातावरणाचा फायदा घेऊन मोदी साहेबांनी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनरच्या महागाई भत्ता दीड वर्षासाठी गोठवला. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला एक दिवसाचे वेतन याप्रमाणे ३७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतला. तेथेच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या अधिपत्याखालील असलेली भाजपच्या राज्य सरकारांना कामगार कायदे बदल करण्याकरता प्रोत्साहित केले. परिणामी उत्तर प्रदेश सरकारने चार कामगार कायदे वगळता ३८ कामगार कायदे तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मध्यप्रदेश सरकारने नव्या उद्योगासाठी बहुतेक सर्व कामगार कायदे लागू होणार नाहीत असा निर्णय घेतला. गुजरात आणि कर्नाटकच्या सरकारने याच पद्धतीने निर्णय करणार असल्याचे जाहीर केले. देशातल्या जवळपास दहा राज्यसरकारांनी ८ तासाचा कामाचा दिवस १२ तास करण्याचे निर्णय केले. उत्तर प्रदेश व गुजरात सरकारने तर जादा चार तासाचे वेतन पूर्वीच्या कायद्यानुसार दुप्पट दराने देण्याऐवजी सर्वसाधारण दराने देण्याची अधिसूचना काढली. (अर्थात उत्तर प्रदेश सरकारला ही सूचना मागे घ्यावी लागली.) असे एकापाठोपाठ कामगारांचे अधिकार व हक्कावर हल्ला या सरकारने सुरू ठेवला. देशातल्या कष्टकऱ्यांचे, संघटित व असंघटित कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे, स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांचे , छोट्या आणि मध्यम गटातल्या उद्योजकांचे, व्यावसायिकांचे जगण्याच्या हक्कावर या सरकारने हल्ला केला. त्यांचा स्पष्ट संदेश आहे की इथल्या बड्या बड्या मालक वर्ग व बड्या कॉर्पोरेट च्या हितासाठी देशातल्या ४४ कोटी कामगारांचा बळी देण्याचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. हायर फायर व्यवस्था लागू करण्यात येत आहेत. मालकवर्ग देईल त्या वेतनामध्ये, सांगेल तेवढे तास, सांगेल त्या परिस्थितीमध्ये काम केले पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. कामगारांवर गुलामगिरी लादली जात आहे. मोदींना फिकर आहे त्यांच्या दोस्त असलेल्या बड्या कॉर्पोरेट घराण्याची आणि मालक वर्गाची. त्यांचे ईमान आहे मालक वर्गाला बांधलेले.. आणि म्हणून हे सर्व निर्णय ते बिनधास्तपणे घेत आहेत. अर्थात आपल्या देशाच्या जनतेने २०१४ मध्ये त्यांना या देशाचे पंतप्रधान केले, २०१९ मध्ये प्रचंड बहुमत दिले आणि जनतेने दिलेल्या प्रचंड बहुमताच्या जोरावर ते जनतेच्या आणि कामगार वर्गाच्या मुळावर उठले आहेत.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
मोदी सरकारचे कामगार व जनविरोधी धोरण आणि त्यामागील राजकारणाच्या विरुद्ध संघर्षाची गरज . . .
आता जनतेनेच ठरवायचे आहे हे सर्व असंच सहन करायचं की याचा प्रतिकार करण्यासाठी सर्व जनतेची एकजूट करून निर्णायक लढा करायचा ! कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरणारे निर्णय मोदी सरकार का घेते ? या निर्णयामागे त्यांचे धोरण काय ? हे धोरण निश्चित करणारे भारतीय जनता पक्षाचे राजकारण समजून घेणे आवश्यक आहे. निश्चितपणे आपल्या देशातील जनता, कामगार वर्ग, शेतकरी, मजूर हे सगळे एकत्र येऊन या जनविरोधी, कामगारविरोधी धोरणाचा आणि राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी स्वतःला सज्ज करतील असा विश्वास आहे.
___________________________________________________________________________________________________________
डॉ.डी.एल.कराड
राष्ट्रीय उपाध्यक्ष, सिटू

४९ - लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणू नष्ट होत नाही


जीवनमार्ग बुलेटिन: ४९

मंगळवार, १९ मे २०२०
लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणू नष्ट होत नाही
- डॉ. जयप्रकाश मुलियिल
(डॉ. जयप्रकाश मुलियिल हे देशातील एक नामवंत साथतज्ञ आहेत. सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक समितीवरही ते काम करत आहेत. ‘फ्रंटलाईन’ च्या ७-२२ मेच्या अंकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या दीर्घ मुलाखतीतील काहीसा संपादित अंश मुद्दाम प्रसारीत करत आहोत.)
सरकारच्या एका समितीने लॉकडाऊनमुळे १६ मे रोजी रुग्णसंख्या शून्यावर येईल असा अंदाज व्यक्त केला होता, त्याविषयी:
उत्तर: या समजाला काहीही वैज्ञानिक आधार नाही. देशात एकदा का संसर्ग सुरू झाला की केवळ लॉकडाऊनने तो नष्ट करता येणार नाही. मुळात याच्या संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत. एका रुग्णामागे अनेक लक्षण नसलेले लोक असू शकतात. आणि ते या विषाणूचा प्रादुर्भाव करू शकतात. एक आठवडा लक्षणे आढळली नाहीत, अशा काळातच ते लागण करू शकतात. प्रसार अगदीच स्थानिक असेल तरच केवळ लॉकडाऊनचा उपयोग होईल. आता तो सर्वत्र पसरलेला आहे. आणि आपण बाहेर जाणे रोखू शकत नाही. दैनंदिन वस्तूंसाठी बाहे रजावेच लागते. त्यामुळे प्रसार शून्यावर आणणे जवळजवळ अशक्य आहे.
तपासण्याविषयी:
उत्तर: तपासणी का करायची? कोव्हिडसारखी लक्षणे असलेले किती लोक आणि प्रत्यक्षात बाधीत असलेले किती हे स्पष्ट समजावे म्हणून. तथाकथित रुग्णास केवळ तशी लक्षणे आहेत की त्याला कोव्हिडची बाधा झाली आहे, हे समजण्यासाठी. मग प्रत्यक्ष बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींविषयी काळजी घेता येते. त्याच्या कुटुंबातील सर्वच संपर्कात आलेले असतात. आज ना उद्या त्यांना बाधा होऊ शकते, हे गृहित धरले पाहिजे. आज लक्षणे दिसत नसली तरी.
एकाद्या व्यक्तीत प्रतिकारक्षमता आहे का, ती किती आहे, हे तपासण्याचीही एक पद्धत आहे. त्याने रोगाचे निदान होत नाही. पण ती व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली की नाही, हे समजते. रक्तात lgG हा घटक विकसित झालेला असल्यास प्रतिकारक्षमता येते. या तपासणीने समाजातील किती लोकांना विषाणूची लागण होऊन गेली आणि ते प्रतिकारक्षम बनले, हे समजते. त्या संख्येनुसार रुग्णांचे प्रमाण कमी होते.
आज चिनी पद्धतीच्या तपासण्या होतात. भारतातील कित्येक प्रयोगशाळा अजून विकसित तपासण्यांच्या शोधात आहेत. पण बऱ्याच वेळा लक्षणेच दिसत नसल्याने आपल्याला बाधा झाल्याचे कळत नाही. तपासणी केल्यावर किती प्रसार झाला, हे समजू शकते. त्यावरून पुढे प्रतिकारक्षम व्यक्तींची संख्या समजू शकते.
मला स्वतःला विषाणूची बाधा होऊन गेली आहे आणि मी lgG पॉझिटिव्ह बनलो तर मला आनंदच होईल. मग मला घरात कैदी बनून राहायची गरज नाही. मी कुठेही जाऊ शकतो, अगदी कोरोनाच्या रुग्णालाही बेलाशक भेटू शकतो. मला काहीच होणार नाही. कारण माझ्यात प्रतिकारक घटक तयार झालेले आहेत. गोवरासारखे. एकदा झाला की तो पुन्हा होत नाही. विशेषतः जर्मन गोवर. तेव्हा प्रतिकारशक्ती महत्त्वाची. तपासण्यातून याविषयी माहिती उपलब्ध होते. अशा खात्रीशीर तपासणीपद्धती भारतात विकसित होतील, याविषयी माझ्या मनात शंका नाही.
सामुदायिक प्रतिकारशक्ती:
२५ मार्चला ५०० रुग्ण होते. तेव्हापासून आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. आता रुग्णसंख्या एक लाखावर जाऊन पोहोचली असून तीन हजारहून जास्त दगावले आहेत. तेव्हा लॉकडाऊनमुळे प्रसार थांबला असे कसे म्हणता येईल? लॉकडाऊनमुळे प्रसार थांबत नाही, तो सपाट होतो. काहीच केले नाही नाही तर उंचच उंच मनोरे दिसतील. तो उंच जाईल आणि तीन महिन्यांनी खाली येईल. लॉकडाऊनमुळे त्याची प्रसाराची गती मंद होते. तो किती काळ केला यावरून तो मनोरा व्हायला तीन महिने लागतील की सहा - नऊ हे ठरेल. पण लागण होणाऱ्या एकूण संख्येत फरक पडणार नाही. अपेक्षित रुग्णसंख्या गाठीपर्यंत त्याचा प्रसार होतच राहणार. यालाच सामुदायिक प्रतिकारशक्ती (Herd Immunity) म्हणतात. ती गाठीपर्यंत प्रसार होतच राहणार. सर्वांनी एकाच वेळी आहारी पडायच्या ऐवजी आपण त्यांना आजारी पडण्यास सवड देतो! पण प्रसार चालूच असतो. त्यामुळे एकाच वेळी गंभीर रुग्णांचे प्रमाण मर्यादित ठेवतो. रोगाने अत्युच्च टोक गाठून तो खाली येईपर्यंत गंभीर रुग्णांचे प्रमाण एकच राहणार. पण सगळेच एका वेळी आजारी पडले नसल्याने इस्पितळात फार गर्दी होणार नाही. लागणीचा काळ तीन महिने असला काय आणि सहा - हलक्या, तीव्र आणि गंभीर लागण झालेल्यांची संख्या दोन्ही काळात कायमच राहणार.
मृत्यूचे मोठे प्रमाण टाळून सामुदायिक प्रतिकारशक्ती गाठता येईल का
उत्तर: माझ्या माहितीनुसार ८० टक्के मृत्यू ६० वयावरील व्यक्तींचे असतील. तेव्हा ६० वरील वयोगटाची जास्त काळजी घ्यावी लागेल. सगळ्या देशाला बंद करून ठेवण्याऐवजी त्यांनी स्वतः घरातच राहायचे ठरवल्यास त्यांना लागण व्हायचे कारण नाही. त्यांना इस्पितळात जावे लागणार नाही. जे आजारी पडतील त्यांना न्यावे लागेल, पण विनाकारण गर्दी होणार नाही. तरूण कामासाठी बाहेर जातील आणि त्यांना लागण होईल. पण ती खूपच सौम्य असेल. काही गंभीर होतील, काहींना मृत्यू येईल. पण इस्पितळांची सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांची जगण्याची शक्यता खूपच वाढते.
ज्येष्ठांना काही त्याग करावा लागेल
त्यांना घरी राहावे लागेल. मुलाबाळांपासून चार हात लांब राहावे लागेल. आज आपण एका अतिशय मोठ्या संकटातून जात आहोत. त्यावर मात तर केलीच पाहिजे. पण फार लोक मृत्युमुखी न पडता आपल्याला सामुदायिक प्रतिकारशक्ती जमवता येईल. मृत्यूचे प्रमाण जास्तीत जास्त कमी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे आणि आज तरी आपल्या देशात आपण ते कमी ठेवलेले आहे.
या विषाणूने सगळ्या जगालाच विळखा घातला आहे. तरूणांची संख्या हे भारताचे एकमेव शक्तिस्थान आहे. देशात ९२ टक्के लोक ६० वर्षांखालील आहेत. आणि ते वयस्कांची काळजी घेऊ शकतात. एकदा का सामुदायिक प्रतिकारशक्ती गाठली की हे वयस्कही बाहेर पडून सामाजिक जीवनात सहभागी होऊ शकतात. हे इतके साधे आहे, यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही. मी त्यांच्या मताचा आदर करतो. पण मी आशावादी तर आहेच, पण मी माझ्या विज्ञानाच्या आधारे हे मत मांडतो आहे.
सामुदायिक प्रतिकारशक्ती संपूर्ण समाजाचेच संरक्षक कवच असते. मी कित्येक विषाणूंच्या बाबतीत हे पाहिले आहे. लोकांना हे समजायला काहीसे अवघड जाते. प्रत्येक व्यक्तीला लागण होईल, तसतसा या विषाणूचा प्रादुर्भाव सपाट होत जातो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
सामुदायिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी आवश्यक लागण
युरोपच्या मानाने भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने तो अंदाज बांधणे कठीण आहे. पण शहरात ६० टक्क्यांच्या आसपास लागण गृहीत धरता येईल.
केरळने संपर्क शोधण्यासाठी अतिशय आक्रमक मोहीम राबवली. आणि विषाणूचा प्रसार रोखण्यात महत्त्वाची कामगिरी केली. त्यांचे प्रयत्न अतिशय शिस्तबद्ध होते. त्यांनी जनतेचे सहकार्य घेतले. सरकार आणि जनता यांच्यात चांगला संवाद होता आणि आहे. वास्तवावर आधारीत मोहीम त्यांनी राबवली. अशा रोगराईत रुग्णांकडे पाहायचा दृष्टीकोन चांगला नसतो. केरळने अत्यंत आत्मीयतेने रुग्णांची काळजी घेतली. पण आता लॉकडाऊन काढल्यानंतर विषाणू परत येईल का, हा चिंता करायला लावणारा प्रश्न आहे. त्यांनी भारताच्या इतर भागापासून अलग राहायला हवे. बाहेरून फार लोक राज्यात येऊ देता कामा नयेत.
लॉकडाऊनचे परिणाम आणि नंतर
काही लोकांना खूपच त्रास भोगावा लागला. पुरेशी सूचना न देता केलेल्या लॉकडाऊनमुळे हे झाले. न्यू झीलंडमध्येही भारतासोबतच म्हणजे २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. पण त्यांच्या पंतप्रधानांनी तीन दिवसांची मुदत दिली होती. चारदोन तासांची मुदत दिल्यास दुकानात गर्दी होते आणि त्याने विषाणूच्या प्रसारास मदतच होते. लॉकडाऊन असूनही संख्या का वाढते आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपल्या भूमिकेत सातत्य नाही. लोकांच्या हालअपेष्टा वाढणार नाहीत, यावरच सर्व कटाक्ष असला पाहिजे.
लॉकडाऊन खुला केल्यानंतर रुग्णसंख्या वाढणार, याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्यासाठी काही दिवस लागतील. सरकार त्याने बावरून जाणार नाही, अशी आशा करतो. ते अपेक्षितच आहे. लॉकडाऊनने रोग नष्ट केलेला नाही. त्याचे प्रमाण कमी होत जाईल, हे ध्यानात घेतले पाहिजे. गर्दी करू नका, अंतर ठेवा याबाबतीत जनतेचे शिक्षण केले पाहिजे. काही रुग्ण असणार, काहींना मृत्यू येणार. दोनतीन मृत्यू झाले की लॉकडाऊनची मागणी केली जाणार.
इस्पितळांतील बेड्सची संख्या वाढवली पाहिजे. तेथे जास्त गर्दी होणार नाही, याची तजवीज केली पाहिजे. खूप विचार करून त्याचे नियोजन केले पाहिजे. संध्याकाळी रुग्णसंख्या वाढली आणि लगेच लॉकडाऊन जाहीर केला, असे इस्पितळांच्या व्यवस्थोबाबतीत करून चालणार नाही. नीट नियोजन हवे.
या सर्व प्रक्रियेत जनता सोबत हवी. खुले केले की साथ वाढलेली दिसणार. त्यावेळी ज्येष्ठांपर्यंत व्यवस्थित संदेश पोहोचला पाहिजे: बाहेर जाऊ नका; कुटुंबातील इतरांपासून शक्य तितके लांब राहा.
काही केले तरी रुग्णांची संख्या शून्यावर येणार नाही. केरळमध्ये काही ठिकाणी शून्यावरून परत एखाददुसरा रुग्ण दिसला आहे. लक्षणे नसूनही लागण असते, हे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर काही काळाने लागण दिसू लागली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.
या रोगाचे मार्गक्रमण ठरलेले आहे. तो ६० टक्के लोकांना होणार. त्यापैकी दोन अडीच टक्क्यांना इस्पितळात दाखल करावे लागणार. त्यातील काहींचा मृत्यू होईल. या प्रक्रियेतून जावे लागणारच. लॉकडाऊन करा, किंवा कमी लोकांना बाहेर येऊ द्या, विषाणू त्याचे काम करणार. त्यावर औषध आणि लस येईपर्यंत आपण त्या बाबतीत काहीच करू शकत नाही. त्यांची वाट पाहायची. मलाही कुटुंब आहे.
दरम्यानच्या काळात आपण डोके ठिकणावर ठेवून देश वाचवला पाहिजे. सुमारे ०.५ टक्के लोक आपल्यातून गेलेले आपल्याला पाहावे लागेल. टक्का लहान दिसतो, आपण आपली लोकसंख्या मोठी आहे. नैसर्गिक कारणांनी सुमारे दहा लाख लोकांना मृत्यू येतो. लॉकडाऊनमुळे काही आळा घालता येतो. पण एका खुरट्या घरात सहा-आठ जणांनी बाहेर न जाता कसे राहायचे? तेव्हा लॉकडाऊन उठवून ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने मृत्यूवर मात करायचा प्रयत्न केला पाहिजे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था
आपण आपल्या जनतेच्या सुरक्षितततेच्या बाबत नेहमीच जागरूक असतो. त्यासाठीच संरक्षणावर इतका खर्च करत असतो. पण मृत्यू असाही येतो, हे आपण पाहात आहोत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी, तेथील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यासाठी या अनुभवातून शिकले पाहिजे. मुख्यतः शत्रू बाहेर नसून अशा विषाणूतच दडलेला असतो, हे ध्यानात घेतले पाहिजे.
___________________________________________________________________________________________________________
भाषांतर: उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग

४८ - पूज्याचा फटका



जीवनमार्ग बुलेटिन: ४८

सोमवार, १८ मे २०२०

पूज्याचा फटका

मटका किंग रतन खत्रीचं परवाच निधन झालं. हा खत्री आकड्यांसाठी मोठा प्रसिद्ध होता. तो काय आकडा जाहीर करणार आहे, यावर लोक पैसे लावायचे. आणीबाणीत इतरांच्या सोबत त्यालाही आत घालण्यात आल्यानंतर मटका बंद पडला. पण आकड्यानं भारतीयांची पुन्हा पाठ धरलेली दिसते. आकडे जाहीर करायची जबाबदारी आता खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीच आपल्या शिरावर घेतलेली आहे. ते काय आकडा जाहीर करतात, यावर आपलं नशीब ओपन होणार का क्लोज यावर लोक घमासान चर्चा करत राहतात. मटक्यात कुणाचा लाभ होई, कुणी गाळात जाई. मधल्यामध्ये मालामाल होई रतन खत्री. हीच ट्रिक राजकारणात वापरून मोदीभाईंनी सत्तेचा मटका ताब्यात ठेवला आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ लाख आणि २ कोटीचा ओपन क्लोज खेळून सत्ता मिळवली. त्यानंतर नोटाबंदीत साडेपाच लाख काळ्या पैशाचा ओपन काढून नंतर २०२२ सालापर्यंत देशाला पाच ट्रिलियनचा क्लोज द्यायचा आकडा काढला. आता देशात एक लाख लोक कोरोनानं झपाटले असताना आणि कोट्यवधी भुकेनं व्याकूळ होत असताना पंतप्रधानांनी २० लाख कोटी ओपन केले आणि आपल्या निमित्तमात्र वित्तमंत्री निर्मलाकाकूंना क्लोज करायला नेमून दिले. या वीस लाख कोटींच्या ओपनक्लोजचं पसायदान हातात पडताच पियुष आणि अर्णव यांना नफ्याच्या स्वधर्मसूर्याचं दर्शनच झाल्याचा आनंद झाला.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
पूज्याची करामत
कोरोनाशी लढायला आणि कोरोनामुळे उध्वस्त झालेली अर्थव्यवस्था सावरायला वीस लाख कोटींचा वर्षाव करत असल्याची नरेंद्रवाणी झाल्यापासून आता कोव्हिड-१९ नं आर्यभूमीतून गाशा गुंडाळायची तयारीच सुरू केली असणार, या भावनेनं शहरातल्या कामगारांनी गावाकडे जाण्यासाठी आनंदयात्रा काढली. या आनंदयात्रेची दृश्यं पाहून नरेंद्रदेवांना आपण कृतकृत्य झाल्याचा साक्षात्कार झाला असणार. आपण भरतभूमीचं नंदनवन करण्यासाठी काय पराक्रम केला आहे, हे अडाणी लोकांना समजावून देण्यासाठी त्यांनी निर्मलाकाकूंना मुक्रर केलं, आणि त्यांनी रोज दोनदोन तास सलग पाच दिवस पाच अध्यायांचं पोथीवाचन करून भक्तांना भजनी लावलं.
त्यांचं प्रवचन ऐकल्यावर कित्येकांना मराठीतील प्रथितयश लेखक मामा वरेरकरांच्या ‘पूज्याचा फटका’ नावाची कथा आठवली. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम सावकार आपल्या चोपडीत लिहित असत. लिहिता लिहिता त्या रकमेवर फक्त एक पूज्य हळूच चढवत असत, आणि न दिलेल्या कर्जाची फेड म्हणून त्याच्या शेतावर कब्जा करत असत. निर्मलाकाकूंनी जो हिशेब सादर केला, त्यातून मोदींनी भारतीय जनतेला कसा पूज्याचा फटका हाणला, हे सिद्ध झालं आहे.
मोदींनी आपल्या आठ वाजताच्या भाषणात देशाला त्यांचं सरकार वीस लाख कोटी देत असल्याचं जाहीर केलं. वीस लाखच का? कारण कोरोनाशी लढण्यासाठी, त्या रोगराईनं निर्माण केलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशाच्या जीडीपीच्या १० टक्के रक्कम दिली पाहिजे, असे जागतिक तज्ञ सांगत आहेत. त्याप्रमाणे अनेक देशांनी आपापल्या अर्थव्यवस्थेच्या मगदुरानुसार तेवढ्या रकमेची तरतूद केली. आपल्या पंतप्रधानांनीही आपण जीडीपीच्या १० टक्के असलेली २० लाख कोटी रुपयांची तरतूद करत असल्याचं जाहीर केलं. वित्तमंत्र्यांनी त्या बड्या रकमेची फोड केल्यावर काय दिसतं?
मोदींनी जाहीर केलेले - २००००००००००००० रुपये (वीस लाख कोटी)
निर्मलाकाकूंनी केलेली फोड: (सर्व आकडे कोटीत)
१. उद्योगांसाठी -
या आधीच जाहीर केलेले : १,९२,८००
त्यात मोदी सरकारचे: ९५,०००
कर्जाऊ: १,०७,१०५
२. रिझर्व बॅंकेने आधीच केलेले उपाय -
जाहीर रक्कम: ८,०१,६०३
त्यात मोदी सरकारचे: ०,००,०००
कर्जाऊ: ८,०१,६०३
३. लघु-मध्यम उद्योग वगैरे -
जाहीर रक्कम: ५,९४,५५०
त्यात मोदी सरकारचे: ५५,०००
कर्जाऊ ५,३९,५५०
४. स्थलांतरित, धान्य, नाबार्ड, मुद्रा वगैरे -
जाहीर रक्कम: ३,१०,०००
त्यात मोदी सरकारचे: १४,७५०
कर्जाऊ: २,९५,२५०
५. शेती -
जाहीर केलेले: १,५०,०००
त्यात मोदी सरकारचे: ३०,०००
कर्जाऊ: १,२०,०००
६. मनरेगा वगैरे -
जाहीर केलेले: ४८,१००
सर्व मोदी सरकारचे: ४८,१००
याचा अर्थ केंद्र सरकार आपल्या खजिन्यातून अडीच लाख कोटीहून जास्त खर्च करणार नाही. उरलेली रक्कम ही कागदावरची रक्कम आहे. कुणी कर्ज घेतलं तर त्याचा उपयोग. पण मुळातच कोरोना यायच्या आधीच कुणी कर्ज घ्यायच्या भानगडीत पडत नव्हतं, कारण मालाला उठाव नव्हता. कर्ज काढून माल घेऊन तो करायचा काय? उदाहरणार्थ, ऑटो इंडस्ट्रीत वाहनं पडून असल्यानं सुटे भाग पुरवणारे उद्योजक, विक्रीसाखळीतले वितरक आणि बाकी तंत्रज्ञांनी आणि ग्राहकांनी बँकेच्या दाराकडे पाठ फिरवली होती. रिझर्व बँकेने त्यांना उदाहरणार्थ ८ लाख कोटी स्टिम्यूलससाठी कर्जाची तरतूद करून उपयोग काय? त्यामुळे ते कुणीही उचलणार नाही. खरं तर, लघु-मध्यम उद्योगांसाठी सरकारनं साडेतीन लाख कोटी रुपये कर्ज द्यायला मान्यता दिली आहे. हे कर्ज घेणार कोण? कारण त्यांचा माल पडून आहे, त्यांना ऑर्डर्स नाहीत, लॉकडाऊनमुळे कामगारांना पगार नसल्यामुळे ते गावाच्या वाटेला लागले आहेत. लघु-मध्यम उद्योगाची सरकार आणि सार्वजनिक क्षेत्राकडे असलेली थकबाकीच पाच लाख कोटीहून जास्त आहे. सरकारनं ती भागवली असती तरी सरकारची नियत साफ आहे, असं काही प्रमाणात म्हणता आलं असतं. पण नाही. तेव्हा या वीस लाख कोटीतला खरा आकडा आहे दोन लाख कोटींचा. मोदीशेठनं त्याच्यावर एक पूज्य लावलं आहे, इतकंच. अठरा लाख कोटींची अजून गरज आहेच. त्यासाठी सरकारनं तेवढं कर्ज काढावं किंवा तेवढ्या नोटा छापाव्या. नोटाबंदी करता येते तर त्या चालूही करता आल्या पाहिजेत. मोदी सरकार हे करत नाही.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
देशद्रोही मोदी सरकार
थोडक्यात, मोदी सरकारचा ओपन शून्य आणि क्लोजही शून्यच. कोरोनाशी लढायला जीडीपीच्या दहा टक्के म्हणजे वीस लाख कोटींची गरज कशासाठी हवी? तपासणी करण्यासाठी, डॉक्टर, नर्सेस, आशा, अंगणवाडी आदी आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षक साधने पुरवण्यासाठी, इस्पितळे बांधण्यासाठी, ती सुसज्ज करण्यासाठी, बंद पडलेल्या दवाखान्यांना आणि इस्पितळांना मदत देण्यासाठी, व्हेन्टिलेटर्स खरेदी करण्यासाठी, कामगार-मजुरांचा पगार भागवण्यासाठी आणि रोजगार बुडालेल्यांना जगवण्यासाठी, त्यांना सकस अन्न पुरवण्यासाठी. हे जगातले इतर देश करत आहेत. महागुरू व्हायला निघालेल्या देशाच्या सरकारच्या हे डोक्यातही नाही. आपल्या प्रवचनात काकूंना अचानक कोरोना राक्षस आठवला. म्हणून त्यांनी आम्ही आरोग्याच्या पायाभूत व्यवस्थेसाठी खर्च करणार आहोत, हे सांगितलं, पण किती करणार हा आकडा मात्र गुलदस्त्यात ठेवला. आता रबी हंगाम तयार आहे. त्या पिकाच्या खरेदीची काय सोय आहे? त्याचे दर काय ठरवले आहेत? एवढ्यात खरीप हंगाम येईल. शेतकऱ्याला पुढच्या पिकाची तयारी करण्यासाठी जमीन तयार करायची आहे, त्याला बियाणे लागणार, खते-औषधे लागणार, मजूर लागणार. यासाठी सरकार काय मदत करत आहे? शून्य. कोरोनापासून जगण्यासाठी तातडीची गरज आहे जीडीपीच्या १० टक्के खर्च करायची. सरकार तरतूद करत आहे केवळ एका टक्क्याची. आणि उरलेल्या ९ टक्क्यांचे नुसते ओपनक्लोजचे आकडे.
कोरोनाशी लढा करण्यास आवश्यक असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना एकत्र येता येत नाही. रस्त्यावर उतरून विरोध करता येत नाही, ही संधी साधून मोदींनी सरकारी उद्योग कवडीमोलाला विकायला काढले आहेत. कोरोनाच्या नावानं अनिल अंबानी आणि गौतम अदानी आणि कोणीकोणी मालामाल होतील, आणि देश कंगाल होईल. या बहादूर सरकारनं स्वावलंबनाचं गाजर दाखवत परदेशातून एफडीआयला रान खुलं केलं आहे. पूर्वी अशोक मेहता नावाचे एक अमेरिकाधार्जिणे राजकारणी होते. ते म्हणायचे, द वुम्ब ऑफ मदर इंडिया इज ओपन फॉर अमेरिकन कॅपिटल. नरेंद्रदेव दुसरे काय म्हणत आहेत? गोरगरिबांना पूज्याचा फटका देणाऱ्या ब्रिटीशधार्जिण्या सावकारांना धडा शिकवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांनी ‘पत्री सरकार’ची स्थापना केली होती. कोरोनाची संधी घेऊन, कोरोनाच्या नावानं संरक्षणखात्यात सुद्धा परकीय भांडवल आणणाऱ्या या दोन नंबरच्या खत्री सरकारला त्याच्या पूज्याचा फटका हाणायची तयारी केल्याशिवाय आता पर्याय नाही.
___________________________________________________________________________________________________________
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग

४७ - सावध, ऐका पुढल्या हाका...


जीवनमार्ग बुलेटिन: ४७

रविवार, १७ मे २०२०

कॉ. के. वरदराजन यांना आदरांजली

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य कॉ. के. वरदराजन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी तामीळनाडूतील करूर या गावी नुकतेच श्वसनाच्या विकाराने दुःखद निधन झाले.
एका मध्यमवर्गीय कुतुंबात जन्म झालेल्या आणि इंजिनयरिंगचे शिक्षण घेतलेल्या वरदराजन यांनी १९७० मध्ये पक्षात प्रवेश केला. १९९८ मध्ये त्यांची पक्षाच्या केंद्रीय समितीवर आणि २००२ मध्ये केंद्रीय सचिवमंडळावर त्यांची निवड झाली. २००५ पासून २०१५ पर्यंत त्यांनी पॉलिट ब्यूरोचे सदस्य म्हणून काम पाहिले.
ते प्रथम तामीळनाडू किसान सभेचे सचिव आणि नंतर १९९८ मध्ये अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव बनले. मृत्यूसमयी ते अ. भा. किसान सभेचे एक उपाध्यक्ष होते.
आणीबाणीत त्यांनी भूमिगत राहून दोन वर्षे काम केले होते आणि त्यांना पुढे कारावासही भोगावा लागला होता.
अत्यंत काटकसरी आणि साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आपल्या मनमिळावू आणि प्रसन्न, खेळकर व्यक्तिमत्वाने एकाद्याला लगेच आोपलेसे करणारे हे लोभस व्यक्तिमत्व काळाच्या आड गेले आहे. जीवनमार्ग त्यांच्या स्मृतीला क्रांतिकारी अभिवादन करत आहे.
__________________________________________________________________________________________________________

सावध, ऐका पुढल्या हाका...

कोरोनाच्या आडून गोरगरिबांना, शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं मोदी सरकारचं कारस्थान
कोरोनाच्या संकटाचं संधीत रूपांतर करण्याची कला मोदी सरकारइतकी कुणाला अवगत झाली नाही, हे नक्की. कोणत्याही नियोजनाशिवाय देशभरात टाळेबंदी लागू करून कोट्यवधी स्थलांतरित मजुरांना मरणाच्या दारात ढकलून समाधान झालं नाही म्हणून की काय, तब्बल ५० दिवसांनी रिलीफ पॅकेजच्या नावाखाली नव्या बाटलीत जुनीच दारू भरून, आणि टाळेबंदीची ज्यांना खरी झळ पोचली, त्या हातावर पोट असणाऱ्या मजुरांना आत्मनिर्भर होण्याच्या सल्ल्याचा धत्तुरा देऊन मोदी सरकारने क्रूर चेष्टा केली आहे. वीस लाख कोटींचा जुमला उघडकीला येऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने घोषणा करायची, आणि ती घोषणा करताना नेमकी किती तरतूद नव्याने केली आहे, ते गुलदस्त्यातच ठेवायचं ही कामगिरी अर्थमंत्री निर्मला सितारामन् इमानेइतबारे पार पाडत आहेत. बरं, हे वीस लाख कोटींचं गाजर दाखवताना, आयजीच्या जिवावर बायजी उदार असाच सारा मामला. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या वित्तीय सवलती आणि नाबार्डने करायच्या गुंतवणुकी याही आपल्याच नावावर खपवायचा चावटपणा मोदी सरकारने चालवला आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
बळीराजाच्या मुळावर उठलेला वामनावतार: मोदी सरकार
वीस लाख कोटीच्या पॅकेजची सविस्तर माहिती देताना दुसऱ्या दिवशीच्या घोषणेमध्ये स्थलांतरित मजुरांना झेलाव्या लागलेल्या अपेष्टांची आम्हाला कल्पना आहे, असं निर्मलाताईंना वारंवार सांगावं लागलं. पण त्यांचं हे बोलणं म्हणजे मगरीचे अश्रूच ठरले. कारण त्यादिवशीच्या ८ लाख कोटींहून अधिकच्या रकमेमध्ये या मजुरांसाठी फक्त साडेतेरा हजार कोटींची तरतूद (१० हजार कोटी मनरेगासाठी आणि साडेतीन हजार कोटी पुढील तीन महिन्यांत मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी) केली आहे, हे उघड झालं.
तीच गत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कालच्या पॅकेजची. कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून काढणी केली, म्हणून देशात अन्नधान्य पुरवणं शक्य आहे, अशी शेतकऱ्यांची पाठ अर्थमंत्र्यांनी थोपटली. पण या शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य सरकार विकत घेईल, अशी हमी मात्र दिली नाही. सरकारी गोदामांमध्ये पडून असलेला अन्नधान्याचा साठा, शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन करून काढलेलं पीक आणि देशातील कोट्यवधी कष्टकऱ्यांची उपासमार या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेण्याची हमी देणं, आणि गोदामातला आणि शेतकऱ्याकडचा माल सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून मोफत उपलब्ध करून देणं ही आत्ताच्या घडीला सर्वात महत्त्वाची आणि परिणामकारक घोषणा ठरली असती. पण श्रमिकांचं, गोरगरिबांचं भलं केलं, तर ते मोदी सरकार कसलं? १५ मेच्या घोषणेमध्ये शेतकऱ्यांसाठी या सरकारने कोणतीही ठोस नवी तरतूद केली नाही. उलट, शेतकरी आणि शेती या दोहोंच्या दृष्टीने कळीच्या कायद्यांमध्ये आणि धोरणांमध्ये बदल करण्याची घोषणा मात्र केली. कोरोनाच्या संकटाला संधी बनवणं म्हणतात, ते याला. याबाबतीत सरकारने काल तीन महत्त्वाच्या बदलांचं सूतोवाच केलं.
अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून तृणधान्यं, डाळी, कांदा, बटाटा अशा शेतमालाच्या व्यापार-साठ्यावरचं नियमन उठवण्याची घोषणा काल अर्थमंत्र्यांनी केली. शेतकऱ्याला आपला माल देशात कोणत्याही राज्यात विकता यावा, यासाठी एक केंद्रीय कायदा करण्याची घोषणाही त्यांनी केली. आणि शेतकऱ्याला झेलावी लागणारी बाजारपेठ आणि बाजारभावाबद्दलची अनिश्चितता दूर करण्याच्या गोंडस नावाखाली कंत्राटी शेतीसाठी वैधानिक चौकट तयार करण्याचंही त्यांनी जाहीर केलं. वरवर पाहता हे तीनही बदल चांगले वाटू शकतात. पण ते शेती-शेतकरी आणि देशातील गोरगरिबांची अन्नसुरक्षा या दोहोंच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत. साठेबाजीला मुक्त वाव, कंत्राटी शेती आणि बाजारातील लूट ही बळीराजाला पाताळात गाडणारी या वामनाने टाकलेली तीन पावले ठरणार आहेत.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
साठेबाजांचे तारणहार: मोदी सरकार

टंचाईच्या काळात स्थानिक पातळीवरील साठेबाजीला आळा बसावा यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत नियमनाची तरतूद आहे. नियमनातून महत्त्वाची पिकं वगळण्यातून स्थानिक पातळीवर साठेबाजीला मोकळं रान मिळणार आहे. आत्ताच्या परिस्थितीत अल्पकाळात तर या बदलाचा अत्यंत घातक परिणाम होणार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे - रबीची कापणी झाली आहे, खरीपाची पेरणी व्हायची आहे. खरीप पीक काढणीला येण्यापर्यंतचा म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतचा हा काळ भारतामध्ये शेतमालाच्या दृष्टीने टंचाईचा काळ असतो. खरिपामध्ये सर्वात लवकर मका काढणीला येतो तो ऑगस्टच्या अखेरीला. एप्रिल-मेपासून सप्टेंबरपर्यंतच्या काळात जुनी पिकं काढून झालेली असतात, नवी पिकं तयार व्हायची असतात. याच काळात साठेबाजीला ऊत येतो.
आत्ताच्या टप्प्यावर सर्वसामान्यांना, गोरगरिबांना अन्नधान्य आणि कांदा-बटाट्यासारखी टिकाऊ भाजी विनासायास, योग्य बाजारभावाला उपलब्ध व्हायची असेल, तर त्याची साठेबाजी न होऊ देणं अत्यंत आवश्यक आहे. टाळेबंदीमुळे मालाच्या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. साठेबाजी वाढत आहे. आणि नेमक्या याच काळात या पिकांना नियमनातून वगळणं म्हणजे साठेबाजीला उत्तेजन देणं आहे. आपला माल बाजारात विकायचा की नाही, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला देण्याच्या नावाखाली साठेबाज व्यापाऱ्यांची चांदी करण्याचंच हे धोरण आहे. किती शेतकऱ्यांकडे शेतमालाचा साठा करून ठेवण्याची क्षमता असते? शेतात तयार झालेला माल लवकरात लवकर काढून बाजारात विकणं, तो शेतात नासून जाऊ न देता येईल त्या किमतीला विकणं हेच शेतकऱ्याच्या हातात असतं. शेतकऱ्याकडून माल विकत घ्यायचा, तो साठवायचा आणि चढ्या किमतीला बाजारात विकायचा हा साठेबाज व्यापाऱ्यांचा धंदा. टंचाईच्या काळात साठेबाजीला आळा घालणं, गरज पडल्यास व्यापाऱ्यांच्या गोदामात साठवून ठेवलेला माल ताब्यात घेणं आणि तो गरजेनुसार लोकांना उपलब्ध करून देणं यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्यातल्या नियमनाची तरतूद उपयोगाला येते. हे नियमनच काढून टाकलं तर शेतकऱ्याचं नाही, तर साठेबाज व्यापाऱ्याचं भलं होणार, हे सांगायला कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. या बदलातून विशेषकरून सीमान्त, लहान शेतकऱ्यांचं जिणं हराम होणार आहे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
राज्यांना तुडवणार: मोदी सरकार

शेती हा तसा समवर्ती सूचीतला म्हणजे राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त आखत्यारीतला विषय. शेती आणि शेतमालाची खरेदी-विक्री हा प्रामुख्याने राज्यांच्या अखत्यारीतला विषय. केंद्र व राज्यांमधल्या अधिकारांच्या वाटपाच्या सूत्रात बदल करण्याचं सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केलं. आपला माल राज्याच्या बाहेरही विकण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला देण्यासाठी केंद्रीय कायदा करण्याची घोषणा त्यांनी केली. हे राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण नाही का, असं एका पत्रकाराने विचारल्यावर शेती हा समवर्ती सूचीतला विषय असल्याचं आणि आंतरराज्य व्यापार हा केंद्राच्या आखत्यारीतला विषय असल्याचं दर्पोक्तीपूर्ण उत्तर सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्याने दिलं. रमेश चंद हे नीती आयोगाचे सदस्य. एका चॅनलवर त्यांना असाच प्रश्न विचारला असता, केंद्रीय कायदा हा राज्यांच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ असतो, त्यामुळे राज्यांना हा नवा कायदा मान्य करावाच लागेल असं ते म्हणाले. शेती हा समवर्ती सूचीतला विषय असेल, तर ही घोषणा करताना राज्यांशी विचारविनिमय केला होता का? आंतरराज्य व्यापाराचा परिणाम राज्यांतर्गत व्यापारावर होणार असेल, तर राज्यांना त्याबाबत काय अधिकार आहेत? हे प्रश्न ना गोदी माध्यमं उपस्थित करतील, ना देशातले नीती आयोगासारखे भाट धोरणकर्ते. केंद्रीय स्तरावर असा नवा कायदा करण्याच्या घोषणेला अतीव केंद्रीकरणाचा उग्र दर्प आहे. सहकारी संघराज्य व्यवस्था ही अरूण जेटलींची आवडती फ्रेज होती म्हणे. पण मोदी सरकार संघराज्यामध्ये विश्वास नसणारं सरकार आहे. सहकाराची तर या सरकारला घृणाच वाटत असावी. संघराज्याच्या संकल्पनेला पदोपदी हरताळ फासणाऱ्या या सरकारकडून आणखी अपेक्षा तरी काय करायची?
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
भांडवलदारांचे कंत्राटदार: मोदी सरकार

शेतमालासाठी बाजारपेठ आणि बाजारभाव याबाबत शेतकऱ्याला अनिश्चितता सोसावी लागते, ती दूर करण्यासाठी एक केंद्रीय वैधानिक तरतूद करण्याची घोषणा काल अर्थमंत्र्यांनी केली. वरवर पाहता कुणालाही हे स्वागतार्ह वाटू शकेल. पीक लावण्याआधीच ते विकलं जाण्याची हमी, आणि भावाचीही हमी मिळाली तर खरंच बरं होईल. अर्थमंत्र्यांनीही बोलताना या दोन बाबींचा विशेष उल्लेख केला. पण ही हमी कोण देणार - सरकार नाही. तर शेतकऱ्यांकडून हा माल विकत घेतील, अशा कंपन्या. आणि या कंपन्या काही शेतकऱ्याला मदत करायची म्हणून ही हमी देणार नाहीत. आम्ही माल विकत घेण्याची आणि दराची हमी देत असू, तर शेतकऱ्याने मालाबाबत संख्यात्मक आणि दर्जात्मक हमी दिली पाहिजे, अशी या कंपन्यांची रास्त अपेक्षा असणार. याचा अर्थ, या कंपन्या आणि शेतकरी यांच्यामध्ये करार होणार. म्हणजे शेतकरी कंपन्यांसाठी कंत्राटी शेती करणार. कंत्राटी शेतीचा जगभरातला आणि आपल्याही देशातला अनुभव शेतकऱ्याच्या दृष्टीने सुखावह नाही. नाव घ्यायचं शेतकऱ्याला अनिश्चिततेच्या गर्तेतून बाहेर काढायचं, पण धोरण आखायचं कंपन्यांच्या भल्याचं - ही खरी कहाणी आहे अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेची. बरं, हे करताना शेती हा ज्यांच्याही आखत्यारीतला विषय, त्या राज्य सरकारांशी चर्चाही करण्यात आलेली नाही, हे विसरून चालणार नाही. अशा प्रकारच्या नव्या केंद्रीय वैधानिक तरतुदीमुळे देशातील शेतीचं वेगाने आणि अनिर्बंधपणे कंत्राटीकरण, कंपनीकरण होण्याचा धोका आहे. शेती शेतकऱ्याच्या हातून कंपन्यांच्या, त्यातही बड्या कॉर्पोरेटच्या घशात जाण्याचा मार्ग यातून सुकर होणार आहे. विकासाच्या नावाखाली या देशात १६ इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार होत आहेत. हे कॉरिडॉर ज्या भागातून जाणार आहेत, तिथं मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आणि जंगलजमीन आहे. कंत्राटी शेती, त्यातून शेतकऱ्याची - विशेषतः सीमान्त आणि लहान शेतकऱ्यांची, अल्पभूधारकांची होणारी पिळवणूक, आणि अखेर कॉर्पोरेटच्या घशात जाणारी शेतजमीन हा मोदी सरकारच्या विकासाच्या धोरणातला महत्त्वाचा टप्पा आहे.
कोरोनाने निर्माण केलेल्या संकटाच्या काळाचं स्वतःच्या स्वार्थी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संधी म्हणून वापर करण्याचं मोठं कारस्थान मोदी सरकार रचतं आहे. त्यातूनच संघटित औद्योगिक कामगारांच्या भल्यासाठी केलेल्या कायद्यांमध्ये बदल करणं, स्थलांतरित मजुरांना आणि गोरगरिबांना आत्मनिर्भर होण्याचं आवाहन करून वाऱ्यावर सोडून देणं, कोणतीही मदत न करता धोरणात-कायद्यांत बदल करून शेती आणि शेतकरी दोन्हीला देशोधडीला लावणं हे या कारस्थानाचे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोदी सरकारचा हा कावा वेळीच ओळखून त्याला विरोध करण्याची गरज आहे.
__________________________________________________________________________________________________________
अमित नारकर, अर्थशास्त्राचे अभ्यासक, पणजी, गोवा

Wednesday 2 September 2020

४६ - आमचाही ‘अर्थ’पूर्ण संकल्प


जीवनमार्ग बुलेटिन: ४६

शनिवार, १६ मे २०२०

आमचाही ‘अर्थ’पूर्ण संकल्प

वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींपैकी १ लाख ६३ हजार कोटी रुपये शेतीसाठी देणार असल्याचे सांगितले. त्यातून सरकार काय काय करणार आहे? शेतीविषयीच्या पायाभूत सुविधांचा विकास करणार. बांधावर साठवणूक क्षमता निर्माण करणार. शिवाय मत्सोद्योग, औषधी वनस्पती आणि पशुधन विकासासाठी त्या रकमेचा वापर करणार.
आता सरकार हे करणार असल्यास त्याला कोण आक्षेप घेईल? सरकारने हे करावे. खरे तर हे आधीच करता येणे शक्य होते. पण मोदी सरकारने हे उपाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केले आहेत. वरील उपाय काही चारदोन महिन्यात अंमलात येण्यासारखे नाहीत. बांधावर साठवणूक करायची व्यवस्था केव्हा उभी राहणार? चीनने १० दिवसात दोन इस्पितळे बांधून चालू केली, तसा हनुमान पराक्रम मोदींचे सरकार करणार आहे काय? १० दिवसात सोडा, १० महिन्यात तरी करणार आहे काय? आणि ते होत नाही, तोपर्यंत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या संकटातून शेती कशी काय बाहेर पडणार, यावर मोदी आपल्या आठ वाजताच्या भाषणात एक शब्दही बोललेले नाहीत.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
संशोधनाचा भयावह निष्कर्ष
परिस्थिती काय आहे? अमेरिकेतील शिकागो विद्यापीठासहित तीन संशोधन संस्था आणि भारतातील सेन्टर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी एक अभ्यास केला आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात भारतातील ८४ टक्के लोकांचे उत्पन्न पूर्णतः बुडाले आहे. त्याचा सर्वात जास्त जोरदार फटका बसला आहे ग्रामीण भागाला. दशदिशा भटकणारे काही कोटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील म्हातारेकोतारे, पोरेबाळे वेगळीच. दुसऱ्या एका अंदाजानुसार १४ कोटी कामगार आपले काम गमावून बसले आहेत. शिकागो अभ्यासानुसार ३४ टक्के लोकांकडे केवळ एक आठवडा पुरेल इतकीच तरतूद आहे. पण लॉकडाऊनमुळे काही लोकांचे फारसे वाकडे झालेले नाही. उदाहरणार्थ, शेअरबाजारात पैसे गुंतवलेले, कायम नोकरी असलेले, घरातून काम करत मीटर चालू असलेले. उलट त्यांना घरबसल्या पगार मिळत, स्वच्छ हवेचा आस्वाद घेत नेटफ्लिक्ससारखे मनोरंजन उपलब्ध आहे. शिवाय, कित्येकांना आपण सुपरकुक असल्याचा साक्षात्कार झाला, हाही एक लाभच म्हणायचा. उंची मद्य उपलब्ध झाल्याचा बोनस वेगळाच. त्यामुळे हे भाग्यवंत (ज्यांची नरेंद्रमहाराज भक्त परायणांच्या संख्येत भर पडली असेल) सोडले तर बाकीच्या साऱ्यांना कोरोना नव्हे, तर चुकीचा लॉकडाऊन भोवला आहे. कोरोनाला मोदी जबाबदार नाहीत; लॉकडाऊनला आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोना रोखलेला नाही. फारफार तर तीव्रता कमी झाली असेल. पण आर्थिक विवंचना आणि उपासमार चुकीच्या लॉकडाऊनमुळे कामकऱ्यांच्या नशिबी आली आहे. देशाच्या भाग्यविधात्याने त्याचीही जबाबदारी घेतलीच पाहिजे. हे सार आहे, वरील संशोधनाच्या अभ्यासाचे.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
संकल्प, त्यांचा . . .
ती जबाबदारी त्यांनी घेतली असल्याची दवंडी सर्व प्रसारमाध्यमे जोरजोरात पिटत आहेत. दिल्लीहून बिहारमधील छप्रापर्यंतचे साडे नऊशे कि. मी. अंतर चालून गेल्यावर ५ किलो धान्य त्यांची वाट पहात असेल असे नरेंद्रेवाच्या वतीने निर्मलाकाकूंनी जाहीर केले आहे. त्या ५ किलोवर त्यांनी पुढील एक महिना गुजराण करायची आहे. झालेच तर त्याच्या शेतकरी भावाला कर्ज द्यायची सोय केली आहे. तो कर्जमुक्त करा अशी मागणी करतोय, तर बाईसाहेब त्याला आणखी कर्जयुक्त करायला निघाल्या आहेत. त्या कर्जातून काढलेल्या पिकाला मात्र स्वामिनाथनची दीडपट भावाची शिफारस लागू नाही. त्याने पिकवलेली अरहरची डाळ पाटण्याच्या बाजारात खपत नसेल तर तो ती छाप्रापासून ३०२४ किमी अंतरावरील कोईम्बतोरच्या बाजारात पाठवू शकतो. यालाच म्हणायचे ‘वन नेशन, वन रेशन’ - नो टेन्शन. निर्मलाकाकूंनी दूरदर्शनवर आमचा वेळ खाऊन जाहीर केले ते हे.
आज कच्च्याबच्च्याला काय शिजवून घालायचं ही भ्रांत असलेल्या शेतकरी-शेतमजुराला निर्मलाकाकूंनी त्याच्या बांधावर पतंजली बेसनची फॅक्ट्री खोलायचा वायदा केला आहे. म्हणजे ही भविष्यातली बांधानं शेत गिळायची तरतूद. काकूंनी दाळी, गहू वगैरे तृणधान्ये, तेले, तेलबिया, कांदे, बटाटे, टमाटे कितीही साठवयाला परवानगी दिली आहे. पण त्यातला एकही दाणा वा थेंब वन नेशन, वन रेशनमध्ये द्यायचा मात्र वायदा नाही. या सगळ्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगातील २ लाख कारखान्यांना कर्जाऊ दहा हजार कोटी देणार. त्यातला एक पैसाही पुढच्या आठवड्यात काय, पण पुढच्या एका वर्षातही यायची शक्यता नाही. कारण केव्हा, कसे देणार हे काकूंनी कुठे सांगितलेय? लोक विसरतात, ही त्यांच्या अनुभवाची खात्री आहे. पंधरा लाखाच्या झाकलेल्या मुठीची. केरळ सरकारने मूठ खुली करत त्या वरील वस्तूंसह सोळा वस्तू रेशनमधून कोरोना नव्हता तेव्हापसून द्यायची व्यवस्था केलेली आहे. कोरोनापासून त्या मोफत केल्या आहेत. पाच किलोच्या वर एक ग्रॅम द्यायला काकू तयार दिसत नाहीत. साडेसात कोटी टन धान्य सरकारी गोदामात असूनही खासगी व्यापाऱ्यांना कितीही साठे करायची सवलत देऊन टाकली आहे. त्यांच्या गोदामांतून ते धान्य वन नेशनच्या वन रेशनमध्ये कसे जाणार?
शिकागो विद्यापीठाने उल्लेख केलेले ८४ टक्के देवांना प्रिय नसलेले लोक गेले तीन महिने काय म्हणत आहेत? इन्कम टॅक्स भरण्याइतकी आमची कमाई नाही. तुम्ही त्यांना काही सवलती दिल्यात. द्या बापडे. पण येते तीन महिने तरी जगण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दरमहा साडेसात हजार रुपये दिले पाहिजेत. तेही कर्ज नव्हे, तर थेट रोखीची मदत म्हणून. आता गावी गेलेले मजूर एवढ्यात शहरांकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. त्यांना किमान तीनशे रुपये मजुरीने किमान २०० दिवस काम दिले पाहिजे. म्हणजे येत्या वर्षभरात प्रत्येकास महिना फक्त पाच हजार पगाराची तरतूद केली पाहिजे. आज चपराश्याला महिना किमान २५ हजार पगार मिळतो. गेटेड कम्युनिटीत राहणाऱ्या देशाने बहिष्कृत ठरवलेले हे कामकरी त्याच्या २० टक्केच मागतायत. कामाच्या बदल्यात. मात्र, यातील काहीही करण्याऐवजी मजुरीत केवळ २० रुपयाची चिरीमिरी वाढ करून जणू देशाच्या खजिन्याची चावीच हातात दिल्याचा गाजावाजा काकू करत आहेत.
— — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — — —
. . . आणि आमचा
वित्तमंत्र्यांनी तासभर केलेल्या भाषणातल्या मोठमोठ्या आकड्यांच्या खेळाचा नेमका अर्थ काय आहे? जनतेला तातडीने काहीही मिळणार नाही. शेकडो किलोमीटर पाय रखडत चालणाऱ्या बायापोरांना घरी जायला रेल्वे मिळणार नाही. कारण ती आता भारतीय जनतेच्या मालकीची कोठे राहिली आहे? रस्त्यातही त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणार नसून त्यांनी गुमानपणे न येणाऱ्या रेल्वेतून गावी जावे, अशी ब्रह्मानंदी टाळी लावून राज्य करणाऱ्या संन्याश्याने जाहिराती छापून तंबीच दिली आहे. गंगेच्या खोऱ्यात कंत्राटी शेतीतून पतंजली सारख्या कंपन्यांना औषधी वनस्पती पुरवण्यासाठी पैश्याची तरतूद केली आहे, पण पंतप्रधान किसान योजनेत प्रत्येकी वार्षिक १८,००० रुपयांची तरतूद करायला, एकवेळची संपूर्ण कर्जमाफी करायला नकार दिला आहे. रबी पिकांना रास्त हमीभावही जाहीर करायची तयारी नाही, आणि दुसरीकडे शेतकऱ्याला खिंडीत गाठून बड्या व्यापारी कंपन्यांना कंत्राटी शेती, धान्याचे अमाप साठे करायची तरतूद केली आहे. गरज आहे, उपासमार होणाऱ्या जनतेला तातडीने काय मदत देणार, याची. पण नरेंद्रमहाराजांच्या आज्ञेने वित्तमंत्र्यांनी नवा अर्थसंकल्पच जाहीर केला आहे. अर्थ नसलेल्या या संकल्पाने जनतेला सांगून टाकले आहे: तुमचे तुम्ही जसे हवे तसे जगायला मुख्त्यार आहात. तुम्हाला आम्ही स्वावलंबी करत आहोत. नफा कमावणे हे आमचे काम असल्याने ते आम्ही करत राहू. केव्हा ना केव्हा कोरोनातून रामभरोसे मुक्त होऊ. जगलावाचलात तर पुढच्या निवडणुकीत भेटू.
जनतेने आता स्वावलंबी व्हायचे मनावर घ्यावेच. नाहीतरी सर्वोच्च न्यायालयच म्हणते आहे, मालकांवर मजुरी देण्याची सक्ती करता येणार नाही. चला, न्यायालयालाच न्यायाचे धडे शिकवू या. त्यांना सांगू या, आमच्या श्रमाचा वाटा ताब्यात घ्यायला जाऊ तेव्हा कृपाकरून आडवे पडू नका! आम्हीही भक्त आहोत, पण तुकारामाचे. त्याने सांगितले आहे,
तुका म्हणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें !
___________________________________________________________________________________________________________
उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग